*॥ श्री गुर्वष्टकम् ॥*
Guru Ashtakam
(श्री आद्यशंकराचार्यकृत)
गुरुच्या चरणी विनम्र का झाले पाहिजे याचा उपदेश या स्तोत्रात आचार्य करतात.प्रत्येकाने तो हृदयात धारण करावा असाच आहे.
*'गृणाति ज्ञानं'* आणि *'गिरति अज्ञानं' इति गुरुः*, अशी गुरु शब्दाची व्युत्पत्ती आहे. आत्मज्ञानाचा प्रकाश देऊन अज्ञानाचा निरास करणारा सद्गुरु किंवा भगवान श्रीहरी हा त्या शब्दाचा अर्थ आहे.
सद्गुरूंच्या अथवा श्रीहरीच्या चरणकमली ज्याचे मन संलग्न झाले नाही, त्याचा जन्म व्यर्थ होय. जन्माला येऊन जे मिळवावयाचे ते जर मिळविले नाही तर त्या जन्माचा आणि वित्त, वैभव, विद्या, कीर्ती इत्यादी इतर गोष्टींचा काय उपयोग?
म्हणून सद्गुरूंच्या चरणी अथवा श्रीहरीच्या चरणी मन संलग्न करा असा उपदेश आचार्य या स्तोत्रात करीत आहेत. या स्तोत्राचे वृत्त भुजंगप्रयात आहे.
卐卐卐
*-----------------------------*
*शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं,*
*यशश्चारु चित्रं धनं मेरुतुल्यम् ।*
*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे,*
*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*
*।।१।।*
शरीर देखणे आहे,तशीच बायकोही पण सुंदर आहे. वक्ता,लेखक,विद्वान्, प्रेमळ नेता, लोककल्याणकर्ता इत्यादी रूपांनी अनेक प्रकारची कीर्ती आहे,पर्वतप्राय धनाच्या राशी आहेत, सर्व काही आहे, पण मन जर सद्गुरूच्या अथवा श्रीहरीच्या चरणकमली संलग्न झालेले नसेल, तर ते सर्व व्यर्थ होय.
त्याचा काय उपयोग ?
त्याचा काय उपयोग ?
*कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं,*
*गृहं बान्धवाः सर्वमेतद्धि जातम् ।*
*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्ये,*
*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*
*।।२।।*
बायको आहे, पैसा आहे, मुले आहेत. नातवंडे पतवंडे वगैरे सर्व काही आहे. बंगले आहेत. आप्त-इष्ट,सोयरे-धायरे इत्यादी सर्व काही झाले आहे, पण सद्गुरूच्या अथवा श्रीहरीच्या चरणकमली मन लागले नाही,
तर या सर्वांचा काय उपयोग ?
तर या सर्वांचा काय उपयोग ?
*षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या,*
*कवित्वादि गद्यं सुपद्यं करोति ।*
*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे,*
*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*
*।।३।।*
सांगोपांग वेदांचे अध्ययन केले, शास्त्रविद्या मुखोद्गत केली, उत्तम गद्यांची व पद्यांचीही रचना करतो, कवी म्हणून प्रख्यात झाला, पण सद्गुरूंच्या अथवा श्रीहरीच्या चरणी मन जर लागले नाही,तर या सर्व गुणांचा काय उपयोग?
तर या सर्व गुणांचा काय उपयोग ?
*विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः,*
*सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः।*
*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे,*
*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*
*।।४।।*
परदेशामध्ये मान्यता पावला, स्वदेशात धन्य झाला.सदाचाराने वागण्यात आणि नीतिन्यायाने चालण्यात माझ्यासारखा दुसरा कोणी नाही असेही म्हणतो.पण मन सद्गुरूंच्या अथवा श्रीहरीच्या चरणकमली संलग्न झाले आहे काय? ते जर तसे असेल, तर सर्व काही ठीक आहे. नाही तर या सर्वांचा काय उपयोग ?
तर या सर्वांचा काय उपयोग ?
*क्षमामण्डले भूपभूपालवृन्दैः,*
*सदासेवितं यस्य पादारविन्दम् ।*
*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे,*
*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*
*।।५।।*
संपूर्ण भूमंडलाचा अधिपती झाला, सम्राट झाला.राजे-रजवाड्यांनी ज्याच्या चरणकमलांची सर्वकाळ सेवा केली. हे सर्व काही झाले,पण मन जर श्रीहरीच्या अथवा सद्गुरूंच्या चरणकमली संलग्न झाले नसेल तर याचा काय उपयोग?
