TechRepublic Blogs

Saturday, March 22, 2025

इंद्रधनुष्य

 *_🍁 एक अतिशय सुंदर कथा. मानसिक तणावात असलेल्या स्त्री ची... अन् तिला समजावणा-या डाॅक्टरची...._*


*एकाकी इंद्रधनुष्य!* 🌈


💫🪐💫🪐💫🪐💫


"काही दोष आहे का डॉक्टर माझ्या शरीरात?"  शांत आवाजात तिनं विचारलं, पण तिच्या कपाळावरच्या फुगलेल्या रक्तवाहिन्या तिच्या मनातल्या तणावाची जाणीव करून देत होत्या.


"अजिबात नाही", मी म्हणालो, "तुमची संपूर्ण शारीरिक तपासणी अगदी नॉर्मल आहे. थोडासा हार्ट रेट जास्त आहे, पण ते कदाचित तुमच्या मनातल्या तणावामुळे असेल".

 

तिच्या मनगटावरच्या जुन्या कापल्याच्या व्रणांबद्दल मी मुद्दामच काही बोललो नाही. आत्महत्येचे प्रयत्न केल्याच्या त्या खुणा होत्या.

 

केवळ चोवीस वर्षांच्या या युवतीला गेले काही महिने सतत डोकेदुखी आणि निद्रानाशाने हैराण केले होते. त्यात आताशा एकदम धडधडणे, भीती वाटणे, घाम फुटणे, अचानक श्वास कोंडणे असे प्रकार सुरु झाले होते. हृदयाच्या तपासण्या अगदी नॉर्मल होत्या.

 

"मग तुम्हाला काय वाटतं? मला वेड लागलं असावं का?" तिनं इतक्या शांत आवाजात विचारलं, की समोरच्याला भीतीच वाटावी. तिच्या डोळ्यातलयी ओल वाढली, आणि हळूहळू त्यात लाली पसरायला लागली. किती विचित्र प्रकार असतो हा, की आपण स्वतःला इतक्या सहज वेडे म्हणू शकतो, पण तेच जर इतर कोणी म्हणालं तर आपण दात ओठ खाऊन भांडायला उठतो!

 

थोडासा तिचा मूड हलका करण्याकरिता मी हसून म्हणालो, "मला भेटणाऱ्या लोकांपेक्षा तुम्ही किती जास्त किंवा कमी वेड्या आहेत ते मला कळत नाहीये! पण तुमची परवानगी असेल तर मी तुम्हाला काही खाजगी प्रश्न विचारू इच्छितो".

 

तिनं पर्समधून एक पाण्याची बाटली काढून थोडंसं पाणी पिलं. त्या बाटलीवर एक विचित्र पण सुंदर पेंटिंग केलेलं दिसलं. त्याची रंगसंगती इतकी लोभस होती की तिनं ती बाटली टेबलवर ठेवल्यावर मी काही वेळ ते पेंटिंग निरखून पहात राहिलो.

"विचारा डॉक्टर " ती काही वेळानं म्हणाली.

 

"मला वाटतं तुम्ही खूप मानसिक तणावात आहात. याविषयी बोलण्याची तयारी आहे का तुमची आज?" मी सावधपणे विचारलं.

 

"अवघड आहे ते सांगणं, डॉक्टर! माझं कुणाशी फारसं पटत नाही. म्हणजे मला लोक आवडत नाहीत वगैरे असं काही नाही, पण मला वाटतं की मला फारसं कुणी समजून घेत नाही, माझे विचार वेगळे आहेत, मग मीच सगळ्यांपासून थोडीशी दूर  राहते" ती म्हणाली.

 

"असं सगळ्यांनाच थोड्याफार फरकानं वाटतं" हे मी तिला म्हणणार, तेव्ह्ढ्यातच ती अचानक ताठ बसून, हसून म्हणाली "डॉक्टर, मी तुम्हाला काही खाजगी प्रश्न विचारले तर चालतील का?"

 

हे अवघडच झालं! पण जर तिचा प्रश्न सोडवायचा असेल, तिला बोलती करायची असेल तर हेही करून बघूया, असा विचार करून मी जरासा तिरसटपणेच म्हणालो "बरं, विचारा".

 

"डॉक्टर, तुम्हाला कधी खूप दुःख झालंय का कशाचं? कधी लोकांच्या वागण्याचा खूप त्रास झालाय का?" तिनं विचारलं. 

