आज श्री.गुरुपौर्णिमा. ओमकाररुपी श्री.सद्गुरूंना नमस्कार. श्री सद्गुरू हे मोठे ज्योतिषी आहेत. जीवाशिवांच्या कुंडल्या पाहून त्यांचे ऐक्य वर्तवितात आणि मी प्रणवरूप पुण्यस्वरुप आहे या मंत्राने जीवाचे शिवाशी लग्न लावून देतात. हे लग्न लागण्यास जीवाला पुष्कळ पुण्यसंचय करावा लागतो. एखाद्या वधूचे एखाद्या वराशी लग्न लावलेले पुष्कळ लोकांनी पाहिले आहे. पण स्वत:चे स्वतःशीच लग्न लावण्याची श्रीसदगुरूची करामत मात्र तर्काच्या पलीकडची आहे. या लग्नामध्ये प्रथम पंचमहाभुतांची खटपट म्हणजे दृश्याची प्रिती कमी करावी लागते. मग आत्मज्ञानाने कालाचे भान नाहीसे करून,त्याची दृष्टी चुकवून घटका स्थापन करावी लागते. चारी पुरुषारथाचे तेलफळ येते. अहंभावाचे लिंबलोण उतरावे लागते. लग्नातले सर्व विधी पूर्ण झाल्यावर जीव व शिव समोरासमोर आल्यावर वेगळेपणाचा अंतरपाट मध्ये धरून सद्गुरू उभा असतो. घटका भरल्यावर दोघांनाही सावधान म्हणून तो सावध करतो. सहज समाधीने जीवाशिवामधील पडदा बाजूला होतो आणि दोघे एकरूप होतात. श्री.सद्गुरूंनी साधलेला हा मुहूर्त मोठा सुंदर असतो. तेथे तुरिया अवस्था प्राप्त होऊन आत्मस्वरुपाशी गाठ पडते. जीवाला समदृष्टी प्राप्त होऊन तो शांत होतो, त्याचा शब्द बंद होतो. जीवाचे शीवाशी लग्न लावण्याची सद्गुरूंची ही तऱ्हा केवळ और आहे. नवरा पहावा तर ना काळा, गोरा व सावळा. डोळ्याला दिसतच नाहीं. आणि असं हे लग्न. असे एकाएकी एकाबरोबरच एकत्यानेंच लग्न लावणारा सद्गुरुशिवाय दुसरा कोणी असू शकत नाही. आंत बाहेर कोठेही पाहायला गेले तर सर्व ठिकाणी तेच भरलेले आहे. हे सद्गुरू आपणास साष्टांग नमस्कार.
जीव व शिव दोघांचे एकरूप होणे हेच त्यांचे लग्न होय. अशी कल्पना करून पू.श्री एकनाथ महाराजांनी हे लग्नाचे रूपक रचले आहे. त्यांना ही साष्टांग नमस्कार. श्री सद्गुरूकृपेने मला वाचावयास मिळाले ते मी येथे श्री.गुरुपौर्णिमा निमित्त प्रसारित केले.
No comments:
Post a Comment