श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.
लेखांक - १.
लेखांक - पहिला.
*******************
श्री स्वामी महाराज यांचा जन्म कोठे झाला व केव्हा झाला याबद्दल निश्चित अशी कोणालाही काहीही माहिती नाही मात्र ते अयोनीज जन्मले हे त्यांच्या चरित्रावरून समजते. श्री स्वामी समर्थ महाराज हे अक्कलकोट येथे अश्विन व ५ बुधवार १८५७ ला आले व त्यांचा प्रकट दिन हा चैत्र शु. २ आहे. ते दिगंबर (अवधूत) वृत्तीने राहत असत. त्यांचा कार्यकाळ हा १८५६ ते १८७८ हा होता. ते दत्त संप्रदायातील होते व त्यांना श्री दत्तांचे चतुर्थ अवतार म्हणून ओळखले जातात. श्री स्वामी समर्थ महाराजांचे चरित्र ग्रंथ हे श्री स्वामी लिलामृत, श्री स्वामी समर्थ सारामृत व श्री गुरुलिलामृत हे प्रामुख्याने आहेत. श्री स्वामी समर्थ महाराजांचे प्रमुख शिष्य हे श्री बाळप्पा महाराज, श्री चोळप्पा महाराज, आळंदीचे नृसिंहसरस्वती तसेच रामानंद बिडकर महाराज हे होते. त्याच प्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांचा श्री संत साईबाबा, श्री संत गजानन महाराज शेगाव, श्री संत सद्गुरू हरिबाबा महाराज फलटण व धनकवडी पुणे येथील श्री शंकर महाराज यांच्यावर विशेष प्रभाव पडला.
श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचा अवतार हा श्री दत्त परंपरेतील चौथा अवतार मानला जातो. दत्तसंप्रदायात ही परंपरा पुढीलप्रमाणे आहे. वेद आणि पुराणकाळात श्रीदत्त ही विभूती होऊन गेली. अत्रिऋषी आणि अनसूया यांचा पुत्र म्हणजे श्रीदत्तगुरू हे होत. ऐतिहासिक दृष्टीने पाहता दत्तपरंपरेतील पहिले सत्पुरुष म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ होत. पूर्वेकडील प्रांतात पीठापूर येथे चवदाव्या शतकात त्यांचा जन्म झाला. त्यांनी आपला हा अवतार पूर्ण केल्यापूर्वीच ‘पुन्हा-भेटेन’ असे अभिवचन भक्तांना दिले व त्याप्रमाणे तेच पुढे नृसिंहसरस्वती या नावाने कारंजानगर येथे (कारंजा-वऱ्हाड) जन्मास आले. त्यांच्या अवतारकार्याचा कालावधी इ.सन १३७८ ते १४५८ हा आहे. त्यांनी गाणगापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांची स्थापना केली. इ. सन १४५७ च्या सुमारास ते श्रीशैल यात्रेच्यावेळी कर्दळीवनातून गुप्त झाले व त्यानंतर ते सुमारे ३०० वर्षांनी कर्दळीवनातून पुन्हा प्रकट झाले. तेच स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज होत. ऐतिहासिकदृष्ट्या ते तिसरे सत्पुरुष असून दत्ताच्या विभूतिमत्वाचा ते ‘चौथा अवतार’ मानले जातात. श्री दत्तसंप्रदायात जनार्दन स्वामी, एकनाथ महाराज , दासोपंत, माणिकप्रभू, नारायण-महाराज जालवणकर, चिदंबर दीक्षित, वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी असे अनेक थोर सत्पुरुष होऊन गेले. श्री स्वामी समर्थांनी स्वत:च ‘मूळ पुरुष वडाचे झाड, दत्तनगर हे वसतिस्थान आणि नाव ‘नृसिंहभान’ असे भक्तांना
सांगितल्याने दत्तसंप्रदायात श्री स्वामी महाराजांचे स्वरूप श्रीदत्ताचे
‘चौथे अवतारित्व ’ मानण्यात आले. त्यामुळे दत्तभक्त हे स्वामीभक्त झाले.
