🕉️ *अष्टावक्र गीता/अध्याय सहावा/भाग २*🕉️
*जनकमहाराजांची विचारसरणी*
जनकमहाराजांच्या विचार करण्याच्या क्षमतेची चाचणी सद्गुरु अष्टावक्र घेत आहेत. त्यासाठी त्यांनी जनकमहाराजांना देहाभिमान , संसार , मिथ्या असलेलं जग या तीन गोष्टींचा त्याग कर , तसेच सुख दुःख , आशा निराशा , जीवन मृत्यू हे सर्व समान मानून मोक्ष मिळव असं सांगितलंय.
मागील भागात देहाभिमान त्यागणे हा विषय आत्मज्ञानामुळे केव्हाच मागं पडलाय कारण हा देह जाओ अथवा राहो काहीच फरक पडत नाही. मग त्याविषयी अभिमान वाटणं तर दूरच ! असं जनकमहाराजांनी सांगितलं आणि असंच उत्तर मुनींना अपेक्षित होतं.
आता संसार , मिथ्या असलेलं जग या दोन गोष्टींच्या त्यागाबद्दल , तसेच सुख दुःख , आशा निराशा , जीवन मृत्यू हे सर्व समान मानण्याबाबत जनकमहाराजांनी दिलेली उत्तरे आपण समजून घेऊ. ही अशी उत्तरे फक्त आत्मज्ञानी माणूसच देऊ शकतो. कारण त्याची मानसिक स्थिती सर्वसामान्य माणसांच्यापेक्षा बरीच वरची असते आणि ती तशी व्हावी म्हणून कोणताही प्रयत्न त्याने केलेला नसतो. म्हणजेच ती त्याला त्याच्या सहजात्मस्वरूप भावानं प्राप्त झालेली असते. बा भ बोरकरांच्या सारख्या प्रतिभावंत कवीनं जनकमराजांच्या वरील कथनातला आशय समजून घेऊन केलेली खालील रचना मनाचा ठाव घेते.
नाही पुण्याची मोजणी
नाही पापाची टोचणी
जिणे गंगौघाचे पाणी
कशाचा न लागभाग
कशाचा न पाठलाग
आम्ही हो फुलांचे पराग
आम्हा नाही नामरूप
आम्ही आकाश स्वरूप
जसा निळानिळा धूप
पूजेतल्या पानाफुलां
मृत्यु सर्वांग सोहळा
धन्य निर्माल्याची कळा
जनकमहाराज पुढं म्हणतात , " मुनिवर्य , आपण म्हणताय की , मनात उठणाऱ्या विचाररूपी लाटांचा त्याग कर पण गुरुजी आत्मज्ञानाच्या बळावर मी स्वतःला समुद्र समजतो आणि समुद्राच्या लाटा समुद्रापासून वेगळ्या करता येत नाहीत कारण त्या समुद्राचाच भाग असतात त्यामुळे मला कुणाचा राग येणे किंवा मी कुणाला क्षमा करणे हे घडणेच शक्य नाही.
*मला कुणाचा राग येणं आणि मग मी त्याला क्षमा करणं हे घडणेच शक्य नाही* जनकमहाराजांचं हे वाक्य समजण्यासाठी आपण एक उदाहरण पाहू समजा एखादा लहान मुलगा अमुक एक खेळणं आत्ता लगेच पाहिजे म्हणून हट्ट धरून बसलाय. भले उद्या ते खेळणं त्यातलं नावीन्य संपल्यामुळे एखाद्या कोपऱ्यात पडलेलं असेल ! पण जर त्याची आत्ता समजूत काढायची झाली तर जाऊदेना , लगेच कशाला पाहिजे ? उगीच हट्ट करू नकोस , असं म्हणून तो ऐकणार नाही. त्याचा हट्ट चालूच राहणार आहे कारण तो लहान असल्याने असं काहीतरी सांगून त्याची समजूत पटणार नाही. अशा पद्धतीने त्याची समजूत पटण्यासाठी तो वयानं मोठा व्हायला पाहिजे.
कुणावर राग येणे व नंतर त्याला क्षमा करणे हे सर्वसामान्य माणसाचे विचार आहेत. आपले जनकमहाराज आता आत्मज्ञानामुळे बडे झालेले आहेत. त्यामुळे कुणाचा राग करणे नंतर त्याला क्षमा करणे ह्या गोष्टी त्यांच्या मनात येतच नाही. जसं वरील प्रसंगातील मुलगा वयानं मोठा झाला की , त्याच्या लक्षात येईल की , अरे किती क्षुल्लक गोष्टीसाठी मी हट्ट केला.
तसंच जनकमहाराजांना समोरच्या घटना एवढ्या क्षुल्लक वाटतायत की , त्यांच्या मनात एखाद्याचा राग येणं किंवा त्याला क्षमा करणं ही भावना संभवतच नाही. त्यामुळे त्यांना अमुक एक गोष्टीचा त्याग कर किंवा एखाद्याला क्षमा करून टाक अशा उपदेशाची गरज नाही. जनकमराजांच्या मनःस्थितीची कल्पना येण्यासाठी एकच उदाहरण देतो ते म्हणजे मुलाबाळांच्या , नातवंडांच्या बाबतीत आपली अशी अवस्था असते. आपण विनासायास त्यांचे अपराध पोटात घालू शकतो त्यासाठी आपल्याला इतर कुणी काही सांगायची गरज नसते. त्याचप्रमाणे समाजातील सर्वांच्या अपराधांना पोटात घालून क्षमा करणे जमू लागले की , समोरच्या घटना क्षुल्लक वाटू लागतात. आता कदाचित असे मनात येईल की , सगळ्यांना क्षमा करून मी का म्हणून माझे नुकसान करून घेऊ तर याचे उत्तर असे की , समोरची माणसे , त्यांची वर्तणूक , घटना हे सर्वच मिथ्या आहे तर परिणामही मिथ्याच असणार ही खुणगाठ मनाशी पक्की बसली की झाले !
जनकमहाराजांच्या मनाची प्रगल्भ अवस्था आपण आणखीन सविस्तर समजून घेऊयात ...
*क्रमशः*✍️
No comments:
Post a Comment