*🌹🌹||श्रीराम समर्थ||🌹🌹*
*श्रीमहाराजांनी श्रीरामाला सगुण रूपात भजला असला तरी त्यांना अपेक्षित असलेला राम फक्त दाशरथी, कौशल्यानंदन राम नसून बंधविमोचक, ग्रंथी भेद करणारा आत्माराम होता हे त्यांच्या वागण्यातून स्पष्ट होते. राम पाठात श्रीमहाराजांनी तसा उल्लेखही केला आहे. मानवी देहाचा नाश झाला तरी वासनामय देहाचा नाश होत नाही. त्यामुळे जन्म-मरणाचा फेरा चालूच राहतो. जोपर्यंत मी देह आहे या भावनेचा नाश होत नाही तोपर्यंत हे चक्र चालूच राहते. मनाच्या वृतींचा नाश केवळ नामस्मरणानेच होईल असे श्रीमहाराज स्पष्टपणे सांगत असे.*
*वरकरणी त्यांची साधना सगुण रूपाची होती. त्यामुळे साधना, भक्ती, दृढ होण्यास मदत होते. नाम साधनेतून ध्यान साधना होते. त्यातूनच सूक्ष्म अवस्थेत निर्गुणाच्याही पलीकडे असलेल्या परंतु आपल्यातच विसावलेल्या आत्मारामाशी एकरूप होणे हाच श्रीमहाराजांचा भक्तांना उपदेश होता. नाम हे शब्दाच्या परे असून नामसाधना ही अनुभूती देणारी साधना आहे असा श्री गोंदवलेकर महाराजांचा विश्वास होता आणि तेच त्यांनी प्रतिपादिले.*
*वृत्ती अंतर्मुख करून साक्षीभावाने रहा. इतर साधनांचे कष्ट न करता राम नामावर मन स्थिर ठेवा. मन व इंद्रिये आवरून उदासीन वृत्तीने प्रपंच करा. नामांत अखंड भाव ठेवून भगवंताची सत्ता माना. देहाला देह धर्माप्रमाणे वागू द्या पण तुमचे चित्त मात्र निश्चल ठेवा, तरच तुम्ही कर्म बंधनात सापडणार नाही हा श्री महाराजांचा उपदेशाचा गर्भितार्थ आहे.*
*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*
*परमपूज्य सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*
No comments:
Post a Comment