समजा, एखाद्या व्यक्तीने तुम्हाला विचारलं की तु सुखी आहेस का? काही जणं आनंदाने हो म्हणतात पण काहींना दुःख लपवून चेहरा हसरा ठेवून सांगावे लागते मी सुखी आहे. अनेकदा परमेश्वर आपल्या संयमाची खूप परीक्षा घेतो. मला तरी असे वाटते की आपण जे ठरवतो ते प्रत्यक्षात घडले नाही की मनाला समजवावे लागते हे आपल्यासाठी नव्हतेच. जे आपल्याला हवं आहे ते मिळे पर्यंत संयम ठेवणे आवश्यक आहे. अनेकदा, नाती सांभाळण्यासाठी वाद टाळावे लागतात. आपण कितीही योग्य असलो तरी केवळ घराच्या सुखासाठी तडजोड करावीच लागते. कारण, प्रत्येक वेळी उत्तराला उत्तर देणे हा पर्याय योग्य नसतो. म्हणून तर व.पुं.नी खूप छान विचार व्यक्त केला आहे, " चूक नसतानाही केवळ वाद टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचे फार मोठे प्रतिक आहे.."
प्रत्येक स्त्री पुरुषांना व्यथा या सतावत असतातच. दिवसभर थकून आल्यावर झोपताना लगेच डोळा लागत नाही. कारण, कोणती ना कोणती व्यथा ही मेंदू पोखरतच असते. अशा वेळी गरज असते ती व्यथा समजून घेणाऱ्या व्यक्तीची. पण त्या व्यथांची गंभीरता ही जर लक्षात आली तरच त्यावरचे उपाय समोर येतात नाहीतर आपण सांगितलेले दुःख हे किरकोळ आहे असे दिसले तर अजून एकाकी वाटते. मग परत व.पु. म्हणतात ते पटते, " आपली व्यथा इतरांना न समजणं हाच पोरकेपणा. आपल्या व्यथा स्वतःला जेवढ्या तीव्र वाटतात तेवढ्याच त्या इतरांना मामुली वाटतात. हेच एकटेपण, पोरकेपण.." आपल्या हृदया जवळची व्यक्ती जेव्हा कायमची आपल्याला सोडून जाते तेव्हा देखील मनावर संयम ठेवणे गरजेचे असते. कारण, मागे राहिलेल्यांना आधार देण्यासाठी खंबीर बनावं लागतं.
प्रोब्लेम काय हो पैसा, मनुष्यबळ यामुळे सुटतात देखील. समाजात आज अशी अनेक लोकं आहेत जे रोज या व्यथांशी सामना करत असतात. कितीतरी वेळा या व्यथांचा अक्षरशः कंटाळा येतो आणि डोळे पाणावतात. पण रडणं सुध्दा वाईट नसते. व.पु.च म्हणतात, " रडणं म्हणजे दुबळेपणाचे लक्षण नव्हे.." आज हा लेख वाचणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणती ना कोणती तरी व्यथा, किंवा एखादी भळभळती जखम ही असणारच. पण त्यांचा विसर हा जरी पडला तरी जेव्हा ते आठवते तेव्हा मन त्या स्मृतीं मध्ये जाते. तरीही आयुष्य थांबते का? तर नाही. उद्याचा दिवस हा आजच्या दिवसांपेक्षा नक्कीच चांगला असेल ही आशा असते.. पुन्हा व.पु. म्हणतात तसं, " सायंकाळच्या संधी प्रकाशातही जो टवटवीत राहीला त्याने दिवस जिंकला.."
No comments:
Post a Comment