*उसनं...* 🏵
वैशाली आणि गौरव चं नुकतंच एका महिन्यापूर्वी लग्न झालेलं... दोघेही मूळ अकोल्याचे. नोकरी निमित्त गौरव आधीच मुंबईमध्ये स्थाईक झालेला आणि आता लग्नानंतर वैशालीने देखील मुंबई मध्ये नोकरी बघण्याचे ठरले.
वैशाली जरी अकोल्यात वाढलेली तरी एकदम स्मार्ट, प्रचंड हुशार आणि हुशार असल्याने साहजिकच थोडीशी आत्मकेंद्री.. नाही म्हणजे मित्र मैत्रीण होते तिला, पण तरीही तिचा अभ्यास वगैरे सांभाळून मगच त्यांच्या बरोबर मज्जा करायला, फिरायला जाणारी अशी होती ती. आई अनेकदा तिला सांगत, अगं असं घुम्या सारखं राहू नये.. चार लोकात मिसळावं, आपणहून बोलावं, ओळखी करून घ्याव्यात... पण तेव्हा तिला काही ते फार पटत नसे.. आई सतत तिच्या बरोबर असल्यामुळे तिलाही कधी एकटं वगैरे वाटलं नाही...
आता मुंबई मध्ये आल्यावर हळू हळू इथलं वातावरण अंगवळणी पडत होत तिच्या.. वैशालीला मुंबईला घरी येऊन १०/१२ दिवस झाले होते.. कामवाली बाई सुद्धा मिळाल्याने वैशालीचा भार एकदम कमी झाला होता...
ती अशीच एका दुपारी पुस्तक वाचत बसली होती तेवढ्यात दारावरची बेल वाजली.. तिने थोडंसं नाराजीनेच दार उघडलं.. पाहते तो साधारण ७० च्या आसपास वय असलेल्या आज्जी उभ्या होत्या दारात...
तिने दारातूनच विचारलं,"आपण कोण? काय हवं आहे?"
"मी, लतिका देवस्थळी.. इथे शेजारच्या फ्लॅट मध्ये राहते." आज्जी बाईंनी माहिती पुरवली.
"बरं...काही काम होतं का??", आपली नाराजी सुरातून फार जाणवू न देता वैशाली ने विचारलं.
"१०/१२ दिवस झाले तुम्हाला येऊन , म्हटलं ओळख करून घेऊ.. म्हणून आले... आत येऊ?"
वैशालीने थोडं नाराजीनेच दार उघडलं... तशी आज्जी बाई आनंदाने घरात येऊन सोफ्यावर बसल्या...
"थोडं पाणी देतेस??", आज्जी नी विचारलं.
"हो..."
वैशाली स्वयंपाक घरातून पाण्याचा ग्लास घेऊन आली...
"छान सजवलयस हो घर... निवड चांगली आहे तुझी...
मला थोडी साखर देतेस.. घरातली संपली आहे... ह्यांना चहा करून द्यायचाय.. मेला, तो किराणावला फोन उचलत नाहिये माझा.. कुठे उलथलाय देव जाणे.." आज्जी एका दमात सगळं बोलून गेल्या.
"हो आणते..." वैशाली वाटी भरून साखर घेऊन आली...
"चला आज साखर दिलीस.. आपलं नातं साखरे सारखं गोड राहील हो पोरी", असं म्हणून देवस्थळी आज्जी तिच्या गालाला हात लावून निघून गेल्या...
जरा विचित्रच बाई आहे?? असं पहिल्याच भेटीत कोणी काही मागत का.. आणि हे काय, गालाला काय हात लावला तिने.. जरा सांभाळूनच राहावं लागणार असं दिसतंय... वैशालीचं आत्मकथन सुरू होतं.. तेवढ्यात गौरव आला...
तिने गौरवच्या काना वर घडलेला प्रकार घातला... तो म्हणाला," अग म्हाताऱ्या आहेत ना वाटलं असेल तुझ्याशी बोलावं म्हणून आल्या असतील.. नको काळजी करूस.."
एक दोन दिवस गेले अन् परत दुपारी दारावरची बेल वाजली..
वैशालीने दार उघडलं तर समोर आज्जी... आणि हातात वाटी...
आज ही काहीतरी मागायला आल्यात वाटतं...
"जरा थोडा गूळ देतेस का?? ह्यांना आज गूळ घातलेला चहा प्यायचाय आणि घरातील गूळ संपलाय..." इति आज्जी
"हो.. देते..."
वैशाली वाटीतून गूळ घेऊन आली ...
"वा .. धन्यवाद हो पोरी... चांगली आहेस तू... असं म्हणून तिच्या हाताला हात लावून आज्जी घरी गेल्या.."
तिला परत अस त्यांनी स्पर्श करणं जरा खटकल...
पुन्हा एक दोन दिवस झाले आणि आज्जी दारात उभ्या आणि हातात वाटी, "जरा दाणे देतेस..."
हे असं हल्ली दर एक दोन दिवस आड चाले... काहीतरी मागायचं आणि जाताना हाताला, गालाला, पाठीला, डोक्याला हात लावून निघुन जायचं... वैशालीला ते अजिबात आवडत नसे, अस परक्या बाईने आपल्याला हात लावणं..
ती आपली गौरवला नेहमी सांगायची पण तो काही हे सगळं फार सिरीयसली घेत नव्हता...
एके दिवशी न राहवून तिने ठरवलं आता आज आपण त्यांच्या घरी जाऊन काहीतरी मागुया... हे काय आपलं सारखं घेऊन जातात काही ना काही...
वैशाली ने आज्जींच दार वाजवलं.. आजींनी दार उघडलं तशी वैशाली घरात गेली..
आज्जी, " अरे व्वा, आज चक्क तू माझ्या घरी आलीस.. छान छान.. खूप बरं वाटलं..."
वैशाली आपलं स्मितहास्य करत घरावरून नजर फिरवत होती आणि एका जागी तिची नजर खिळली... भिंतीवर २५/२६ च्या आसपास असलेल्या एका सुंदर मुलीचा फोटो आणि त्याला हार...
आज्जीच्या लक्षात आलं...
"ही माझी वैशाली... काय गंमत आहे नाही... सेम नाव... काही वर्षांपूर्वी अपघातात गेली... मला कायमच पोरक करून...
जेव्हा तू इथे राहायला आलीस आणि तुझं नाव ऐकलं ना तेव्हा सगळ्या आठवणी एकदम ताज्या झाल्या... खूप अडवलं ग मी स्वतःला की माझी वैशाली आता नाहीये आणि परत कधीच येणार नाहीये... पण मन फार वेड असतं पोरी... बुद्धी वर मात करतच..
आणि मग मी सुरू केलं तुझ्या कडे उसन सामान घ्यायला येणं... पण खरं सांगू, मी सामान नाही ग स्पर्श उसना घेत होते... !!"
प्रणिता स्वप्निल केळकर
१४/०६/२०२४
*धन्यवाद ☞*
No comments:
Post a Comment