TechRepublic Blogs

Monday, March 31, 2025

आनंद

 *आनंद* 🟧

➖➖➖➖➖➖


काल एक मुलगा आला होता पेढे घेऊन. माझा जुना पेशंट असावा. सोबत त्याचे वडीलही होते. मुलाच्या हातात खव्याचे पेढे तर बापाच्या हातात मलई पेढे. मुलानं माझ्या हातात पेढे दिले आणि वाकून नमस्कार केला.   बापानंही त्याचं अनुकरण केलं. 

"मुलगा दहावी पास झाला.'' बाप बोलला.

"अरे वा, छानच की!....किती मार्क मिळाले?" मी विचारलं.

"बासष्ट टक्के आहेत." मुलगा बोलला.

"फर्स्ट क्लास मिळालाय त्याला." बापानं कौतुकानं मुलाच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं.

"चांगले मार्क आहेत." मी म्हटलं.

"मग काय तर?....गेल्या वर्षी पन्नास टक्के होते. एका वर्षात बारा टक्क्यांची प्रगती म्हणजे चेष्टा नाही."

"खूपच छान....आता पुढं काय करायचं ठरवलंय?" मी विचारलं.

"अजून ठरलं नाही. निकाल आलाय तेव्हापासून पेढेच वाटतोय....आम्हांला सगळ्यांना एवढा आनंद झालाय की बस्स....हा आनंद साजरा केला की बघू पुढं काय करायचं ते."

  आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत अप्पूची एक मैत्रीण आली पेढे द्यायला.

"किती मार्क पडले गं?" मी तिला विचारलं.

"नाईनटीफाईव्ह परसेंट."

"अभिनंदन." मी म्हटलं. मला वाटलं होतं की तिचे मार्क ऐकून तो मुलगा किंवा त्याचे वडील थोडे खजिल होतील. पण तसं काहीच झालं नाही. त्यांनी त्या मुलीलाही पेढे दिले आणि अभिनंदन केलं. "खूप छान मार्क मिळवलेस पोरी, बापाचं नाव केलंस बघ."  मुलाचे वडील बोलले.

ती मुलगी निघून गेली आणि मुलगाही बाहेर गेला.

"याच्या बऱ्याच दोस्तांनाही नव्वद पंचाण्णव टक्के मार्क आहेत. बासष्ट टक्के मार्क मिळवूनही आम्ही पेढे वाटतोय याचं त्यांना  आश्चर्य वाटतंय.तुम्ही पहिल्या व्यक्ती आहात चांगले मार्क मिळालेत म्हणणाऱ्या.....बाकी सगळे 'फक्त बासष्ट टक्के मार्क?' या नजरेनं पाहत असतात."

"हो ना?"

"खरं सांगू डॉक्टर?....प्रत्येक मुलाची एक कुवत असते....एक आवड असते. त्या मुलीला पंचाण्णव टक्के मार्क मिळाले म्हणून माझ्या मुलाला तितकेच मार्क मिळायला पाहिजेत असं म्हणणं म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. प्रत्येकजण आपापल्या कुवतीप्रमाणे जगत असतो. आमच्या दृष्टीनं आनंदाची बाब म्हणजे त्याला गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी बारा टक्के मार्क जास्त मिळालेत..... हा तर आनंदसोहळाच आहे की आमच्यासाठी."

"खरं आहे. आपण आपली तुलना इतरांशी करून स्वतःच्या आनंदात विरजण टाकत असतो.....तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला आवडला." मी म्हटलं.

"हे सगळं अनुभवातून शिकलो डॉक्टर. मी दहावीत असताना मला चाळीस टक्के मार्क पडलेले. त्यामानानं माझ्या मुलाला खूपच चांगले मार्क आहेत. मला चाळीस टक्के मार्क असताना मी त्याला बासष्टच टक्के मार्क का मिळाले म्हणून का रागवावं?"

"ग्रेट."                           

"मला चाळीस टक्के मिळाले म्हणून माझे वडील मला लाख टक्क्याने बोलले होते.... माझ्या मोठ्या भावांना सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त होते ना?"

"ते भाऊ आता काय करतात?"

"एक शिक्षक आहे आणि एक खाजगी नोकरीत आहे."

"तुम्ही शेतीच करता ना?"

"हो! वडिलार्जित दोन एकर होती आता वीस एकर आहे. मी स्वतः अठरा एकर घेतलीय. स्वतःची डेअरी आहे. खताची एजन्सी आहे. गेल्या वर्षी नुसता टोमॅटो चाळीस लाखांचा झाला....शंभर रुपये दर होता बघा तेव्हा टोमॅटोचा."

   आमचं बोलणं चाललंय तोपर्यंत मुलगा आत आला आणि वडिलांना हाताला धरून घेऊन गेला.

माझ्या डोक्यात विचार आला की ही माणसं खरी प्रॅक्टिकल. जे आहे त्यात समाधान मानणारी. आनंद उधळणारी आणि आनंद वेचणारी.....आणि जीवनातलं यश अपयश हे केवळ दहावीच्या मार्कांवर अवलंबून नसतं हेही त्यानं सिद्ध करून दाखवलं होतं!


©डॉ.अशोक माळी,मिरज.





No comments:

Post a Comment