श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट.
लेखांक -५.
लेखांक- पांचवा.
************************
पुष्कळ लोकांना असं वाटतंय की ,
आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एवढी मोठी सेवा केली, तरी महाराज
आपल्यावर प्रसन्न का बरं होत नाहीत ? त्यांची आमच्यावर कृपादृष्टी का होत नाही? पण ही आपली केवळ एक प्रकारची भ्रांती आहे. ह्याला महत्वाचे कारण म्हणजे आपल्या मागील जन्माचे भोग सुद्धा असू शकतात.सर्वांनाच दु:खे असतात. दु:ख व संकटे ही एकामागून-एक येतच राहिली, तर आपलं मन खट्ट होते व आपल्याला वाटते की , हे देवा ही संकटे व दुख्खे माझ्याच वाट्याला एवढी का ? ह्याला कारण आपला मागील जन्म आपल्याला माहीत नाही. मी एवढे नामस्मरण करतो तरी पण महाराजांना आपली दया येतच नाही असे का ? व शेवटी मनात निराशेचे भाव येतात व मग आपण नामस्मरण सोडून दिले पाहिजे हे ही विचारही मनात येऊ लागतात, पण अशा विकल्पांना आपल्या जीवनात अजिबात थारा देऊ नये. आपण देवांचे नामस्मरण करीत राहावे, कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांचीही इच्छा हीच असते की, आपण प्रारब्धभोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे. आपले स्वामी तर इतके कनवाळू -दयाळू आहेत की, ते दु:खातही आपल्याला एखादा आशेचा किरण, सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात. जेणेकरून आपल्या प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते. अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणींच्या काळात आपला मार्ग सुखकर करत राहतात. म्हणूनच नामाला कधीच सोडू नये, कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपली साधना फळाला येत नाही हेच स्वामी विद्यारण्यांच्या दृष्टांतातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे. दु:ख-संकटे असतील तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते. म्हणूनच,
भ्रम-भोवऱ्यात अडली, नौका कधी ना बुडली ।
धरूनी सुकाणू हाती बसलेत स्वामीराया ॥
आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामीकृपाच! दुसरं काहीच नको ही एकच भावना आपल्या मनात असावी व ती भावना आपल्या हृदयात नेहमी करता निरंतर अशीच असू द्यावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे. बाकी सर्व अशाश्वत असतं आणि म्हणूनच दु:खदायकही असतं. यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तरच स्वामींच्या अस्तित्वाची प्रचीती येते आणि मग सुख-दु:खासारख्या क्षुल्लक गोष्टींच्या बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाहीत. कारण स्वामी माउली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती! दाय म्हणजे देणारा-सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे तो! फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे माउलीवर!
एकदा असे घडले कि , श्री स्वामी समर्थ व त्यांचे भक्त निवडुंगाच्या बनाजवळ येतात तेव्हा तेथे आल्यावर चोळप्पा वगळता बाकीची सर्व मंडळी थबकली. एकटा चोळप्पा मात्र कसलीही शंका मनात न घेता निर्भय होऊन निष्ठेने स्वामींच्या मागे चालत राहिला आणि काय आश्चर्य! एकही काटा चोळप्पाच्या पायात मोडला नाही. जणू काही ते काटे नव्हतेच फुलांचा गालिचाच अंथरला होता. स्वामी आपल्या परमभक्ताच्या निष्ठेची परीक्षा घेत असतात. प्रारब्धाने कितीही दु:ख संकटे आली तरी भक्तांची भगवंताच्या चरणांवर अढळ श्रद्धा आहे की नाही ते पहातात आणि एकदा का भक्त त्यांच्या परीक्षेला उतरला की स्वामींच्या कृपेला सीमाच राहात नाही. स्वामी अक्कलकोटास प्रगट होण्यापूर्वी चोळप्पा यांना अनेकांनी अनेक ठिकाणी पाहिलेले असल्याचे आढळून आले. ते अक्कलकोटास येऊन राहिले तेव्हा ते एकच जागेवर स्थिर असताना सुद्धा ते मात्र त्यांच्या भक्तांना अनेक ठिकाणी उपस्थित असताना दिसत असायचे.
