*श्रीराम समर्थ*
*गुरुसेवेबद्दलचे गैरसमज*
गुरुसेवा गुरु देहात असतांना प्रत्यक्षरूपानें व तो देहानें गेल्यावर त्याचे मंदिर वगैरे बांधून त्याचें वैभव वाढविणें, तेथें पूजा, अर्चा, उत्सव वगैरे करणें अशा स्वरूपाची अशी दोन प्रकारची असूं शकतें. यापैकीं विशेषतः दुसऱ्या प्रकाराबाबत गैरसमज असतात. एक म्हणजे मंदिराचीं शोभा वाढवणें, व्यवस्थेबद्दल विशेष जागरूक राहाणें वैगरेचे बाह्य उपचारच महत्वाचे वाटूं लागतात व पैसा सत्तां यांवर लक्ष केंद्रित होऊन मी पैसें देतों म्हणून संस्थान चालतें, त्यामुळें माझा तेथें हक्क आहे व म्हणून मला तेथें सत्तेंत भाग मिळाला पाहिजें वगैरेसारखे समज [म्ह. गैरसमज] फैलावत जाऊन अखेर आत्मन्नोतीकरिता,
ज्या उपासनेच्या वाढीकरितां अहंकार कमी होऊन साधनाचें व तद्वारा भगवंताचें प्रेम उत्पन व्हावें या हेतूकरितां - गुरुंनी आयुष्य झिजविले व ज्याकरितां मंदिर वगैरे अस्थित्वांत आली ती उपासना मागें राहून भांडणतंट्यांत पर्यवसान होतें.
याकरितां माझ्यामुळें काही होतें आहे ही कल्पना टाकून देऊन भगवंताच्या वा गुरूच्या प्रेमाकरितां म्हणून मान, सत्तावगैरेची अपेक्षा न ठेवतां माझे कल्याणाचें साधन व स्थान म्हणून पाहाणे जरूर आहे. पैसा देण्यांत संस्थानास मदत यापेक्षा माझी पैशाची आसक्ति जावी हा हेतू असावा व देहकष्ट करण्यांत अहंकार घालवण्याची भावना असावी. असे सर्व वागतील तर सर्वत्र प्रेमाचें राज्य होईल व गुरूला त्याचें खरें प्रेम असल्यानें त्याची खरी सेवा केल्याचें श्रेय मिळेल व तो आपलें कल्याण करील.
*********
संदर्भः श्रीब्रह्मचैतन्य सुवर्ण महोत्सव ग्रंथातील परमार्थाबद्दल गैरसमजुती ह्या श्रीपरशराम गणेश गद्रे, पुणे २, ह्यांचा लेख
*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment