अंतरंगाचा 3 रा मुक्काम तो ज्ञानाचा. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात ज्ञान आहे. ते फक्त व्यक्त करायचे आहे. सत्पुरुषांचे म्हणणे आहे प्रत्येक माणसाच्या अंतःकरणात ज्ञान आहे. वेदांताचे म्हणणे आहे की ब्रम्हज्ञान हे गुप्त आहे. परमात्मस्वरूपाचे ज्ञान प्रत्येकामध्ये आहे. पु.श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे मी तुम्हाला कळत नाही म्हणून मी सांगतो असे नाही. तुम्हाला कळतेय तसे तुम्ही वागा हे मी सांगतोय. म्हणून मी तुम्हाला शिकवतोय ही भावना मुळीच नाही त्यांची. काय नम्रता.
हे जे ज्ञान माणसाच्या अंत:करणामध्ये आहे ते विवेकातून निर्माण होते. साधन चतुष्टयामधे आत्मनात्मविवेक हे पहिले साधन आहे. आत्मा कोणता अनात्म कोणता सार काय असार काय हे बुद्धीचे काम आहे. ज्यावेळेस माणूस विवेकी बनतो त्यावेळेस तो वरील भेद करतो. जशी एखादी गरम वस्तू हातात घेतली की हात पोळताच तो खाली टाकून देतो तसे अनात्म आहे ते सोडून देतो.
तो विचार करू लागला की जे अशाश्वत आहे ते सोडून देतो.असार आहे ते गेलेच पाहिजे. हे ज्ञानाचे पाहिले लक्षण. विवेकातून वैराग्य. वैराग्य म्हणजे दृश्याचा त्याग- मनाने दृश्याचा त्याग हे जर वैराग्य असेल तर सारखे त्याच्या मागे जाणे हा पुढचा मार्ग आणि ते जर असेल तर भगवंताचे अनुसंधान.
अनुसंधानात पर्यवसान झाले की अनुसंधानातून तो त्याच्याशी तादात्म्य पावतो. तादात्म्य पावला की काम झाले. नाम घेताना ते कर्मच आहे. त्या कर्माचे पर्यवसान भक्तीत व्हायला पाहिजे. आपण प्रेमाने नाम घ्यावे आणि नाम घेता घेता नाम घेणारा मी आणि मी ज्याचे नाम घेतो तो नामी यांचे तादात्म्य होणे हे ज्ञान आहे.
चवथा मुक्काम ज्ञानी भक्त. तसा हा मुक्काम नाही ते ऐश्वर्य आहे. यात श्रीगुरुकृपेने उपासनेने ईश्वर दर्शन होते. हे झाल्यावर सुद्धा तो गुरूभक्तीत रमतो. यास ज्ञानी भक्त म्हणतात.
No comments:
Post a Comment