श्रीराम समर्थ
नाम जर चिकाटीनं घेतलं तर विचार थांबलेच पाहिजेत, अनुभव घेत नाही हो कोणी काय करावं ? अगदी अनुभवाची गोष्ट आहे. की विचार चालू दे नाम सोडायच नाही.
महाराजांचा दृष्टांत फार अप्रतिम आहे याला. महाराज म्हणाले एक बाई नोकरीसाठी रस्त्यावरनं निघाली. जाताना रस्त्यावरनंच जायला पाहिजे आणि रस्त्यावर हजारो लोक असायचेच. तर म्हणाले एक वाईट मनुष्य होता तो तिला पाहून खांकरला. त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, दुसरी एक मैत्रिण भेटली म्हणाली घाई आहे मला. चालत राहिली. हे सगळं होतअसताना चालत राहिली तर स्टेशनवर पोचते ना. तसं चांगला विचार आला वाईट आला तरी नाम चालू ठेवलं तर भगवंतापर्यंत पोचेलच पोचेल म्हणाले. काय महाराजांची बुद्धीमत्ता असली पाहिजे हो. सांगण्याची खुबी काय आहे बघा. आपण काय करतो खाकरला की त्याच्यशी भांडायला सुरवात आणि मित्र भेटला की त्याच्याशी गप्पा ठोकायला सुरवात. शेवटी गाडी चुकायचीच मग नाही का, असं होतं आहे बघा. तेंव्हा आपण शब्दशक्तीला शरण जावं. ते माझं म्हणणं. शब्द शक्तीला शरण जाणं म्हणजे काय? की शब्दामधे दोन अंग आहेत, एक उच्चार आणि दुसरा अर्थ अशी दोन अंग आहेत शब्दाला. तेव्हा आपण शब्दाला शरण जाणे म्हणजे शब्दाला चिकटून अर्थाला शरण जाणं हे शब्दाला चिकटणं आहे. बरं राम म्हणजे काय ? राम म्हणजे दाशरथी राम नव्हे. आपला एक गडी आहे राम तो नव्हे. राम म्हणजे परमात्माच. मग परमात्मा असा जर राम शब्दाचा अर्थ असेल आणि तो परमात्मा सर्वव्यापी आहे तर तो माझ्यामधे आहे. तर नाम घेताना माझ्या अंतरात जो कोणी आहे मी खरा त्यांचं स्मरण मला व्हायला पाहीजे म्हणजे नामस्मरण बरोबर झालं, नाही का. ही फार मोठी झाली ज्ञानाची भाषा.
भक्तीची भाषा म्हणजे नाम घेताना ते माझ्या जवळ आहेत कारण मी नामाला धरलं आहे ही भावना ठेवणं. म्हणून म्हणाले
'जेथे नाम तेथे माझे प्राण'.
मग नाम बरोबर केव्हां चालचं आहे. नाम घेताना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजे नाम बरोबर चाललं आहे. बरं अस्तित्वाची जाणीव होणं म्हणजे काय ? जितका मी मला खरा आहे तितके ते मला खरे वाटले म्हणजे अस्तित्वाची जाणीवा खरी आहे. त्यांच्या अस्तित्वाची जाणीव वाढवणं हाच परमार्थ आहे.
*********
*संकलनःश्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment