TechRepublic Blogs

Sunday, March 16, 2025

छप्पन

 छप्पन (५६) या संख्येला मराठी भाषेत वेगळेच महत्त्व आहे. समजा माझे आणि एखाद्याचे भांडण झाले तर, तो किंवा मी असे म्हणतो की, 'अबे जा बे ...तुझ्यासारखे छप्पन पाह्यले .  'माझ्याही मनात हा प्रश्न आला होता की,'छप्पनच का? पंचावन्न किंवा सत्तावन्न का नाही?' 

शंकानिरसनासाठी मी, मराठी भाषेच्या एका प्रसिद्ध, ज्येष्ठ साहित्यिकाला भेटलो. ते मला म्हणाले की, "संत नामदेवांनी ज्ञानेश्वरी संबंधाने लिहिलेल्या ओव्या तू वाचल्या आहेस का?"

"हो. एकतरी ओवी अनुभवावी  तेच ना?'" मी उत्तरलो. 

"बरोबर. त्यात एक ओळ आहे. 'केलासे छप्पन भाषांचा  गौरव'. अर्थ असा की ज्ञानेश्वरीत मराठी भाषेतील छप्पन भाषांमधील शब्द आलेले आहेत. त्यांच्या काळात मराठीच्या छपन्न बोली होत्या. वऱ्हाडी, झाडी, मालवणी, कोंकणी, अहिराणी, माणदेशी, अशा अनेक परंतु छप्पन बोली होत्या. आता एक लक्षात घे. छपन्न प्रकारच्या बोली बोलणारे छपन्न प्रकारचे समाज. प्रत्येकाची रीतभात वेगळी, वृत्ती वेगळी, व्यवहार वेगळा! अशी छपन्न प्रकारच्या मनोवृत्तीची माणसे होती. म्हणून 'तुझ्यासारखे छपन्न पहिले असे म्हणण्याची पद्धत आली."

ते पुढे म्हणाले, " छपन्न प्रकारचे समाज म्हणजे स्वयंपाक करण्याच्या छपन्न रीती .म्हणून 'छपन्न भोग'. छपन्न प्रकारचे नैवेद्य. समाजात एखादी बाई खूप भांडकुदळ, वचवचा बोलणारी, उठवळ स्वभावाची असेल तर ,तिला 'छप्पन टिकल्यांची आवा 'म्हणतात. म्हणजे सर्व छपन्न प्रकारच्या  समाजात जाऊन आपल्या नावाचा दगड पडून आलेली."

पुरुषोत्तम पाठक यांनी  वर विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मला जे आठवले ते पाठवले . 

नाना पाटेकरच्या चित्रपटाच्या  "अब तक छपन्न' या शीर्षकामागीलही कारण हेच असेल काय?


Prakash Edlabadkar

No comments:

Post a Comment