स्वामींची वृत्ती पाहिली तर ती श्रीनृसिंहसरस्वतींच्या वृत्तीपेक्षा कित्येक दत्तावतरांशी अधिक जुळतेशी दिसते. महाराजांचे रुप कधी कधी फारच विलक्षण प्रकारचे दिसत असे. त्यांच्या अशा प्रकारच्या वृत्तीस कित्येक लोक त्यांची ती पिशाचवृत्ती आहे असे समजत असत. प्रात:काळ होण्याबरोबर नित्य नेमाने उठून संन्यास धर्मास योग्य असा प्रात:स्नानादिक जप, तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काहीएक करण्याचा त्यांचा नेम नव्हता. ते स्वच्छंदाने केव्हाही उठत तरी सुद्धा त्यांच्या भक्तांच्या द्वारे सर्व काही कारभार होत असे. महाराजांची आंघोळ जेव्हा दुसरे कोणी घालत असे तेव्हा आपली आंघोळ व्हावी असे जेव्हा महाराजांना वाटे त्याच वेळी त्यांची आंघोळ होत असे. महाराजांस जेवण दुसऱ्यांनीच घालावे, परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागल्यास. महाराजांच्या अंगावर पांघरूण दुसऱ्यांनीच घालावे. परंतु ते अंगावर असावे असे त्यांस वाटल्यास. महाराजांनी मनाला वाटेल त्या ठिकाणी जावे, ती जागा मग राजाचा रंगमहाल असो, अगर स्मशानभूमी असो,
वाळवंट असो किंवा निवडुंगाची जागा असो. महाराजांस प्रतिबंध करणारा कोणी नसे. महाराज जो घास भरविल त्याच्या हातचे अन्न ते खात असत. परंतु महाराज अधर्मी होते, अशी कल्पनाही कोणास वाटत नसे. महाराज कधी कधी दिवसातून दोन दोनदा स्नाने करीत. केशराच्या व चंदनाच्या उट्या अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत. कधी कधी आठ आठ दिवस स्नानच करीत नसत. कोणास न कळत एखाद्या बागेत अगर स्मशानात अगर जंगलात जाऊन रहात. महाराज जेव्हा रस्त्याने चालायचे तेव्हा त्यांची बरोबरी कोणीही करू शकत नसत. ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काहीतरी बोलत असत. हुक्का ओढू लागले, म्हणजे एकसारखा हुक्काच ओढीत बसत. लहान मुलांजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखा खेळच चालावा. एखादे वेळी स्वारी रागावली, म्हणजे सात सात दिवस त्यांचा रागच हालू नये. आनंदात स्वारी असली, म्हणजे सर्वांजवळ मधुर वाणीने बोलावे. अशा प्रकारची महाराजांची दर घटकेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्यावाचून कोणालाच झाली नाही.’ नामाला कसलीही उपाधी नाही; काळ वेळ नाही, लहानथोर नाही. कृपा व्हावी, अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पाने जरी नामाची सुरूवात झाली तरी हरकत नाही. नाम आपले काम करतेच. नामाच्याच प्रभावाने हळुहळू ते नाम आपल्या ह्र्दय महाराजांसाठीच घेतले जाऊ लागते आणि स्वामीनामावर आपले प्रेम कधी जडले ते आपले आपल्यालाच कळत नाही. कारण ही किमयादेखील स्वामीच करतात. हा नामाचा प्रभाव आपल्या नकळत आपल्याच अंत:करणावर होतो.
💐निवेदन व प्रस्तुती :-
श्री वामन रुपरावजी वानरे.
No comments:
Post a Comment