याचा काय उपयोग?
*यशो मे गतं दिक्षु दानप्रतापाज्जगद्वस्तु*
*सर्वं करे मत्प्रसादात् ।*
*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्म,*
*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*
*।।६।।*
माझ्या दानधर्माने व पराक्रमाने माझी कीर्ती दाही दिशा पसरली. माझ्या कृपेने कोणतीही जगातील वस्तू हस्तगत होऊ शकते! (असे अभिमानाने बोलतो) पण मन श्रीगुरूंच्या अथवा श्रीहरीच्या चरणी झालेले नसेल तर याचा काय उपयोग? हे सर्व व्यर्थ होय. हे सर्व व्यर्थ होय
*न भोगे न योगे न वा वाजिराजौ,*
*न कान्तामुखे नैव वित्तेषु चित्तम् ।*
*मनश्चेन्न लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे,*
*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*
*।।७।।*
माझे मन आता भोगात रमत नाही व योगातही रमत नाही. घोड्यांची पागा मनाला रुचत नाही व प्रिय पत्नीचे मुख अवलोकन करीत बसण्यातही
माझ्या मनाला सुख वाटत नाही. वित्तवैभवातही माझे मन रमत नाही. इतके वैराग्य आहे, पण आचार्य म्हणतात, बाबा रे ! तुझे ते मन श्रीहरीच्या अथवा सद्गुरूंच्या चरणकमली तरी संलग्न झाले आहे का ? तसे जर नसेल तर मग हे वैराग्यही काय उपयोगाचे ?
हे वैराग्यही काय उपयोगाचे ?
*अरण्ये न वा स्वस्य गेहे न कार्ये,*
*न देहे मनो वर्तते मे त्वनर्थे ।*
*मनश्चेन्न लग्नं हरेरङ्घ्रिपद्म,*
*ततःकिं ततःकिं ततःकिं ततःकिम्*
*।।८।।*
अरण्यामध्येही माझे मन रमत नाही व स्वत:च्या घरातही माझे मन लागत नाही. कोणत्याही कामात माझे मन लागत नाही. माझा देह इतका सुंदर बहुमोलाचा, पण त्याचीही आसक्ती आता माझ्या मनात उरली नाही. इतका मी विरक्त झालो आहे,असे म्हणतो, पण श्रीहरीच्या चरणी ते मन लागले असेल तर ठीक आहे. नाही तर या वैराग्याचा काय उपयोग?
या वैराग्याचा काय उपयोग?
*अनर्घ्याणि रत्नानि मुक्तानि सम्यक,*
*समालिङ्गिता कामिनी यामिनीषु ।*
*मनश्चेन्न लग्नं हरेरङ्घ्रिपद्मे,*
*तत: किं ततःकिं ततःकिं ततःकिम्* *।।९।।*
बहुमोलाची रत्ने अर्थात् रत्नजडित सुवर्णाचे अलंकार व केवळ रत्नांचेही हार अंगावर आणि गळ्यात घालून त्यांचे यथेच्छ सुख अनुभविले. कांतेच्या सुखात रात्रीच्या रात्री घालविल्या. सगळे काही केले, पण श्रीहरीच्या अथवा सद्गुरूंच्या चरणकमली मन जर संलग्न झाले नसेल तर, त्या सर्व सुखांचा काय उपयोग?
तर त्या सर्व सुखांचा काय उपयोग?
*गुरोरष्टकं यः पठेत्पुण्यदेही,*
*यतिर्भूपतिर्ब्रह्मचारी च गेही ।*
*लभेद्वाञ्छितार्थं पदं ब्रह्मसंज्ञं,*
*गुरोरुक्तवाक्ये मनो यस्य लग्नम् ।।*
*।।१०।।*
मोठ्या पुण्ण्याने नरदेहाचा लाभ झाला असता जो कोणी या गुर्वष्टकाचे पठण करील आणि ज्याचे मन गुरूंनी सांगितलेल्या वाक्यांवर, 'तत्त्वमसि' इत्यादी महावाक्यांच्या अर्थावर संलग्न झालेले असेल, तो कोणीही असो,ब्रह्मचारी असो अथवा गृहस्थाश्रमी असो, तो संन्यासी असो अथवा सम्राट असो,त्याला अभीष्ट असलेले, ब्रह्म या नावाने ओळखले जाणारे, नित्य आणि निरतिशय आनंदरूप असलेले उत्तम पद प्राप्त होईल.
卐卐卐
No comments:
Post a Comment