याचं उत्तर अगदी सोप्पं आहे! जगात कोणीही या प्रश्नांचं "नाही" असं उत्तर देणार नाही, हे मी तिला सांगितलं. "होतो कधीकधी लोकांचा त्रास. दुःखही होतं कधीकधी" मी म्हणालो.

 

लगेच उत्साहानं ती म्हणाली "पण यामुळे तुम्ही बदलून गेला आहात. तुमचा मूळ स्वभाव हा आता दाखवताय तसा मुळीच नाहीये ना? तुम्हाला खूप भरभरून हसायला आवडतं, पण तुम्ही आत्ता हा गंभीरतेचा परका मुखवटा लावून इथे बसला आहात! तुम्हाला आवडत्या लोकांची ताटातूट होण्याची भीती वाटते, म्हणून तुम्ही लोकांना जवळच येऊ देत नाही. 


कदाचित कुणी तुमच्या मनावर खूप ओरखडे काढलेत, जवळ केल्यावर. तुम्हाला प्लास्टिकचा चरचर आवाज अजिबात आवडत नाही. पांढरा रंग तुमचा सर्वात आवडता आहे. तुम्ही खूप स्वाभिमानी आहात, आणि कोणी टीका केलेली तुम्हाला आवडत नाही. 


अतिशय संवेदनशील आहे तुमचं मन, भावनेच्या आहारी पटकन जाण्याची तुमची वृत्ती आहे, पण हे सगळं लोकांपासून तुम्ही खूप खुबीनं लपवता. काहीही झालं तरी कॉम्प्रमाइज न करण्याचा तुम्ही अट्टाहास करता, त्याचा त्रास झाला तर तोही निमूट सहन करता"..

 

बापरे! मी जरासा सावरून तिला मधेच म्हणालो:  "थँक यु, पण आत्ता या वेळी मी तुमचा डॉक्टर आहे आणि तुम्ही पेशंट आहात, तुमचे प्रॉब्लेम आपण सोडवायचा प्रयत्न करूयात, माझ्या स्वभावाचं नंतर बघू". माझा चेहरा मी लगेच "डिफेन्स मोड" मध्ये सेट केला.

 

"रागावू नका, डॉक्टर. फक्त एक शेवटचा प्रश्न विचारते: तुम्ही तणावाखाली असता का नेहमी?"  ती निरागसपणे म्हणाली.

 

"हो, रुग्णांमध्ये इन्व्हॉल्व्ह होणारा प्रत्येकच डॉक्टर अतिशय तणावाखाली जगतो" मी खरं ते तिला सांगितलं.

 

" Exactly तोच माझा प्रॉब्लेम आहे डॉक्टर! मी खूप खूप संवेदनशील आहे. 

नेहमीपेक्षा जरा जास्तच. लोकांच्या भावना मला लवकर कळतात, कुणालाही वाईट वाटत असेल तर मला वाईट वाटतं! ताटातल्या अन्नात मांस असेल तर मला त्या बिचाऱ्या मूक जीवाचं दुःख कळतं, त्याची तडफड जाणवते! त्याकडे दुर्लक्ष करण्याइतकी ताकद नाहीये माझ्यात अजून, आणि मला ती नकोय! देवानं मला ही सुंदर जाणिवेची शक्ती दिलीय, पण सगळे मला याविषयी अपराधी ठरवतात.".

 

पुन्हा त्या विचित्र सुंदर बाटलीतून पाण्याचा एक घोट पिऊन ती म्हणाली "मी प्रोफेशनल आर्टिस्ट आहे, डॉक्टर. माझी पैंटिंग्स, क्राफ्ट्स भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहेत. माझा नवरा एका मोठ्या कंपनीत डायरेक्टर आहे, खूप बुद्धिमान आहे, पण त्याला पैसे आणि गुंतवणूक यापलीकडे काहीच सुचत नाही.  तो मला "अपंग"  असल्यासारखा वागवतो, 'being  sensitive  is  the  worst  weakness  in  today's  world' असं त्याचं ठाम मत आहे. 


खरंच, त्याला वाटतं मी वेडी असावी, तो सारखं मला मानसरोग तज्ज्ञांचे सल्ले घायला सांगतो. आम्ही भेटलोही दोन प्रसिद्ध डॉक्टरांना. माझ्यात काही दोष नाही, असं त्यांनी त्याच्या समोर सांगितलं, पण त्याचा काही विश्वास बसत नाही".

