घाईघाईने प्रोफेसर काँलेजात शिरत होते, तर गेटवरच वाँचमनने हटकलं
काय सर, वहिनी नाहीयेत वाटतं घरी? ते थबकले जरा वैतागले सुद्धा, याला काय करायचय?
असं मनात म्हणत असताना त्यानी आपलं लक्षच नाही असं दाखवत सायकल स्टँडला लावली, आणि ते आत जायला वळले.. तरी वाँचमनने पाठ सोडली नाही
वहिनी नाहियेत का घरी?
कशा वरून?
तुम्हाला आज यायला दहा मिनिटं उशीर झाला आणि जेवणाचा डबा पण दिसत नाही
प्रोफेसर एकदम चमकले , खरच आज आपला डबाही राहिला आणि सकाळची न्याहरीही, त्यानी खिसा चाचपडला खिशात नेहमीची गोळीही नव्हती
वाँचमनला काही उत्तर न देता ते इमारतीकडे वळले.. ग्राऊंड पार करत असताना आज उशीर? आज उशीर?
हे त्याना किमान दहावेळा ऐकावं लागलं
खरच गेल्या बावीस वर्षात बोटावर मोजण्याइतकया वेळाच त्याना उशीर झाला होता
पण त्या मागची कारणं ही तशी होती
पण आजचं कारण? बायको भांडून माहेरी गेली म्हणून उशीर? ते ही या वयात? लग्नाला इतकी वर्ष झाल्यावर? एकुलत्याएका मुलीचं लग्न झाल्यावर?
लग्नात पाठवणीच्या वेळी बबी अगदी गळ्यात पडून मुसमुसत म्हणाली होती पप्पा आईला सांभाळा तिला एकटी पडून देऊ नका , तुम्ही कामात असलात की तुम्हाला कशाची आठवण रहात नाही
त्याना क्षणभर उगाच गिल्टी सुद्धा वाटलं काल आपण थोडं नमतं घ्यायला हवं होतं
ती काय वेगळं सांगत होती , रीतीला धरून काही गोष्टी कराव्याच लागतात
आता मुलगी डोळ्यासमोर रहावी म्हणून आपण हट्टाने गावातली स्थळं बघितली , केवळ बाहेरगावी मुलीला पाठवावं लागेल म्हणून सोन्यासारखी स्थळं नाकारली
आता गावातलं सुयोग्य स्थळ मिळाल्यावर काही रिवाज पाळावेच लागतात
मुलीच्या सासरे बुवांच आँप्रेशन झाल्याचं कळल्यावर त्याना भेटुन येणं गरजेचं होतं
हे अत्ता पटतय , काल नव्हतं पटत
म्हणून भांडली ती
दात टोकरताना कसं अडकलेल्या बडिशेपेबरोबर पेरूची अडकलेली बी सुद्धा बाहेर पडू शकते
भाताचं शीत जिभेवर येऊ शकतं तसं एकदा वाद सुरू झाल्यावर तिला काय काय मुद्दे आठवले
म्हणजे ही ते विसरलेली नाही हे ही प्रोफेसरांच्या कालच लक्षात आलं होतं
आपण फार अन्याय केला तिच्यावर ही त्रासदायक भावना त्यानी मनात स्थिराऊ दिली नाही
ते भर भर वरच्या मजल्यावर जायला निघाले , आज पहिला पिरियेड आँफ होता म्हणून बरं पण तरी टीचर्स रूम मधे शिरताना त्याना ऐकून घ्यावच लागलं
हे काय आज उशीर, उत्तरादाखल होकारार्थी मान हालवत ते बसते होणार होते इतक्यात कँटींनचा पोर्या आला त्याना एकदम चहाची तल्लफ आली त्याच नादात त्यानी चहा मागितला
एकदम दोघातीघानी उस्फुर्तपणे विचारलं मिसेस नाहियेत का घरी? प्रोफेसर चमकलेच
मग त्यांच्या लक्षात आलं त्याना सकाळचा चहा तिच्याच हातचा लागायचा तिच्या हातचे दोन कप ढोसले की ते कधी काँलेज मधे येऊन चहा प्यायचे नाहीत
आज त्यानी स्वत: केलेला चहा सुद्धा पिववला नसल्याने मोरीत ओतून दिला होता
ही इतकी कशी घुसली माझ्या आयुष्यात ? पोर्यानी चहा समोर ठेवला पण त्यांच्या तोंडाची चवच गेली
पुढच्या तासावर जायच्या आधी तयारी करत असताना मुलीचा फोन आला
पप्पा आई कुठाय, कितीवेळा घरी फोन केला उचलतच नाहीये
म्हणून नाईलाजाने तुम्हाला फोन केला , तुम्हाला काँलेजात फोन केलेला आवडत नाही ना?
आपण किती आपलं महत्व वाढवून ठेवलय ? मुलीशी जुजबी बोलून त्यानी फोन ठेवला
कसे वागतो आपण ? त्यानी स्वत:लाच विचारलं
एकदा तिचा फोन भाजी मंडईत हरवला ती म्हणाली मला काय करायचाय फोन? तर लगेच आपण हात आखडता घेतला, दिलदारपणे का नाही म्हणालो आपण घेऊया दुसरा फोन , सवय नसली की हातातल्या
या अशा गोष्टी हरवायच्याच
त्याना तासावर जाणं अशक्य झालं त्यानी रजा टाकायचं ठरवलं
काँलेजात येऊन रजा टाकणार? त्याचं उत्तर ठाम पणे दिलं "हो"
मस्टरवर सही न करता ते बाहेर पडले तर मुख्याध्यापक भेटले नमस्ते म्हणत ते आदबीने उभे राहिले
मुख्याध्यापकानाही प्रोफेसरांबद्दल आदर होता पी एच डी च्या उमेदवारांचे ते लाडके गाईड होते
प्रोफेसरांचे कितीतरी पेपर्स वेगवेगळ्या विद्यापिठात नावाजले गेले होते
त्यांच्या बद्दल आदर वाटणं साहजिकच होतं पण त्यानी पण आज वेगळाच प्रश्न विचारला
वहिनी नाहियेत का घरी ?
