*॥श्रीहरिः॥*
ही गुह्य राजविद्या अर्जुनाला समजावून सांगताना भगवंत आता पुढे म्हणतात,
*-----------------------------*
॥ॐ श्री परमात्मने नमः ॥
अथश्रीमद्भगवद्गीता नवमोध्यायः
*मया ततमिदं सर्वं*
*जगदव्यक्तमूर्तिना ।*
*मत्स्थानि सर्वभूतानि*
*न चाहं तेष्ववस्थितः ॥*
*॥९.४॥*
*न च मत्स्थानि भूतानि*
*पश्य मे योगमैश्वरम् ।*
*भूतभृन्न च भूतस्थो*
*ममात्मा भूतभावनः ॥*
*॥९.५॥*
(श्रीमद्भगवद्गीता अध्याय नववा राजविद्याराजगुहायोग ९.४ ९.५)
*भावार्थ:- (प्रकृतीच्या) अव्यक्तरूपानं मी हे सर्व जग व्यापलेलं आहे. सर्व सृष्ट पदार्थ माझ्या ठिकाणी आहेत. पण मी त्यांच्या ठिकाणी स्थित नाही (म्हणजे त्यांच्या आधरावर अधिष्ठित नाही); आणि माझ्या ठिकाणी सर्व भूतसृष्टीही नाही! असा हा माझा ऐश्वर्ययोग (अचिंत्य सामर्थ्य) कसा आहे तो पहा (तसंच) माझं तत्त्व सृष्टीला धारक आणि पोषक असूनही ते सृष्टीवर अधिष्ठित नाही.म्हणजे सृष्टी हा त्या तत्त्वाचा आधार नाही.*
*-----------------------------*
*या श्लोकांमधून ब्रह्मस्वरूप सांगितलेलं आहे.*
सर्व भूतं माझ्या ठिकाणी आहेत; पण मी त्यांच्या ठिकाणी नाही. माझ्या अव्यक्तरूपानं संपूर्ण विश्व व्यापलेलं आहे, हा एक चमत्कारच आहे. सर्व विश्व इंद्रियगोचर आहे. त्यात व्यापून उरलेलं ब्रह्म इंद्रियगम्य आहे आणि इंद्रियगम्य नाहीही!
ब्रह्म इंद्रियातीत असूनही ते इंद्रियगोचर विश्वाला व्यापून उरलेलं आहे. दृश्य विश्वापेक्षा ब्रह्म कुठेतरी वेगळं असतं तर त्याचं एवढं महत्त्व वाटलं नसतं. गावच्या पाटलाची माडी इतरांपेक्षा थोडी वेगळी, असा प्रकार झाला असता! पण ब्रह्माचं तसं नाही. ते म्हटलं तर व्यापलेलं दिसतं; म्हटलं तर व्यापलेलं दिसत नाही! म्हणजे
मूर्त विश्वाला अमूर्त तत्त्वानं धारण केलं आहे. मूर्त तत्त्व अमूर्तापर्यंत पोचूच शकत नाही. कारण तसं पोचायचं असेल तर मूर्ताला आपलं मूर्तस्वरूपच त्यागावं लागेल!
*परमात्मा कसा आहे?*
चक्रधर स्वामींनी एक छान दृष्टान्त दिला आहे.
*एकदा* चार अंध एकमेकांच्या आधारानं मार्गावरून जात होते. तेवढ्यात त्यांना एक हत्ती वाटेत आडवा आला. हत्ती हा प्राणी त्यांनी अंधत्वामुळे कधी बघितलेला नव्हता. त्यामुळे या प्राण्याला काय म्हणायचं किंवा त्याचं स्वरूप कसं आहे हे त्या चौघांना समजत नाही. चौघांपैकी एका अंध व्यक्तीचा हात हत्तीच्या शेपटीला लागला. हत्ती हा दोरासारखा आहे असं तो म्हणाला.ज्याचा हात हत्तीच्या पायाला लागला होता त्याला हत्ती खांबासारखा वाटला.तिसऱ्याचा हात हत्तीच्या पाठीकडे गेला. त्याला पाठ म्हणजे भिंत वाटली. तो हत्तीला भिंत समजला. चौथ्या अंध व्यक्तीच्या हातात हत्तीचा कान आला. तो म्हणाला, हत्ती सुपासारखा!