 

"त्याचाही दोष नाही. आजकाल जवळपास सगळेच असा विचार करायला लागलेत. एखादी व्यक्ती जरा जास्त सेन्सिटिव्ह, इमोशनल असली, की लगेच ती लोकांच्या थट्टामस्करीचा विषय बनते. माझ्या कॉलेजच्या दिवसांत मी दोन वेळेस 'प्रेम' या शब्दाच्या जादूने भारावून फसले. आता लाज वाटते, पण दुसऱ्यांदा फसल्यावर आत्महत्येचाही प्रयत्न केला मी. सहनच होत नव्हतं त्या वेळेस.


 त्यानंतर मात्र मी कुणातही फार इन्व्हॉल्व्ह होत नाही. लग्न केलं ते त्यानं मागणी घातली, घरच्यांनाही तो आवडला होता, प्रयत्न करूया असं म्हणून. पण तिथेही चुकलं माझं. आता मी पूर्ण वेळ माझ्या आर्ट मध्ये हरवून बसते: पैसे मिळतात म्हणून नाही, तर त्यातून मला oxygen  मिळतो जगण्यासाठी, म्हणून".

 

मी काही तिला थांबवलं नाही. तिचा आजार बाहेर पडत होता हळूहळू!

 

"डॉक्टर, खूप लोकांना न दिसणारी, कळणारी सुंदरता मला दिसते. लोकांना अगदी स्वतःमध्ये असलेले माहित नसतात तेही गुणदोष मला पटकन कळतात. 


माझं जग वेगळं आहे, माझ्या कल्पना वेगळ्या आहेत ते मात्र कुणाला समजत नाही. पैसे, कपडे, जेवण, टीव्ही, राजकारण यांसारख्या गोष्टींत मला कणभरही रस नाही, पण याशिवाय कुणाशीही बोलायची काही शक्यताच नाही! गॉसिप, निरर्थक चर्चा, भंपक आणि वरवरचं कृत्रिम बोलणं आणि वागणं या कचकड्याच्या जगात मी मिसळूच शकत नाही! संगीत, कला, निरागसता, याविषयी मनापासून, पैशाचा, व्यावसायिकतेचा अजिबात संदर्भ न देता बोलणारं कुणी भेटलं, तर मी स्वतःला नशीबवान समजते.. पण असं वाटतं की फारसा कुणाला  विचारच करायचा नाहीये.. सगळ्यांना फक्त रिऍक्ट करायचं आहे, आपापली ठाम मतं मांडायची आहेत".

 

तिचं निदान आता मला कळलं होतं: निव्वळ काळ्या-पांढऱ्याच्या चक्रात अडकलेल्या या जगातलं  ती एक सुंदर, सप्तरंगी एकाकी इंद्रधनुष्य होती!

 

हे काही वैद्यकीय पुस्तकांमधलं शास्त्रीय निदान नाही. पण त्याबाहेरही माणसांचे खूप आकार-विकार आहेत.

 

काही थोड्या, दुर्मिळ लोकांसारखी ती अतिशय वेगळी, जिनिअस या प्रकारात मोडणारी होती. यांचं जगच वेगळं, आणि जगाची त्यांची अनुभूतीही वेगळीच! तरल, सुंदर, भावनांच्या यांच्या जगाची कल्पनाही कमीच लोकांना समजणारी. ज्यांचं अस्तित्वही फार लोकांना माहित नाही, 


कळत नाही, अशा भावभावना, संवेदना यांना कळतात. पण ज्या जगाचे विधिनियम "पाचामुखी परमेश्वर" या तत्वावर आधारलेले  आहेत, त्या "ऍव्हरेज इज नॉर्मल" तत्त्वज्ञानाच्या समाजाला 'वेगळेपण' आणि 'वेड' यातला फरक कसा कळणार? अशा समाजात खूप चांगलं असो अथवा खूप वाईट, दोन्ही "ऍबनॉर्मल", बहुतेक वेळा "वेडेपणा"च समजला जातो!

