*श्रीराम समर्थ*
*प्राण्यांना विकार नाही*
प्रभावतीबाई नांवाच्या महर्षि रमणांच्या एक अंतरंग शिष्या होत्या. त्यांचा विवाह ठरला. रमणांचा आशीर्वाद घ्यावा यासाठीं त्या आश्रमाकडे आल्या. बाईंनी असा विचार केला की रमण रोज संध्याकाळी डोंगरावर फिरायला जात. डोंगरावरून ते खाली उतरत त्यावेळी पायथ्याशीं त्यांना गाठावे व त्यांचा आशीर्वाद घ्यावा. त्याप्रमाणे त्या पायथ्याशीं उभ्या राहिल्या. रमण खालीं उतरले तेव्हां त्या पुढे झाल्या व पायावर डोकें ठेंवू लागल्या. रमण चट्दिशी मागे झाले व त्यांनी दुरून त्यांना आशीर्वाद दिला. इतक्यात आश्रमातील एक कुत्री तेथे आली आणि रमणांच्या पायांशी गेली. रमणांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि 'बरी आहेस ना!' असे तिला म्हणाले. तें पाहून प्रभावतीबाई रडूं लागल्या व म्हणाल्या 'भगवान! त्या कुत्रीहून मी हिन आहे कां? आपण माझ्या पाठीवरून कां हात फिरवीत नाही?' तेव्हां रमण म्हणाले 'बाई ! प्राण्यांना विकल्प नसतो म्हणून त्यांचे अंतःकरण शुद्ध असतें. माणसाचें तसें असत नाहीं.'
*********
संदर्भः साधकांसाठी संतकथा हे प्रा के वि बेलसरे ह्यांचे पुस्तक
*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment