TechRepublic Blogs

Monday, March 10, 2025

ईश्वराची..

 श्रीस्वामी समर्थ  महाराज अक्कलकोट. 

 लेखांक -७.

 लेखांक- सातवा.

 ************************ 

 श्री स्वामींनी जो उपदेश केला त्यात त्यांनी नामस्मरणाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. तू अनन्यभावाने माझी सेवा कर, मी तुझा योगक्षेम चालविल या शब्दांचा पुनरुच्चार करून स्वामींनी नामस्मरण म्हणजेच  अखंड माळ ,नामजप, नामतप, नामयोग व  भक्ती सतत चालू ठेवावी हाच महाबोध सांगितला आहे. तुम्ही जेवढे नामस्मरण कराल तेवढीच तुम्हाला ईश्वराची प्रचिती मिळेल. " भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." हे त्यांचे आश्वासनही नामजप करताक्षणीच तुम्हाला आठवते व तीच तुमच्या भक्तीची पराकाष्ठा आहे.  ‘वडाच्या पारंब्या तुम्ही धरून बसा ’ हे त्यांनी का बरे सांगितले असावे? तर या सांगण्यातील मथितार्थ असा की, वड हे अखंडत्वाचे प्रतीक आहे. हे झाड वाढते, मोठे होते व त्या झाडाचा अतिकाय मोठा वृक्ष होतो व त्यास अनेक पारंब्या फुटतात. त्या पुन्हा जमिनीत रुजतात. त्याचा पुन्हा वृक्ष होतो. ही अखंडत्वाची खूण श्री स्वामींनी सांगितली असावी. सद्गुरूंकडून नामोपदेश मिळून सबीज ,दिव्य , संजीवन अशा नामाचे बीज साधकाच्या अंत:करणात रुजते, वाढते व विस्तार होतो तो ही केवळ नामोच्चाराच्या सतत उच्चाराने होतो ही गोष्ट येथे लक्षात ठेवली पाहिजे.

श्री स्वामी समर्थ महाराजांची  हळुहळु पूर्ण भारतभर किर्ती पसरली व त्यामुळे महाराजांकडे नाना धर्माचे अशिक्षित, सुशिक्षित लोक अक्कलकोट येथे येऊ लागले. ह्यांत जिज्ञासू , अतिथी तसेच श्री स्वामी यांची परीक्षा घेणारे लोकही येत असत. श्री स्वामीं महाराजांकडून प्रत्येकास त्याचे अचूक उत्तर मिळे. निरनिराळ्या भाविक लोकांबरोबर श्री स्वामी महाराज त्यांचे भाषेत बोलत व जिज्ञासूंचे समाधान करीत. 

श्री स्वामी समर्थांच्या येणाऱ्या भक्तांत परमार्थमार्गात उन्नती करून घेण्यासाठी येणारे भक्त फार थोडे होते. श्री हरिभाऊ (स्वामी सुत) हे श्री स्वामींचे भक्त ह्यांनी त्यांच्या प्रथम भेटीतच श्री स्वामी समर्थांच्या  सानिध्यात येण्याकरीता त्यांनी आपला मुंबईतील आपला संसार आवरता घेतला. स्वत: चक्रपाणी व त्यांच्या सौ. वैराग्य संपन्नावस्थेत घराबाहेर पडले. त्यांनी चांदीच्या पादुका तयार करून श्री स्वामी समर्थांचा प्रसाद म्हणून कामठीपुरा (मुंबई) येथे मठ स्थापन केला. श्री स्वामी सुतांनी श्री स्वामी चरित्रावर काव्य केले आहे. श्री स्वामीसुत हे श्री स्वामींच्या हजेरीतच श्रावण वद्य १ ह्या दिवशी पंचतत्त्वात विलीन झाले. श्री स्वामी समर्थ महाराजाचे दुसरे निस्सीम भक्त  " श्री बाळाप्पा महाराज " हे होते.  ते धारवाड जिल्ह्यातील हावेरी या गावचे राहणारे होते.ते आपल्या घरी सावकारी, व्यापार वगैरे उत्तम रीतीने करीत होते.पण एके दिवशी बाळप्पांच्या  मनातही वैराग्याची भावना जागृत झाली व त्यामुळे त्यांना सद्गुरू कोठे भेटेल व मार्गदर्शन करील ही आत्यंतिक तळमळ लागली. त्यावेळी त्यांचे वय केवळ तीस वर्षांचे होते. ते श्री क्षेत्र गाणगापूर येथे आले व  तेथे त्यांनी दोन महिने कडक अनुष्ठान केले. दोन महिन्यानंतर त्यांना असा दृष्टान्त झाला की , " तू अक्कलकोट येथे जाऊन स्वामी सेवा करावी." त्या स्वप्नातील दृष्टांता नुसार ते अक्कलकोटला आले. ते जेव्हा अक्कलकोट येथे आले तेव्हा त्यांना पाहताच श्री स्वामींनी अशी भावना व्यक्त केली की ते दोघेही एकमेकांना साता जन्मापासून ओळखत आहे. त्यांना अत्यंत आनंद झाला व जिवाशिवाची ओळख पटली. श्री बाळप्पा महाराज यांनी श्री स्वामीसेवा एकनिष्ठपणे केली. साधकावस्थेत त्यांच्या दैवी सामर्थ्याची प्रचिती येई. श्री स्वामी समर्थांचे निर्वाणानंतर ते ३२ वर्षे हयात होते.

💐 प्रस्तुती व निवेदन :-

 श्री वामन रूपरावजी वानरे.

 

No comments:

Post a Comment