 

 

काळाच्या पुढे असणारे, समाजाच्या मानाने ज्यांची बुद्धिमत्ता, विचारसरणी आणि आकलनशक्ती या तिन्हींची पातळी फार वरची आहे अथवा वेगळी आहे .अशा लोकांना आपला समाज समजून घेणे तर सोडाच, पण अतिशय विचित्र वागणूक देतो. अशा लोकांना एकाकी पाडले जाते, त्यांच्यावर वेडेपणा, विचित्रपणाचे आरोप केले जातात, त्याची सार्वत्रिक हेटाळणी, थट्टामस्करी केली जाते. असे लोक कधी हैराण होऊन समाजमनाच्या अपेक्षांना बळी पडून त्याचे गुलाम बनतात तर काही स्वतःला खरंच वेडे समजायला लागतात. काही तडजोड करू शकत नाहीत म्हणून आत्महत्या करतात, तर काही आयुष्यभर समाजाशी, त्याच्या गैरसमजांशी लढत राहतात.

 

 

"तुम्ही एकदम नॉर्मल आहात" मी तिला म्हणालो, "तुमचं इतरांशी पटत नाही कारण तुम्ही वेगळया आहात, तुमच्यात इतरांपेक्षा जास्त  चांगलं काहीतरी आहे. अनेक कलाकार, संशोधक आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जिनिअस लोकांना असा त्रास होतो. तुम्ही आता फक्त तुमच्या आर्ट कडे लक्ष द्या, लोक काय म्हणतात आणि समजतात याकडे दुर्लक्ष करा. 


अनेक मोठ्या लोकांचं मन, आयुष्य आणि कला त्यांच्यानंतर अनेक दशकांनी समाजाला कळाली. या जगात जसं तत्वाची, नैतिकतेची, आदर्शांची किंवा प्रेमाची भाषा कळूनही न कळणारे लोक आहेत, तसंच वेगळेपण, ओरिजिनॅलिटी देखील सहन न होणारे लोक आहेत. तुम्हाला समजून घेणारं  कुणी भेटलं तर ते तुमचं नशीब समजा, पण  त्यावाचून तुमचं कधी काही अडेल असं मला वाटत नाही. पण जर लोकांनी आपल्याला समजून घेतलंच पाहिजे, स्वीकारलंच पाहिजे असा हट्ट धरला, तर ती मात्र तुमची मोठी चूक ठरेल. मला वाटतं हेच तुमच्या आजाराचं कारण आहे".

 

तिला काही उदाहरण द्यावं म्हणून मी म्हणालो "एखाद्या इंद्रधनुष्याला जर वाटलं की रात्रीच्या अंधारानं आपली तारीफ करावी, तर ते शक्य नाही, कारण रात्रीच्या अंधाराला ते इंद्रधनुष्य कधी दिसतच नाही!".

 

तिला anxiety साठी काही साध्या गोळ्या देऊन मी परत पाठवलं. कौन्सेलर चा नंबर देखील दिला, पण ती नाही जाणार म्हणाली. सुमारे  महिन्याभरानंतर ती परत आली. तिच्या बुद्धिमत्तेचं तेज आणि आधीचाच सुंदर चेहरा यात आता एका उत्फुल्ल, प्रसन्न हास्याची भर पडून ती अगदीच वेगळी दिसत होती. एक गिफ्ट बॅग तिनं माझ्या हातात बळेच खुपसली.

 

"तुमच्यासाठी मी स्वतः बनवून आणलीय.. त्या दिवशी माझ्या लक्षात आलं की माझी ती पेंटिंग वाली वॉटर बॉटल तुम्हाला खूप आवडलीये. तशीच आहे, पण पेंटिंग वेगळं आहे.. तुम्हाला आवडेल असं" ..

 

उत्सुकतेनं न राहवून मी ती वॉटर बॉटल बॅगमधून काढली, आणि दंगच झालो. फार सुंदर रंगसंगती केली होती तिनं! त्या वॉटर बॉटलवर एका बाजूला एक सप्तरंगी इंद्रधनुष्य होतं, आणि दुसऱ्या बाजूला गर्द निळ्याशार  रात्रीवर चमकणारी चंद्रकोर होती.

 

"त्या दिवशी मला तुमच्या त्या उदाहरणातल्या  रात्रीची दया आली. बिचारीला कधीच इंद्रधनुष्य बघायला मिळत नाही.. म्हणून मी तिला ही चंद्रकोर दिलीय!" 


गूढ पण गोड हसत ती म्हणाली.

 

डॉ. राजस देशपांडे 

न्यूरॉलॉजिस्ट -Pune


*धन्यवाद ☞*

संकलन

*प्रा. माधव सावळे*




🍁🍁🍁🍁🍁🍁

No comments:

Post a Comment