TechRepublic Blogs

Thursday, April 10, 2025

पहिले चिन्ह

 *श्रीराम समर्थ*


*शरणागतीचे पहिले चिन्ह*


         नामस्मरण, सदाचरण, शुद्ध अंतःकरण आणि भगवंताला शरण अशी नामसाधनेची चार महत्वाची अंगे आहेत. नामस्मरणाइतकेच सदाचरणाला महत्व आहे. नामाचा अभ्यास करणाऱ्याने माणुसकीला शोभेल असे वागायला हवे. त्याचे आचरण सर्व दृष्टींनी नीतिधर्माला अनुसरून हवे. मनांत आले तरी शरीराने दुष्कर्म न होईल एवढी खबरदारी बाळगावी. दुसऱ्याला फसवून पैसा घेणे, अनिर्बंध कामवासाना भोगण्याच्या मागे लागणे, दुसऱ्याची उगीच निंदानालस्ती करणे, वाईट खाणे व पिणे आणि दुर्वाक्ये बोलणे या गोष्टी नामधारकाने सोडल्याशिवाय गत्यंतर नाही. तसेच एखाद्याच्या हातून विशेष पापकर्म घडले असेल तर ते त्याने मनाने भगवंताला निवेदन करावे आणि तें पुन्हा आपल्याकडून घडणार नाही अशी खबरदारी बाळगावी. नाम घेणारा मनुष्य अत्यंत सदाचरणी पाहिजे. कारण नामात गुप्त असणारी भगवंताची शक्ति अंतःकरणांत प्रकट होण्यास विकारच आड येतात. विकार वासनारूपाने व्यक्त होतात. प्रथमावस्थेमध्ये सामान्य मनुष्य आपल्या वासना भगंवंतावर लादतो. भगवंताने त्या तृप्त केल्या तर त्याच्याशी संबंध राखतो; नाहीतर तो तोडतो. वासना पुर्ण करण्याच्या अनेक साधनांपैकी भगवंत हे एक साधन समजलें जातें. नामाचा अभ्यास चालू केल्यावर हें बरोबर नाहीं असे आपोआप कळूं लागते. तरीपण वासना कांही सुटत नाहीत. म्हणून येथे शिकण्याची गोष्ट अशी की, भगवंत आपला मालक आहे असे समजून आपल्या वासना तृप्त करण्याची प्रार्थना रोज त्याला करावी. मागावयाचे तर भगवंतापाशीच मागावयाचे, तो देईल अगर न देईल, दिले तर बरेच झालें पण न दिले तर त्याचाच नांवाने रडावे, कांहीं केल्या त्याला सोडूं नये अशी वृत्ती शरणागतीचे पहिले चिन्ह समजावे. 


               *********


संदर्भः प्रा के वि बेलसरे यांचे नामसाधना हे पुस्तक पान ४२


*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*

No comments:

Post a Comment