अशा तऱ्हेनं एकाच हत्तीविषयी चौघा अंध व्यक्तींनी चार वेगवेगळी मतं दिली. त्यावरून त्या चौघांमध्ये वाद निर्माण झाला. भर रस्त्यामध्ये त्या चौघांचा वाद विकोपाला गेला.
एक डोळस गृहस्थ तिथून जात होता. त्यांचा वाद ऐकून तो थांबला. चौघांचं म्हणणं त्यानं ऐकून घेतलं. मग त्या चौघांना समजावत तो गृहस्थ म्हणाला,
'हा हत्ती नावाचा प्राणी आहे. सूप म्हणजे याचे कान आहेत. तर दोरी म्हणजे याची शेपटी. जी भिंत वाटली ती याची पाठ आहे. तर खांब म्हणजे पाय आहेत. या साऱ्या अवयवांचा
मिळून एक संपूर्ण हत्ती आहे.'
त्या प्रत्येकाचा अनुभव खोटा म्हणायचा का? मुळीच नाही. पण जेव्हा डोळस व्यक्ती तिथे येते तेव्हा त्यांना हत्तीचं समग्र स्वरूप कळून चुकतं.
*त्याचप्रमाणे*
आपण जो परमात्म्याला भौतिक वा आत्मिक साधनांनी जाणायचा प्रयत्न करतो तो परमात्म्याचा एकेक अंश असतो.समग्रतेनं त्याचं स्वरूप कळणं शक्य होत नाही. परंतु; *भक्तीमुळे* तोच गुंतागुंतीचा परमात्मा सरळसाधा होऊन जातो.
ही गुह्य राजविद्या भगवंतांनी अर्जुनाला सांगितली आहे.
हे पवित्र ज्ञान केवळ शाब्दिक नसून अनुभवजन्य आहे. कारण ज्याला कोणतेही अवयव नाहीत,ज्याला कोणत्याही प्रकारचं मूर्त स्वरूप नाही,अशा ब्रह्माचं दृश्यमान स्वरूप विश्वाव्यापी आहे. ही गोष्ट तात्त्विक दृष्टीनंच बघितली पाहिजे. सर्व भूतं माझ्यात स्थित आहेत, पण मी मात्र त्या भूतांत स्थित नाही असं भगवान सांगतात. परमेश्वर सर्वव्यापक आहे.पण तो भूतांच्या शरीरात वास्तव्य कसा करून राहील. मेरूपर्वत मुंगीच्या शरीरात कसा काय वसती करू शकेल?
परमेश्वर असंग आहे. त्यामुळे तो कुणाचा आधार घेत नाही. कर्म एक करतो त्याचा साक्षीदार वेगळाच असतो. एकजण स्वादाची रुची घेत असतो आणि दुसरा स्वादाचं ज्ञान ठेवत असतो. रुची घेणाऱ्यापेक्षा स्वादाचं ज्ञान ठेवणारं एक स्वतंत्र तत्त्व आहे. ते अंशरूपानं जीवात असतं. स्वाद घेणारा पराश्रित असतो. पण स्वादांचं ज्ञान ठेवणारं तत्त्व पूर्णत: स्वतंत्र असतं.
*हेच ते परमेश्वराचे स्वरूप !*
ही बाब आणखी एका उदाहरणावरून समजून घेता येईल. ज्याप्रमाणे समुद्रात लाटा उसळल्यावर पाण्यात फेस दृश्य रूपात दिसतो,परंतु त्या फेसात पाणी दिसत नाही. त्याचप्रमाणे ही साकार सृष्टी माझ्यातच सामावलेली दिसते, परंतु यात माझा निवास नसतो. अचेतन, निर्जीव गोष्टी चैतन्याच्या आधारेच प्रकट होतात,परंतु त्यात चैतन्य नसतं.चैतन्यामुळेच शरीर जिवंत असतं. परंतु शरीरात जर चैतन्य नसेल तर ते निव्वळ प्रेतासमान आहे.
*सारांश:*
*अमूर्तानं मूर्ताला व्यापून टाकलं आहे. त्यामुळे मूर्तात अमूर्त आहे, पण अमूर्ताला मूर्त कसं काय व्यापणार? म्हणून अमूर्त (परमेश्वर) ज्ञानगम्य आहे. इंद्रियांनी न समजणारा आहे.*
संदर्भ ग्रंथ :-
श्रीगीताशास्त्र-श्रीमद्भगवद्गीताभाष्य.
*॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥*
No comments:
Post a Comment