TechRepublic Blogs

Thursday, November 27, 2025

सूक्ष्मदृष्टी

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                 

              महाराजांना प्राणिमात्रांविषयी विशेषतः गाई बद्दल फार प्रेम होते. म्हसवडच्या बाजारात गाई विकायला यायच्या. भाकड गाई कत्तलखान्यात दिल्या जात. महाराज त्या गाई विकत घेऊन सोडवून आणत व कोणालातरी पाळायला देत असत. किंवा स्वतःच्याच गोठ्यात ठेवत. एकदा कसाही म्हणाले, आम्ही तुम्हाला गाई देणार नाही. पण का? मी पैसे देतो ना? तरी ते कबूल होईना. महाराज ठाम असल्याचे पाहून ते कसाई म्हणाले, तुम्हाला जर गाईं विषयी एवढेच प्रेम आहे तर, तुम्ही गाईंना हाका मारा. त्या जर तुमच्याकडे आल्या तर आम्ही निघून जाऊ. महाराजांनी होकार भरला आणि...

         ते प्रेमाने गाईंना हाकारू लागले... गंगे ये.. गोदे ये... यमुना ये... कृष्णा ये... आणि काय आश्चर्य त्या अनोख्या सर्व गाई महाराजांकडे आल्यात. मुक्या जनावरांनाही कळते प्रेम ही आंतरिक ओढ आहे.

              महाराजांकडे एक लंगडी गाय होती. ज्या दिवशी महाराज तिला दिसले नाही, तिच्या पाठीवरून हात फिरवला नाही, प्रेमाने हाक मारली नाही तर, ती अतिशय व्याकुळ होत असे. तसाच बत्ताशा नावाचा घोडा होता. त्याच्यावरून महाराजांनी रपेट मारली की, त्याला छान वाटत असे. केवढे हे भूतमात्री प्रेम?

              महाराज अबूच्या जंगलातून नर्मदेच्या कडेकडेने माहेश्वरी आले. महाराजांचा अधिकार जाणून सर्वच लोक त्यांना मान देत असत. त्यांचा होत असलेला थाटमाट पाहून तिथल्या दोन मांत्रीकांना वाटले की, यांना काही मंत्र सिद्धी प्राप्त आहे. आपण शिकलो तर आपलेही महत्त्व वाढेल. म्हणून ते महाराजां जवळ येऊन म्हणाले, अहो बुवा, तुमच्या जवळचा मंत्र आम्हालाही शिकवा की! महाराज म्हणाले, माझ्याकडे एकच तेरा अक्षरी मंत्र आहे. मांत्रिकांना खोटे वाटले. महाराज सहजासहजी मंत्र देणार नाही याची खात्री झाल्यावर, ते महाराजांना डोंगरावर घेऊन गेले. व धमकी देत म्हणाले. बर्‍या बोलाने मंत्र सांगा. नाहीतर परिणामला सामोरे जा.

         मांत्रिकाने आपल्या मंत्राने नाग उत्पन्न केले. नागांनी सर्व बाजूंनी महाराजांना बांधून टाकले. तीन दिवस महाराज तसेच बसले. चौथ्या दिवशी मांत्रिक म्हणाले, जीव प्यारा असेल तर, आता तरी खरे सांगा. महाराज म्हणाले, माझे रक्षण करायला राम समर्थ आहे. पण तुम्हाला मात्र आपल्या मंत्राला मुकावे लागेल. त्यांना वाटले हा बुवा उगाच गप्पा मारतो. थोड्या वेळाने महाराजांनी जय जय रघुवीर समर्थ म्हणून खाली उडी मारली. सर्व साप मरून पडले. मांत्रिकाची विद्या निष्पळ ठरली. तेव्हा ते दोघेही महाराजांना शरण आले. महाराजांनी त्यांना माफ करून अनुग्रह व राममंत्र दिला. एकाला नर्मदा काठी बारा वर्षे तपश्चर्या करायला सांगितली. व दुसऱ्याला बरोबर घेतले.

          काही दिवसानंतर महाराज उज्जैनला आले. तिथे एक समर्थ भक्त  सरकारी अधिकारी होता. त्याने महाराजांना पाहिले. पण विश्वास बसत नव्हता. त्याने परीक्षा पाहायचे ठरवले. त्याचवेळी त्याचा मुलगा विषमज्वराने आजारी पडला. पाचव्या दिवशी त्याचे जास्तच झाले. नाडी सुटत चालली. त्याला कल्पना सुचली. तो महाराजांकडे घेऊन म्हणाला, महाराज, उद्या आपण माझ्याकडे प्रसादाला यावे.

          मध्य रात्रीच्या सुमारास मुलगा मरण पावला. प्रेत तसेच झाकून ठेवले. दुसऱ्या दिवशी महाराज ५०-५५ लोकांसह ११.३० च्या सुमारास त्या अधिकाऱ्याच्या घरी आले. पंगती वाढल्या गेल्या. आता जेवायला बसणार, तोच त्या अधिकाऱ्याची बायको मुलाला घेऊन आली. म्हणाली, महाराज, हा रात्रीच गेला असताना आपण अन्नग्रहण कसे करणार?

           महाराजांनी त्या मृत मुलाला मांडीवर घेतले. त्याच्या छातीवर हात ठेवल्यावर म्हणाले, हा तर जिवंत आहे. देवाचे तीर्थ अंगारा आणावला. मात्रा चाटवली आणि आश्चर्य म्हणजे तो मुलगा हालचाल करू लागला.  वातावरण एकदम आनंदित झाले. अधिकाऱ्याने महाराजांना क्षमा मागितली. साष्टांग नमस्कार केला. महाराजांनी त्याला दास नवमीला सज्जनगडावर जायला सांगितले.

         महाराजांवर किती किती प्रकारचे कठीण, कडू प्रसंग आलेत. पण सर्वातून ते सही सलामत पार पडले. हे संत लोक स्वानंदातच मग्न असतात. काहीही झाले तरी, निवारण्यास राम समर्थ आहे याची त्यांना पक्की खात्री झालेली असते. त्यांना एकच ध्यास असतो....

" बुडती हे जण देखावे डोळा। 

  म्हणून कळवळा येतो मज।।"

       त्यांना दुसऱ्यांची दुःख पहावत नाही." जगाच्या कल्याणा संताच्या विभूती " अशी या संतांची वृत्ती असते. महाराजांना सूक्ष्मदृष्टी प्राप्त झाल्याने त्यांना पुढचे मागचे कळत असे. ते कोणालाही क्षमा करीत. 

           महाराज इंदूरला असताना भैय्यासाहेब मोडक राजा तुकोजी होळकरांना महाराजांचे भेटीसाठी घेऊन आले. होळकर वेश पालटून आले. मनी ठरवले जर यांनी ओळखलं तर हा खरा साधू! महाराजांनी तुकोजींना मोठ्या प्रेमाने आपल्याजवळ बसवले.  उपदेशपर गोष्टी सांगितल्या. तुकोजींचा भ्रमनिरस झाला. ते महाराजांना शरण गेले.

          साताऱ्याहून पंढरपूरला जाताना मध्ये गोंदवले लागते. त्यामुळे बरेच लोक गोंदवल्याला मुक्कामी असायचे. त्यांच्या खाण्यापिण्याची, राहण्याची सर्व व्यवस्था महाराज स्वतः जातीने करीत असत. त्यासाठी मारुती मंदिर व घर अपुरे पडे. म्हणून महाराजांनी मंदिर बांधायचे ठरवले......

        क्रमशः 

संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment