*श्रीमहाराज आपल्या आईची फार मनापासून सेवा करीत. आईने काशीयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त करताच श्रीमहाराजांनी काशीयात्रेची तयारी सुरु केली. श्रीमहाराजांची पत्नी, जिला लोक आदराने 'आईसाहेब ' म्हणत, तिला काशीयात्रेला येण्याची इच्छा होती, पण तिची समजूत काढून तिला माहेरी धाडली आणि मोठ्या लव्याजम्यासह यात्रेसाठी प्रस्थान केले.
निघण्यापूर्वी श्रीमहाराजांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वांच्या नावाने पाणी सोडले. लोकांनी ज्याला जी वस्तू हाती लागली ती ते घेऊन गेले. घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले.*
*श्रीमहाराज नाशिकमार्गे प्रयागला गेले. प्रयागमध्ये श्रीमहाराजांनी आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातले. तीन रात्री तेथे राहून सर्वजण काशीला आले.*
*मसुरियादिन शिवमंगल नावाचा ब्राह्मण श्रीमहाराजांचा पंडा होता. हा फार श्रीमंत व वजनदार मनुष्य होता. तो*
*श्रीमहाराजांना गुरुस्थानी मानीत असे. त्याने मोठ्या आनंदाने आणि दिमाखात श्रीमहाराजांची काशीमध्ये राहण्याची व्यवस्था केली. श्रीमहाराज तेथे*
*जवळजवळ एक महिनाभर राहिले. आईला रोज स्वत: उचलून ते तिला एखाद्या लहान मुलाप्रमाणे सांभाळत गंगास्नानासाठी घेऊन जात. श्रीमहाराजांनी आईच्या हातून पुष्कळ दानधर्म, अन्नदान करविले. याच काळात काशीमध्ये*
*आत्मानंदसरस्वती नावाच्या विद्वान व साधनी संन्याशाचा परिचय झाला. त्याला रामनामाचे महत्त्व पटवून दिले. स्वामींनी श्रीमहाराजांकडून रानामाची दीक्षा घेतली, आणि श्रीमहाराजांनी त्यांना दीक्षा देण्याचा अधिकार दिला.*
*काशीमध्ये एक महिनाभर राहून श्रीमहाराज आईला घेऊन गयेला गेले. तेथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला गेली. जवळपास पन्नास दिवस चाललेली तीर्थयात्रेची दगदग गीताबाईंना सोसवली नाही.
अयोध्येत त्यांना थकवा जाणवू लागला. अशक्तपणा वाटू लागला. औषध घेण्यास त्यांनी संमती दिली नाही. अन्नही घेणे बंद झाले. अंथरुणावर पडल्या पडल्या त्यांचे नामस्मरण सारखे चालू असे.
श्रीमहाराज सारखे आईजवळ राहून सेवा करीत होते. आईची शरयू नदीत स्नान करण्याची आणि दानधर्माची इच्छा श्रीमहाराजांनी पूर्ण केली.*
*अंतकाळ जवळ आल्याचे गीताबाईंनी ओळखले. गीताबाईंनी अगदी शांतपणे श्रीमहाराजांच्या मांडीवर ' राम राम ' म्हणत देह ठेवला. श्रीमहाराज एवढे धैर्याचे पर्वत खरे, पण आईचा शेवटचा श्वास संपल्यावर ' आई ! तू गेलीस ना ! ' असे शब्द त्यांच्या तोंडातून निघून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
वयाच्या बाराव्या वर्षी सर्वसंगपरित्याग करणाऱ्या श्रीमहाराजांना जगामध्ये रामरायाच्या खालोखाल आपल्या आईचे प्रेम होते.या प्रसंगी सहजस्फूर्तीने श्रीमहाराजांच्या मुखातून जे अभंग बाहेर पडले ते हृदयस्पर्शी आणि आईच्या प्रेमाने ओथंबलेले होते. ' दया करी राम-सीता | सांभाळावी माझी माता* || ....................................'
*दहाव्या दिवसापासून त्यांनी आईची उत्तरक्रिया करण्यास प्रारंभ केला. तेराव्या दिवसापर्यंत असंख्य गरिबांना अन्नदान, दानधर्म, शंभर गायींचे दान, प्रत्येक भिकाऱ्याला घोंगडी दान असा अमाप खर्च श्रीमहाराजांनी आईच्या नावे केला.*
No comments:
Post a Comment