चिंतन
श्रीराम,
बीज पेरल्याशिवाय अंकुरत नाही त्याचप्रमाणे अंतरंगी भक्ती रुजल्याशिवाय, त्याला शुध्द ज्ञानाचे खतपाणी घातल्याशिवाय प्रेमगंधाची फुले उमलणे शक्य नाही. आणि आनंदमय मधुर फळेही येणे शक्य नाही. भक्तीला सक्ती चालत नाही तर आसक्तीचीच आवश्यकता असते. सामान्य माणसाचे त्याच्याही नकळत त्याचे स्वतःवरच अधिक प्रेम असते. त्यामुळे अर्थातच सर्व प्रथम तो स्वतःचा स्वार्थ साधू पहातो. परंतु त्याचे प्रत्यंतर मर्यादित लाभाचे आणि अल्पकाळ टिकणारे असते. एकदा का गुरुकृपेचा स्पर्श झाला की जीवनजाण येते, दृष्टी प्रगल्भ बनते, आपपर भाव लोप पावतो व हळूहळू मी पणच वितळून जाते. मग जोपासलेले प्रेम निरपेक्ष बनते व सद्भावाने प्रवाहित होऊ लागते. साचलेले पाणी हळूहळू डबके बनते. ते ही मग तुडुंब भरून वाहत सुटते. वाढत वाढत त्याचे नदीत रुपांतर होऊन समुद्राच्या ओढीने त्याच्या विशालतेशी संपर्क साधून त्या महासागरात मिसळून एकरूप होण्याची अखंड प्रक्रिया चालूच रहाते. श्रीगुरू कृपेने साधकाचे जीवनही अशाच परिवर्तनातून जाते. त्याचे सीमित देह चैतन्य या महाचैतन्यात एकरूप होते.
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment