श्रीराम,
अध्यात्म शास्त्र अभ्यासाचे अंतिम फल 'स्वरूप दाखवा गुरूराया || हे असते. किंबहुना संत सांगतात, नरदेह प्राप्त झालेल्या सर्वांचे परमध्येय स्वस्वरूप दर्शन हेच असायला हवे.
आपले सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय? हे शब्दात सांगता येत नाही. तो अनुभव आहे आणि त्या अनुभवापर्यंत फक्त सद्गुरूच घेऊन जातात. जीवाने मुक्त व्हावं हा त्यांचा संकल्प असतो आणि तशी कृपा ते सगळ्या साधकांवर करीत असतात.
सद्गुरू कृपा तेचि किली |जेणे बुद्धी प्रकाशली |सद्गुरूंची कृपा समजून घेण्यासाठी आपल्या बुद्धीचा विकास आपणच करायचा असतो. त्यासाठीचे मार्ग सुद्धा सद्गुरू, संत आणि शास्त्रानी सांगून ठेवले आहेत. संपूर्ण श्रद्धेने त्यांना शरण गेल्यास मार्ग आपोआप उलगडत जातात.
पण आपले काय होते, थोडा परमार्थाचा अभ्यास सुरु केला आणि त्यातील संकल्पना समजायला लागल्या की लगेच मला स्वरूपाचा कधी अनुभव येणार? असं होऊन जातं. अनुभव ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे. आपला शिष्य अधिकार संपन्न कधी होतोय, ह्याची सद्गुरू वाट पहात असतात. समर्थ म्हणतात - ऐक शिष्या येथीचे वर्म |स्वये तूचि आहेसि ब्रह्म | ये विषई संदेह भ्रम धरूचि नको || स्वरूप आहेच, ते कुठेही गेलेले नाही पण अविद्येमुळे आपल्याला त्याचे ज्ञान नाही.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment