TechRepublic Blogs

Sunday, March 9, 2025

अवतारी पुरुष

 श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट. 

 लेखांक -८.

 लेखांक - आठवा.

**********************

 श्री वामनबुवा वामोरीकर हे श्री स्वामींचे एकनिष्ठ शिष्य होते. श्री गुरुआज्ञा प्रमाण मानून त्यांनी ‘श्री गुरुलीलामृत’ हा ग्रंथ महाराजांचे जीवनावर  लिहिला. श्री नृसिंहसरस्वती स्वामी महाराज आळंदी हे थोर संत योगप्रक्रिया समजून घेण्यासाठी अक्कलकोटात श्री स्वामींकडे आले तेव्हा श्री स्वामींनी त्यांच्या मनातील भाव ओळखून समाधी लावली व त्यांना योग प्रक्रिया समजावली. श्री माटेबुवा, श्री स्वामी समर्थांची कीर्तन करून सेवा करीत असत. एके दिवशी कीर्तन प्रसंगी श्री माटे म्हणाले ह्या भवसागरातून आम्हाला कोणते चरण पार करतील? एवढे म्हणताच श्री स्वामी समर्थांनी आपले चरण पुढे केले. माटेबुवांचे लक्षात आले की, हे चरण आपणास उद्धरतील व त्यांनी कीर्तनात श्री स्वामी समर्थांचे पाय घट्ट धरले.

प्रसिद्ध क्रांतिकारक श्री वासुदेव बळवंत फडके हे जेव्हा श्री स्वामी समर्थ  महाराजांच्या दर्शनास आलेत, त्यावेळी त्यांनी आपली तलवार श्री स्वामी समर्थांपुढे ठेवली व श्री स्वामींचे हातातून ती प्रसाद म्हणून मिळावी अशी इच्छा करून महाराजांसमोर बसले. श्री स्वामी महाराजांनी ती तलवार झाडावर टांगून ठेवण्यास सांगितली व असे सूचित केले की, तू करीत असलेल्या कार्यात तुला यश येणार नाही. तेव्हा श्री वासुदेव बळवंतांनी ती तलवार आपल्याकडे वापस घेतली. ते त्यानंतर स्वामींना नमन करून गेले. श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्याविषयी केलेली भविष्यवाणी पुढे खरी झाली. वासुदेव बळवंत फडके यांनी नंतर जेव्हा  त्यांनी बंड केले ते बंड अखेर विफळ झाले.

अगदी सकाळी महाराजांचे भक्त त्यांना स्नान घालीत व त्यानंतर संध्या वगैरे आटोपून मग स्वामी समर्थ फक्त दोन आचमने घेत. नंतर त्यांना लंगोटी नेसवावी लागे. थोडा फराळ घेऊन त्यांना भक्तांचे दर्शनाकरीता बसवीत. श्री स्वामी समर्थ सर्व दर्शनच्छूंच्या मनातील कामना ओळखून त्यांच्या इच्छा पूर्ण करीत. श्री स्वामींची कीर्ती सर्व भारतभर पसरली व बडोदे, इंदोर, ग्वाल्हेर येथील संस्थानीक अक्कलकोट येथे दर्शनास येत. सरदार विंचुरकर आदी सरदार दर्शनास येत. ते स्वामींचे भक्त झाले. श्री स्वामी समर्थांचे समकालीन अवतारी पुरुष, सकलमत स्थापित श्री माणिक प्रभू महाराज, (हुमणाबाद) श्री नरसिंह सरस्वती (आळंदी), श्री जंगली महाराज (पुणे), श्री बीडकर महाराज हे श्री स्वामी समर्थांचे त्या काळातील अगदी जवळचे शिष्य होत. ह्या सर्वांनी त्या काळात तीन वेळा नर्मदा प्रदक्षिणा केली होती. त्याच वेळी जंगलातून जात असता त्यांना सिंहाची डरकाळी ऐकू आली होती व त्याच बरोबर तोच सिंह त्यांचेसमोर अगदी उभा राहिला तेव्हा श्री बिडकर महाराजांना स्वामींनी त्या रूपात दर्शन दिले. त्यांची भीती नष्ट झाली. श्री बीडकर महाराज अक्कलकोट येथे गेले असता श्री स्वामी समर्थांनी त्यांचेजवळ ते करीत असलेल्या किमयेची दक्षिणा मागितली. श्री बिडकर महाराजांना तांब्यापासून सोने करण्याची किमया अवगत होती. त्यांनी आनंदाने सदर किमयेचे उदक श्रीस्वामी समर्थांचे हातावर सोडले. व किमया करणे बंद केले. महाराजांच्या काळातील फाल्गुन वद्य १० रोजी ह्याच स्वामीभक्ताने देह ठेवला.

💐 निवेदन व प्रस्तुती :- 

 श्री वामन रूपरावजी वानरे.

 

No comments:

Post a Comment