‘काटा रुते कुणाला’ गाण्याच्या निर्मितीच्या वेळचा हा किस्सा आहे. जितेंद्र अभिषेकींना हवं तसं गाणं तयार होत नव्हतं. शांताबाई थोड्या वैतागल्या, त्यांनी अभिषेकींना विचारलं की त्यांना नक्की काय हवं आहे. तेव्हा ..
*आप काटों की बात करते है हमने फुलोंसे जख्म खाये है,*
*आप गैरोंकी बात करते हमने अपनोसें भी जख्म खाये है*
असा एक शेर त्यांनी ऐकवला, आणि शांताबाईंच्या लेखणीतून शब्द उमटले,
*काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी*
*मज फुलही रुतावे हा दैवयोग आहे.*
***
हृदयनाथ मंगेशकर आणि शांताबाईंनी काही कोळीगीतं करायची ठरवली. त्यानुसार त्या भागाचा दौरा करून आले.
त्यानंतर एक महिना शांताबाईंचा काही पत्ता नाही. एक महिन्यानंतर जेव्हा शांताबाई हृदयनाथांना भेटायला गेल्या तेव्हा ते थोडे चिडले. शांताबाई हृदयनाथांच्या मांडीवर डोकं ठेवून रडायला लागल्या आणि सांगितलं की त्यांना नागिण झाली होती. त्यामुळे त्यांना उशीर झाला.
बरं त्याही अवस्थेत गाणी कोणती लिहावीत तर, ‘वल्हव रे नाखवा हो’ .. त्यात कोळीबांधवांसाठी त्यांनी ‘दर्याचा राजा’ हा सुंदर शब्द वापरला आहेत.
***
*‘हात नका लावू माझ्या साडीला’* हे गाणं शांताबाईंनीच लिहिलं आहे. हे गाणं मंगेशकरांच्या घरात रचलं. पदराची जी किनार असते त्यासाठी शब्द सुचत नव्हता. तेव्हाच कुणीतरी घरात खायला शेव आणली.
तेव्हा *‘तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला, हात नका लावू माझ्या साडीला’* या ओळी प्रकटल्या.
***
कविता म्हटलं की फक्त प्रेम असं नाही. प्रेमकवितांच्या प्रांतात शांताबाईंनी मुशाफिरी केलीच पण त्याबरोबर लहान मुलांसाठीही *‘किलबील किलबील पक्षी बोलती’* सारख्या सुंदर कविता आणि गाणी रचली.
गणेशोत्सवाच्या काळात हमखास ऐकू येणारी *‘गणराज रंगी नाचतो’, ‘गजानना श्री गणराया’* ही गाणी शांता शेळकेंच्या लेखणीतून अवतरली आहेत. घरून निघताना आठवणारे *‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’* हे गाणंही त्यांचीच देणगी. या गाण्यातली *‘ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे’* ही ओळ आली की हमखास डोळ्यात पाणी येतं आणि आपण शांताबाईंपुढे नतमस्तक होतो.
नाट्यसंगीत, लावणी या गीत प्रकारातही शांताबाईंनी आपला ठसा उमटवला आहे.
*प्रतिभा हा शब्द थिटा पडावा अशा दैवी देणगी लाभलेल्या शांताबाई अर्थात ‘शान्ता.ज.शेळके’ यांचा आज स्मृतीदिन.*
*शांताबाईंना शतश: नमन.*
🙏💐🙏💐🙏
No comments:
Post a Comment