*कानाचं आत्मवृत्त*
जुळे आहोत आम्ही, सांगत होते दोन कान
पाहिलं नाही एकमेकांना, मर्यादीत आम्हा मान ॥१॥
कळत नाही आम्हा, विरुद्ध दिशा का ठेवलयं
समजत नाही नक्की, आम्ही वाकड काय केलयं ॥२॥
दु:ख नही एव्हढेच, जबाबदारी फक्त ऐकण्याची
शिव्या असो वा ओव्या, शिक्षा शांत राहण्याची ॥३॥
खुंटीगत वागवतात, नेहमी अडकवण्यासाठी आम्हा
काळजी डोळ्यांची, जणू काही केला आम्ही गुन्हा ॥४॥
दोन डोळ्यांच्या कमतरतेशी, आमचा काय संबंध?
कान नाक घसा, अमुचा जुना खासा अनुबंध ॥५॥
अभ्यास मुले करत नाहीत, पण लाल होतो आम्ही
गुरुजींची सटकते, अन पिळलो जातो आम्ही ॥६॥
बिकबाळी, डुल, कुडीसाठी आम्हा टोचायचं
सुन्दर दिसूनही कौतुक आमचं, कधी नाही करायच ॥७॥
डोळ्यासाठी काजळ अन चेहर्यासाठी क्रिम
आमच्या नशिबी एकही नाही, एखादी चांगलीशी स्किम ॥८॥
तारिफ़ होते प्रेमात, डोळ्यांची अन गालांची
विसरतात आम्हा जणू, जोडी काय ही कामाची ॥९॥
घाई होते जेव्हा, अन कानावरी पडे जानवे
टेलरची पेन्सिल नाहीतर हेडफोन सांभाळणे ॥१०॥
झाली जरी करमणूक तुमची, अमुच्या जीवावर
टवकारुनी धर्म पाळतो, काही पडता कानावर ॥११॥
श्रवणशक्तीने यतार्थ झालो, आम्ही कानसेन
आम्हीच निवडतो, लाखातला योग्य तानसेन ॥१२॥
अनिल ताटके
No comments:
Post a Comment