गोंधळून हे म्हणाले का हो? तुम्ही कसं ओळखलत?
शर्टाच बटण तुटलय.. सिफ्टीपिनेने झाकणं हे वहिनींचं काम नाही
ते नेहमीचं तेज नाही, काय झालय?मुख्याध्यपकानी त्यांच्या खांद्यावर हात टाकत त्याना आपल्या केबीनकडे वळवलं , दोघे बसल्यावर
प्रोफेसरानी मग मोकळेपणाने सांगितलं
कारण साधं होतं पण भांडण वाढत वाढत गेलं
मुख्यध्यापक म्हणाले रागाऊ नका तुम्हाला स्पष्ट जाणीव करून देतो म्हणजे गुंता सुटेल
कसली जाणीव?
तुमचं तुमच्या बायकोवर नितांत नितांत प्रेम आहे आणि तिच्याशिवाय तुम्ही स्वत:ला असुरक्षीत समजता
पण त्याच बरोबर.. ते बोलायचे थांबले
त्याच बरोबर काय सर?
तुमच्या मनात एक छुपा तुम्हाला माहीत नसलेला अहंकारही आहे
छे छे कसला अहंकार? आणि तिच्या समोर?
हो! छुपा अहंकार आणि तो ही तुमच्या नकळत आणि स्पेशल वहिनींसमोर
तुम्ही डबल ग्रँज्युएट आहात डाँक्टरेट मिळवली आहेत
आणि वहिनी अवघ्या मँट्रीक पास
पण एक सांगू? वहिनी माझ्या वडीलांच्या लाडक्या विद्यार्थीनी होत्या अतिषय ब्रिलियंट स्टुडंट
त्याना खूप शिकायचं होतं पण घरची पिरिस्थिती बेताची त्यात तीन तीन मुली
तुमचं स्थळ सांगून आल्यावर त्यांच्या वडिलानी लग्न ठरवून टाकलं तुमच्याकडूनही लगेच होकार आला
प्रोफेसराना एकदम त्यावेळचं तिचं छुईमुई रूप आठवलं
आपल्याला बेहद्द आवडली होती ती आपण भाळलो होतो तिच्यावर कविता केल्या, तासंतास बोललो होतो तिच्याशी, मग काय झालं?ते आपल्याच विचारात असताना मुख्याध्यापक बोलत होते
तुम्ही तुमच्या व्यापात व्यग्र झालात म्हणून तुम्हाला कळलं नसेल किंवा लक्षात आलं नसेल
पण कितीवेळा वहिनी तुमचे पेपर्स वाचायच्या
काय?
हो ! खरच!
नुसत्या वाचायच्या नाहीत तपासायच्या, एक दोन ठिकाणी स्पेलींग सुधारलेलं असायचं , नवीन परिछ्चेद सुरू करण्या विषयीची खुण केलेली असायची, कितीवेळा देवाजवळ पेपर ठेऊन दिलेले कळायचे
पेपरला हळदीचे किंवा कुंकवाचे डाग दिसले की आम्ही ओळखायचो
तुम्ही टायपींगला पेपर्स आणून दिलेत की भोईटे मला न चुकता दाखवायचा मला तुमचा स्टडी फार आवडतो
महत्वाचे मुद्दे मांडता तुम्ही
पण महत्वाचे मुद्दे मांडता मांडता तुम्ही हा फार महत्वाचा मुद्दा विसरलात, प्रोफेसर एकदम गुदमरून गेल्यासारखे झाले
मी घरी जाऊ सर ?
यस अफकोर्स, हवं तर माझी गाडी घेऊन जा
नको थँक्यु म्हणत ते केबीन बाहेर धावले
त्यानी जिना उतरता उतरता तिच्या माहेरी फोन लावला
जरा हिला फोन दे
ताई नाहिये घरी
अरे ती रागावली आहे माझ्यावर, तरी बोलाव तिला
काय? तुमच्यावर रागावली? पण असं काही म्हणाली नाही
मग दे ना फोन
भावजी ताई खरंच सकाळीच घरी गेली , तुमचा सेमिनार आहे ना पुढच्या आठवड्यात त्याची बरीच तयारी आहे म्हणाली तुम्ही पाचगणीला गेलात की येते म्हणाली
प्रोफेसराना आवंढा गिळणं मुष्कील झालं तरी सहज बोलल्यासारखं ते म्हणाले नाही ! तेंव्हाही तिला यायला नाही जमणार
का? मेव्हणा गोंधळून म्हणाला
कारण आम्ही दोघं जातोय पाचगणीला, ती माझ्या सोबत असेल
माझं एक काम कर, छानसा मोबाईल सजेस्ट कर मला तुझ्या ताईसाठी घ्यायचाय
रात्री फोन घेऊनच ये , आपण मस्त जेवायला जाऊ
सायकलवर ढांग टाकून ते घराकडे निघाले
आणि समोर घराचं दार उघडं बघून त्यानी आपले डोळेच मिटून घेतले
पायरीवरच बसले
ती दाराशी येत म्हणाली आता हे काय नवीन?
तीला आपल्या जवळ बसवत म्हणाले बघ आता आपलं सगळच नवीन असेल आपल्याला हवं तसं हवं तितकं।
लेखक - चंद्रशेखर गोखले
No comments:
Post a Comment