*भावार्थ मनोबोध*
*श्री रविंद्रदादा पाठक*
संकलन आनंद पाटील
मना मत्सरे नाम सांडू नको हो l अती आदरे हा निजध्यास राहो l
समस्ता मध्ये नाम हे सार आहे l दुजी तुळणा तुळीताही न साहे
*आपले मन हे इतरांच्या गोष्टींना मान्य करायला तयार नसते त्यावेळेला आपल्यातला हवेनकोपणा वाढतो.* *हवेनकोपणा वाढला की द्वेष निर्माण होतो. या द्वेषातून मत्सर निर्माण होतो. भगवंताचे नाम नेमके आपल्या मनाच्या* *आकुंचितपणावरती काम करते. ते आपल्या मनाला व्यापकता द्यायला सुरुवात करते*
*मनाला व्यापकता देते. कसे काय बरे नाम हे मनाला व्यापकता देऊ शकते. नाम हे मनाला सूक्ष्म करत असते. एक गंमत अशी आहे, हा फॉर्म्युला असा आहे की, मन जसजसे सूक्ष्म होऊ लागते तसतशी वृत्ती व्यापक होऊ लागते.*
*भगवंताच्या नामाने अनेक लोकांचा राग नाहीसा होतो. अनेक लोकांच्यातले कामक्रोधादी षडरिपु लयाला जातात. हे कसे होते याचे* *कारण नाम हे मनाला सूक्ष्म करते आणि मन जसजसे सूक्ष्म होते. हरिस्मरणाने,* *हरिप्रेमाने भरून जाते, तसतशी मनुष्याची वृत्ती व्यापक होऊ लागते. जेव्हा वृत्ती व्यापक होते तेव्हा टॉलरन्स वाढतो, इतरांचे दोष सहन करण्याचा जेव्हा आपला टॉलरन्स वाढतो तेव्हा आपल्याला इतरांचे दोष सहन करता येतात. हळूहळू ते दोष आहेत हेच जाणवणे कमी होऊन जाते. जेव्हा मनुष्याचे*
*दोष दिसणेच बंद होते. त्याक्षणी आपली आवडनिवड कमी होते. त्यापोटी निर्माण होणारा* *मत्सरदेखील कमी होत जातो. जेव्हा हे विश्व आपल्याला संपूर्ण दोषरहित दिसू लागेल, त्यावेळेला आपल्या जीवनातून* *मत्सराचेदेखील उच्चाटन होईल. पण हे इतक्या सहजपणे होते असे नाही. त्यासाठी समर्थ म्हणतात की.*
*नामाचा निजध्यास लागला पाहीजे. निजध्यास म्हणजे आपल्या जीवनातील सर्व अवस्थांमध्ये, मनुष्य हा* *साधारणपणे चार अवस्थांमध्ये जगत असतो जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या. जागृती म्हणजे ही जी आपली दिनचर्या आहे - सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, ही जागृती. स्वप्नावस्था म्हणजे*
*आपण झोपलो आहे, काही तरी स्वप्न बघतो आहोत, ही स्वप्नावस्था. सुषुप्ती म्हणजे गाढ झोप. तुर्या ही त्याच्या पलीकडची अवस्था, जी फक्त परमार्थाने, गुरुकृपेने अनुभवता येते. या चारही अवस्थांमध्ये जर नाम भरायचे असेल तर त्यासाठी जागृतीमध्ये नामाचा निजध्यास आणि तोही अतिआदराने. आदराने म्हणजे प्रेमाने, केवळ एका संख्येपोटी नाही. केवळ करायचे म्हणून नाही तर प्रेमाने, अत्यंत आदराने*
*जागृतावस्थेमध्ये आपण जितके काळ नामस्मरण करू ते नाम आपल्या स्वप्नामध्ये उतरेल. तेच नाम आपल्या गाढ सुषुप्तीमध्ये उतरेल आणि तेच नाम एके दिवशी आपल्याला तुर्यावस्थादेखील मिळवून देईल.असे हे नामाचे छोटेसे औषध. जसे त्या होमिओपॅथीच्या गोळ्या असतात ना साबुदाण्यासारख्या.*
*आपल्याला त्याकडे बघितले की असे वाटते की, अरे हे काय हे कसले औषध? याने कसे आपले कार्य होईल? पण बऱ्याचदा आपल्या कल्पनेपलीकडचे रिझल्ट या होमिओपॅथीने मिळतात आणि ही छोटीशी गोळी हे जसे काम करून जाते, तसे भगवंताचे नाम कार्य करते. त्यामुळे समर्थ म्हणतात की,*
दुजी तूळणा तूळिताही न साहे ।
*याच्यासाठी कुठली उपमा द्यावी या नामस्मरणासाठी, हे नामस्मरण आपण अत्यंत आनंदाने अत्यंत निदिध्यासाने आणि आदराने जर आपल्या जागृतावस्थेमध्ये ठेवले तर या नामाची स्पंदने आपली सुषुप्ती भरून काढतात, स्वप्नावस्था भरून काढतात आणि या नामामध्येच सदगुरू* *आपल्यावरती कृपा करतात, आपली दृष्टी व्यापक करतात, आपली वृत्ती व्यापक करतात. या जगाला दोषरहित बघायची वृत्ती निर्माण करतात. जगातल्या अनेक प्रकारच्या मंडळीना सामावून घेण्याची वृत्ती आपल्या हृदयामध्ये निर्माण करतात. हीच वृत्ती आपली व्यापक होत होत ब्रह्मांडाला भेदून प्रत्यक्ष परमात्मस्वरूप होऊन जाते. तिथे वृत्तीचे दोन्हीही किनारे निघून जातात. अशी अद्भुत क्रांती या नामाने आपल्या आयुष्यात घडते. म्हणून मनापासून अत्यंत तळमळीने, प्रेमाने, निदिध्यासाने या नामाला लागा. हे भगवंताचे नाम परमकल्याणकारी आहे.*
|| जानकीजीवन स्मरण जय जय राम ।।
No comments:
Post a Comment