श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. त्यानंतर साडेतीनशे वर्षे गेली व्यतीत होऊन गेल्यानंतर त्यांच्याभोवती एक वारूळ तयार झाले. एके दिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडत असताना त्याचा घाव चुकला व तो वारुळावर पडला व तेव्हा पासून त्या वारुळातूनच श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले, असे सांगितले जाते. जेव्हा लाकडे तोडताना कुऱ्हाडीचा वर त्या वारुळावर पडला त्यावेळी तो वार श्री स्वामी समर्थांचे मांडीवर लागला त्यामुळेच श्री स्वामी समर्थ आपल्या समाधीतून जागे झाले. महाराजांच्या अक्कलकोट येथील अवतार समाप्ती पर्यंत तो कुऱ्हाडीचा वार त्यांचे मांडीवर स्पष्ट दिसत होता. श्रीस्वामी समर्थ त्यानंतर श्री काशीक्षेत्री प्रकट झाले. तेथून गंगाकाठाने कलकत्ता, जगन्नाथपुरी मार्गाने गोदावरी नदीच्या तीरावर आलेत. त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराज मंगळवेढे गावी प्रकट झाले. ते नेहमी घनदाट अरण्यात वास्तव्य करीत असत. पण कधी कधी क्वचितच मंगळवेढे गावात येत. त्या गावात एक ब्राह्मण कुटुंब होते. जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज गावात आले की ते त्यांना भोजन देत. मंगळवेढे येथील वास्तव्यानंतर श्री स्वामी समर्थ पंढरपूर, मोहोळ, सोलापूर ह्या ठिकाणी वास्तव्य करून ‘श्री’ अक्कलकोट येथे आले तेव्हा त्या वेळी त्यांनी तब्बल तीन दिवस अन्नग्रहण केले नव्हते. ते सरळ त्यावेळी श्री चोळाप्पा यांच्या घरी गेले. श्री स्वामींचे प्रभावी व तेजोमय रूप बघून श्री चोळप्पा यांना श्री स्वामी समर्थ महाराज एक अद्वितीय अवतार स्वरूप आहे असे त्यांना वाटले व म्हणूनच श्री चोळप्पा यांनी स्वामींना आपल्या घरी नेले. चोळप्पा यांची पत्नीही खूप धार्मिक व सात्विक प्रवृत्तीची महिला होती म्हणून त्या दोघांनीही श्री स्वामी समर्थ महाराजांचे आत्मीय स्वागत करून व त्यांची यथायोग्य पूजा करून त्यांना भोजन दिले. त्याच दिवसापासून श्री चोळाप्पा स्वामींचे एकनिष्ठ शिष्य झाले. चोळाप्पांचे घरामधे त्यांची सासू पण होती त्यामुळे ती व त्यांच्या घरातील इतर सदस्य चोळप्पा यांना " एक वेडा घरात आणून ठेवला आहे " असे म्हणत. श्री स्वामींच्या दिव्यत्वाची प्रचिती अगदी थोड्याच दिवसात अक्कलकोट येथील मंडळीस येऊ लागली व त्यामुळे अक्कलकोट येथील सर्व स्त्री पुरुष व आजूबाजूच्या गावातील लोक स्वामीदर्शनास येऊ लागले. राजेसाहेब भोसले यांचीही श्रीस्वामींवर दृढ भक्ती जडली. श्रीस्वामी समर्थ राजवाडयात कधी कधी जात असत तर स्वामींना जर असे वाटले की आपण आता राजवाड्यातच राहावे तेव्हा ते राजवाड्यातच चारचार दिवस मुक्काम करीत असे. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले तेव्हा ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. (हे खंडोबाचे देऊळ सध्याच्या एस. टी. स्टॅंडसमोर आहे.) तेथून पुढे वटवृक्षाखाली येऊन त्यांनी तप:साधना केली. बालोन्मत्त पिशाच्चवृत्तीचे ते सिद्ध पुरुष होते. आपल्या वास्तव्यात त्यांनी अनेकविध चमत्कार केले. राजापासून रंकापर्यंत अनेकांवर प्रेमाचा वर्षाव केला. "आपण यजुर्वेदी ब्राह्मण, गोत्र काश्यप, रास मीन," असल्याची माहितीही त्यांनी स्वत:च सांगितली आहे. शिष्यद्वय श्रीबाळप्पा व श्री चोळप्पा यांचेवरही त्यांनी कृपा केली. श्री स्वामी समर्थांची कांती दिव्य, तेज:पुंज होती. शरीराचा वर्ण गोरा होता व ते अजानुबाहू व उंच होते. असे बरेच दिवस गेले व स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण सुद्धा भ्रमण केले. ते विविध ठिकाणी , विविध नावांनी प्रसिद्ध होते. सुरुवातीला ते मंगळवेढय़ात आले त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले व आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत ते तेथेच राहिले. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जाती धर्माचे , मुस्लिम व इतर बहुजन समाजाचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण कधी कधी वेळा बालक स्वरूपाचे असे तर काही वेळा ते अतिशय रौद्र रूप धारण करीत असत.त्यांनी अनेकांचा लोकांचा व नकली साधूंचा अहंकार दूर केला व अनेक हट्टी कट्टी लोकांना धडा शिकवून त्यांना सन्मार्गाला लावले. ज्यांची जेवढी महाराजांवर भक्ती होती त्याच अनुषंगाने त्यांनी त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा व आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा राज्य कारभार होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. त्यामुळे साधारण जनतेचा इंग्रजांविरुद्ध त्यांनी आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन व इतरही धर्माचे लोक त्यांच्या दरबारात आपली उपस्थिती देत. त्यामुळे त्यांच्या अवती भवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांच्या क्षमतेनुसार कार्य दिले व परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकर महाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत. स्वामी समर्थांच्या अवतार कार्याची हकिकत त्यांच्या अनेक चरित्रकारांनी वर्णिली आहे ती अशी आहे.
अशा भागिरथीच्या तीरी ।
कर्दलीवना माझारी ।
स्वामी निजमानसांतरी ।
ते निर्विकारी चिंतिता ।।
तपश्चर्च्या करिता करिता ।
तत्व येऊनिया हाता ।
प्राप्त झाली तदैक्यता ।
नुरले तत्वता देहभान ॥
ऐशापरी लोटता काळ ।
अंगावरी जाहले वारूळ ।।
दिव्य सतेज सोज्वळ ।
देह निर्मळ झालासे ॥
ऐसी स्थिती झाल्यावर ।
काय घडला प्रकार ॥
भावे ऐका सादर ।
सौख्यसार तो आहे ॥
लाकूडतोड्या एके दिनी ।
सहज आल त्याच वनी ॥
वृक्षावरी घाव घालुनी ।
डाहाळी झणी पाडिली ॥
डाहाळी पडताच सकळ ।
ढासळून गेले वारूळ ।
फार जुनाट मूर्ती सोज्वळ ।
बाहेर तत्काळ निघाली ॥
आजानुबाहू दिगंबर ।
फांके तपोदीप्ति सुंदर ।
जैसा पूर्णिमेचा निशाकार ।
सर्वसंचार आनंदवी ॥
(अ. स्वामी लीलामृत, अ.१, ओवी ६ ते १२)
💐 हा लेख निवेदन व प्रस्तुती :-
श्री वामन रुपरावजी वानरे.
No comments:
Post a Comment