TechRepublic Blogs

Monday, March 17, 2025

शुद्ध आत्मा

 पु.श्री.रामकृष्ण म्हणाले " ज्ञान बाहेरच्या दिवाणखान्यापर्यंत जाऊ शकते. भक्ती अंतरमहालात जाते. शुद्ध आत्मा निर्लिप्त आहे. विद्या आणि अविद्या दोन्ही त्यांत आहेत. पण तो निर्लिप्त आहे. वायूला कधी सुगंध येतो,तर कधी दुर्गंध येतो; पण वायू स्वतः निर्लिप्त असतो. व्यासदेव यामुनेच्या पार जायला निघाले होते. गोपीही तिथे येऊन हजर झाल्या . त्यांनाही पलीकडे जायचे होते. दही दूध लोणी वगैरे विकायला त्या निघाल्या होत्या. परंतु नाव नव्हती. 

कसे काय करावे या विचारात सगळ्या होत्या. अशावेळी व्यासदेव त्यांना म्हणाले की मला खूप भूक लागली आहे. तेव्हा त्या गोपी त्यांना सर्व खवा साय लोणी वगैरे सारे खाऊ घालू लागल्या. व्यासदेवांनी सारे सर्व खाल्ले. हे सगळे आटोपल्यावर मग व्यासदेव यमूनेला संबोधून म्हणाले की ' हे यमुने मी जर काही खाल्ले नसेल तर तुझे पाणी दुभंगेल आणि मधल्या वाटेने आम्ही चालत जाऊ.' आणि अगदी तसेच झाले. यमुना दुभंगुन गेली. मध्ये पैलतीरी जाण्याची वाट झाली. 

त्या रस्त्याने  व्यासदेव आणि गोपी असे सगळेजण चालत पलीकडे निघून गेले. ' मी खाल्ले नाही ' असे जे व्यासदेव म्हणाले याचा अर्थ हाच की ' मी तोच शुद्ध आत्मा आहे ' शुद्ध आत्मा हा निर्लिप्त आहे - प्रकृतीच्या पलीकडे आहे. त्याला क्षुधा तृष्णा नाही, जन्म मृत्यू नाही . तो अजर अमर आहे, सुमेरुवत आहे."

No comments:

Post a Comment