श्रीगुरुपौर्णिमेनिमित्त*
जय जय वो शुध्दे | उदारे प्रसिद्धे
अनवरत आनंदे | वर्षतिये ||
श्री. ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या गुरूंना पु.श्रीनिवृत्तीनाथ माउलीला म्हणतात. सुरवातीलाच गुरुमाऊलींचा जयजयकार करतात. जगात शुद्ध काही असेल तर ती गुरुमाऊलीची , सद्गुरूंची कृपा आहे. त्या कृपेचा आनंदाचा अविरत वर्षाव करणारी ही माऊली उदार आहे आणि प्रसिद्ध आहे.
वर्षाव शब्द किती छान आहे. उदार कोणाला म्हणायचे तर आपल्याजवळ किती आहे आणि दुसऱ्याला दिल्यावर किती शिल्लक राहिल याचा विचार न करता जो देतो तो उदार.
ही माऊली उदार आहे म्हणूनच कृपेचा अखंड वर्षाव करते आहे. हा आनंद कधीही न संपणार आहे. गुरुमाऊलीला प्रसिद्ध अशासाठी म्हटले आहे की परमात्मा निर्गुणातून सगुणात येतो सद्गुरुंच्या रूपाने प्रगट होतो प्रसिद्ध होतो. निर्गुण निराकाराला कसे जाणणार ते सगुण साकार होऊन गुरूरूपाने प्रगटते म्हणून प्रसिद्ध.
पु.श्री.अखंडानंद स्वामी म्हणाले की परब्रह्म सगुण साकार झाले ही त्याची मानवावर कृपा आहे. एकदा श्रीमहाराज म्हणाले की संतांनी भगवंताला सगुणात आणले हे त्यांचे आपल्यावर मोठे उपकार आहेत. ते सगुणात आले म्हणजे स्थळ काळ निमित्त याच्या मर्यादेत आले. त्यामुळे त्यांचे चरित्र ही भक्तांना सुसेव्य अशी लीला झाली. कृपा ही मेघवृष्टी सारखी आहे.
आपल्यावर भगवंताची अथवा सद्गुरुनची कृपा व्हावी असे वाटत असेल तर शरणागती पाहिजे. अहंकार मूळ गेल्याखेरीज शरणांगती नाही. आपण दृश्यात म्हणजे आपल्या मनासारख्या गोष्टी होण्यात त्यांची कृपा समजतो. खरी कृपा अंतरंग बदलण्यात आहे.
No comments:
Post a Comment