TechRepublic Blogs

Wednesday, March 12, 2025

रंग_चाळीशीचे

 रंग_चाळीशीचे

      परवाच फेसबुक वरती एक वाक्य वाचलं," माणसांच खरं जगणं हे चाळीशीनंतरच सुरु होत.".....विचार केला तर यात तथ्य आहे. कारण बालपण निरागस असतं. जगणं म्हणजे काय? हा प्रश्न तेव्हा नसतोच. तारुण्य हे करिअर,लग्न,मुले यांच्या मागे धावत राहतं. आणि शेवटी चाळीशी कधी येऊन टपकते हे कळतंच नाही. मग  या वयात जबाबदारीतून मुक्त होऊ पाहत असलेल्या माणसांना जगण्याचे वेध लागतात. जीवन,जगणं याचे खरे अर्थ उलगडू लागतात. राग,लोभ,अपेक्षा यांचे फायदे,तोटे समजू लागतात. याचं वयात भावनांवर थोडा ताबा येऊ लागतो. समाधान,शांती याचं गमक समजू लागतं. स्वतः:साठी देखील जगायचं असतं याची जाणिव होऊन माणूस आयुष्यातील काही क्षण स्वतः:साठी राखीव ठेऊ लागतो. दिवाळीचे पदार्थ संपत आल्यावरच ते जास्त खावेसे वाटतात ...अगदी तसंच आयुष्याचं असतं....ते संपत येत असत...आणि तेव्हाच ते खूप जगावस वाटतं. कारण आयुष्याच्या याच टप्प्यावर या क्षणभंगुर आयुष्याचा अर्थ कळायला लागतो. आपलं आयुष्य हे आपल्यासाठी ही जगायचं असतं....इतरांकडून अपेक्षा करत राहण्यापेक्षा स्वतः:कडून अपेक्षा करुन आनंदी रहायचं असतं....रुसवे,फुगवे सोडून छान प्रेमाने रहायचं असतं.रागावर नियंत्रण ठेवून स्वतः:चं मानसिक आरोग्य जपायचं असतं...आणि जगताना या जगात आपण आणि आपलं आरोग्य हेच खूप महत्त्वाचं असतं. हे सारं याच वयात समजायला लागतं. आणि म्हणूनच माणसाला उरलेलं आयुष्य स्वतः:साठी ,स्वतः:घ्या इच्छापूर्तीसाठी  जगायचं असतं. मनात खोलवर अनेक स्वप्नं गाढलेली असतात. ती पुन्हा जगायची असतात.लोकं काय म्हणतील? हा प्रश्न आता तसा बोथट झालेला असतो. आता फक्त पैलतीर दिसत राहतं. म्हणूनच मरण्याआधी राहून गेलेले क्षण पुन्हा खुणावत राहतात. आणि म्हणूनच चाळीशीचे रंग सुंदर आणि स्वच्छंदी वाटतात......तेच पुन्हा नव्याने खुलू पाहतात. त्यांचं त्या़ंच एक आकाश त्यांना गवसतं.त्यात ते पुन्हा नव्याने विहरत राहतात. त्यांचे त्यांचे थवे तयार होतात.आणि पुन्हा ही गद्य चाळीशी नवा रंग उधळत राहते...त्यांच्या क्षितिजावर....

हो...हे असं व्हायलाच हवं. तऱच जगणं सार्थकी लागतं. या वयात थोडं व्हावं मोकळं...जबाबदाऱ्यांमधून...थोडा मुक्त श्वास घ्यावा....आणि जगावं बेधुंद होऊन....शेवटी मृत्यु अटळच आहे ना! मग तो येण्याआधी घ्यावं की जगून! मला इथे गुलजार यांची एक शायरी आठवते...,

"जो लम्हा साथ है,उसे जी भरके जी लो...कम्बख्त ये जिंदगी,भरोसे के काबील नहीं....

अगदी खरं आहे. जगताना आपण कशाच्या मागे धावतोय,किंवा धावायला हवं हेच माणसाला लवकर कळत नाही. आणि कळलं तरीही अनेक जबाबदाऱ्या त्याला विळख्यात बांधून ठेवतात. आणि म्हणूनच अनेक सुंदर क्षण हातातून निसटून जातात. म्हणूनच रंग चाळीशीचे समजून घ्या. शांत,निरपेक्ष राहून या सुंदर सृष्टीचा,क्षणांचा आनंद घ्या. असं म्हणतात की, वयाला हरवायचे असेल तर ,आपले छंद जिवंत ठेवा. मित्रांना जपा,त्यांच्यासोबत वेळ घालवा. याचं वयात अनेक आजार झडप घालायला येऊ पाहतात. पण जर का आपण चाळीशीचे रंग ओळखून उत्साही जगणं निवडलं ...तर हे आजारही घाबरून पळून जातात. या वयात रागावर नियंत्रण यायलाच हवं. स्वतः:ला जे जे वाटतं ते ते मस्तपणे करता यायला हवं.अर्थात हे सारं सकारात्मक ,आनंद देणारं आणि इतरांना हानी न पोहोचवणारं असावं.जाता जाता इतकंच...

रंग चाळीशीचा उधळून द्यावा...

जगण्याचा उत्सव समजून घ्यावा.

No comments:

Post a Comment