*चतुर्भुज राम मूर्ती ....बऱ्याच वर्षंपूर्वी घडलेली घटना*
*मध्यप्रदेशातली मराठी संस्थाने म्हणजे ग्वाल्हेरचे शिंदे, इंदूरचे होळकर व धारचे पवार. धारच्या हद्दीत राम मंदिर येते. ज्यावेळी उत्तर हिंदुस्थानात मुसलमान सत्ता होती तेव्हा मंदिर व मूर्तीची तोडफोड होत असे.
तेव्हा पुजारी व भक्त मंडळी देवाची मूर्ती अज्ञात ठिकाणी लपवून ठेवीत असत. पुण्याचे एक रामभक्त ब्राह्मण होते. त्यांना श्रीरामाचा दृष्टांत झाला की तू धारला ये व मला बाहेर काढ.
सुरवातीला त्यांनी लक्ष दिले नाही तेव्हा त्यांना चतुर्भुजरामाचे दर्शन झाले व मूर्ती डोळ्यासमोरून हालेना तेव्हा ते धारला गेले. त्यावेळी धारच्या राणीसाहेब तेथे कुलमुखत्यार म्हणून कारभार पहात होत्या. मोठे वैभव होते व गजांत लक्ष्मी होती.
ते गृहस्थ राणीसाहेबांना भेटले व सर्व हकिगत सांगितली. राणीसाहेबांनी आपल्या अधिकाऱ्यांना चतुर्भुज-रामाबद्दल माहिती मिळते का ती चौकशी करण्यास सांगितले. पण माहिती कळेना. तो ब्राह्मण रडकुंडीला आला.
तो पुण्यापासून धारपर्यंत खडतर प्रवास करीत आला होता. त्याने रामाचा धावा सुरू केला. तेव्हा त्याला दृष्टांत झाला की मी मांडवगण (मंडू) च्यां जंगलात आहे. राणीच्या काही अधिकाऱ्याबरोबर ते गृहस्थ मंडूच्या जंगलात गेले. पण स्थान समजल्याशिवाय खणणार कोठे? तेव्हा पुन्हा श्रीरामालाच साकडे घातले.
तेव्हा प्रेरणा झाली की संस्थानचा गजराजच ते स्थान दाखवेल. तेव्हा हत्तीला तेथे आणले. तो जंगलात मुक्त फिरू लागला. एका ठिकाणी तो थांबला व खाली बसला व तेथून तो हालेना. ब्राह्मणाने सांगितले की येथे खणा.
येथपर्यंत बराच उपद्व्याप झाला होता. राणी म्हणाली "समजा, येथे खणून काहीच हाताला लागले नाही "तर..?" तेव्हा ब्राह्मण म्हणाला, "आपण माझा शिरच्छेद करा, समजा आपण मला मारले नाही तर मी स्वत:च देहांत प्रायश्चित्त घेईन." खणण्याचे काम सुरू झाल.
एका विशिष्ट खोलीवर खणू असा आवाज ऐकू आला. ती एक मोठी फरशी होती. ती अलगद काढली तर, आत भुयार होते त्याला पायऱ्या होत्या. तेथून आत उतरल्यावर चतुर्भुजरामाची मूर्ती दिसली. भुयार स्वच्छ होते व तेथे रामापुढे नंदादीप तेवत होता असे सांगतात.
"जानकीजीवनस्मरण जयजयराम अशी गर्जना करीत श्रीरामाला बाहेर काढले. त्याची षोडशोपचार पूजा, पुरुषसूक्त व पवमानयुक्त अभिषेक करून प्रतिष्ठापना केली. धारच्या राणीसरकारांनी तेथे सुंदर मंदिरबांधले. नित्य नैमित्तिक पूजा व उत्सवासाठी पुजारी नेमले व वतन नेमून दिले. मंदिराच्या वरच्या बाजूला दरबारासारखी बैठकीची व्यवस्था केली. भुयाराची जागा जशीच्या तशी व्यवस्थित करून ठेवली.*
*टीप - आजही ते भुयार आपणास पहावयाला मिळते व इतिहासाची साक्ष देते. तेथे चौकशी करता त्यावेळी एका वृद्ध तेज:पुंज साधूने सांगितले - "यहाँ महान रामभक्त दख्खन के साधू आये थे ।" आणि ते दख्खन के साधू आणखी कोणी नसून आपले श्रीमहाराज, (श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज)*
No comments:
Post a Comment