बारा वाजायला एक मिनिट
तो दिवस… अगदी वेगळा …
सकाळीच निघाले होते ऑफिसला. नेहेमीप्रमाणे. तीच ट्रेन पकडायची होती. ८.१७. चर्चगेट. नेहेमीच्या लगबगीने कामं चालू होती. जास्त मेंदूला ताण न देता हात काम करत होते. नेहेमीच्या सवयीच्या कामांचं असंच असतं. त्यात फक्त हाताचा पायांचा सहभाग असतो. मेंदू काम नाही करत. त्याच्या सवयीचं काम असतं ना ते. चष्मा, मोबाईल, किल्ली सर्व काही पर्सच्या ठराविक जागेत गेलं. डबा वेगळ्या पिशवीत गेला. गॅस, गिझर बंद आहेत ना ह्याची खातरजमा केली नि पर्स खांद्याला लावली. निघणार तोच फोन वाजला. दुर्लक्ष करून निघणार होते. पण वाटलं नको. महत्त्वाचं काही असलं तर?
फोन घेतला. सरितामावशीचा फोन होता. तिच्या सुनेच्या डोहाळजेवणाचं आमंत्रण. नाही म्हटलं तरी पाच मिनिटं गेलीच. काहींना मुळीच समजत नाही. नोकरी करणाऱ्या बायकांना सकाळी फोन करावाच का म्हणते मी? आधीच इतकी कामं उरकायची असतात, मस्टर मिळतंय का याचं टेन्शन असतं आणि त्यातून हे फोन …
छे! उगाच फोन घेतला असं झालं मला. आता कुठली ८.१७ मिळायला? जाऊदे. आजचा लेट ठरलेला. लेटचं एकदा नक्की झालं की मन निवांत होतं. कारण आता काही करू शकत नाहीच. मग काय? लेट तर लेट. आता ९.१३ पर्यंतची कुठलीही ट्रेन चालेल. आता लेट लागणारच आहे तर बँकेचं एखादं काम उरकूनच जावं असं ठरवलं. लगेच बँकेचं पासबुक काढलं आणि निघाले.
रस्त्यावरून चालताना नेहेमीप्रमाणे मोबाईल हातात होताच. व्हाट्स ऍप, फेसबुक आल्यापासून घाणेरडी सवय लागली आहे. वेळ वाचवण्याकरता चालताना, जिने उतरताना मेसेजेस वाचायचे. एक दोनदा जिन्यात पडलेही होते. पण सवय काही जात नाही. आजही तेच झालं. समोरून येणाऱ्या गाडीने करकचून ब्रेक लावला. तेव्हा भानावर आले. बाई माणूस म्हणून ड्रायव्हरने शिव्या घातल्या नाहीत पण नाराजी व्यक्त केलीच. मीही सॉरी सॉरी म्हणून मोबाईल पर्समध्ये टाकला. आजूबाजूच्या लोकांनी विचित्र नजरेने बघून ओशाळवाणं केलंच. पण तरीही तिकडे दुर्लक्ष करून देवाचे आभार मानले कारण एक अपघात टळला होता. बरं ती काही छोटी गल्ली नव्हती तर चांगला मेन रोड होता. त्याने ब्रेक लावला नसता तर कदाचित वरचा रस्ता धरावा लागला असता.
ओह गॉड! नॉट अगेन! परत एकदा ठरवलं. चालत असताना, पायऱ्या चढत असताना अजिबात मोबाईल बघायचा नाही. बँकेत गेले. पासबुक अपडेट केलं. नेहेमीच्या सवयीने एफडी चा बोर्ड पाहिला. मागे पाहीले होते तेव्हा ६.५% होते. आता ७.५%. अरे वा ! एक टक्का वाढलाय. चौकशी केली तर समजलं. आजचा शेवटचा दिवस. उद्यापासून रेट परत कमी होणारेत. बँकेत बॅलन्सही वाढलाच होता. एफडी करायला झालीच होती. लगेच निर्णय घेतला. करून टाकू आताच. फॉर्म घेतला. भरला. पण बँकेला आधार कार्ड वगैरे अजून काही डॉक्युमेंट्स हवी होती. मग ह्यांना फोन लावला आणि त्यांची वाट पाहात बसले. दहाव्या मिनिटाला हे हजर झाले. घड्याळाचा काटा भराभर पुढे सरकत होता. ९.१३ कशीही गाठायला हवीच होती. हे आले ते बरंच झालं. बरोबर स्कुटर असणार. काम झालं की रिक्षा शोधत रहायला नको. एफडीचं काम आटपून बाहेर पडलॊ.
“मला जरा स्टेशनला सोडताय ना?”
“हो. बस.”
एरवी ड्रेस असला की मी दोन बाजूला पाय सोडून बसते पण आज नेमकी साडी होती. त्यामुळे कशी बशी एका बाजूला दोन्ही पाय घेऊन बसले.
“जरा फास्ट हं. नाहीतर ९.१३ जाईल माझी.” ह्यांच्या कानात कुजबुजले.
एरवी ‘हळू चालवा जरा.’ म्हणणारी मी आज फास्ट न्यायला सांगतेय त्यामुळे त्यांना बरंच झालं. सुसाट वेगाने स्कुटर निघाली. काय कसं माहीत नाही पण स्कुटरचं पुढचं चाक गर्रकन फिरलं आणि ती एका बाजूला कलंडली. आम्ही दोघंही पडलो. आणि क्षणात मागच्या बसने करकचून ब्रेक लावला. मी डोकं सावरलं होतंच. उचलून पाहिलं तर अक्षरशः तीन चार पावलांवर बस होती. दोघंही सुखरूप होतो. थोडंसं खरचटण्यापलीकडे काहीही इजा झाली नव्हती. ह्यांनी उठून परत स्कुटर चालू केली. ‘सावकाश’ मी परत ह्यांच्या कानात कुजबुजले. अजून हृदयात धडधडत होतं.
९.१३ मिळाली एकदाची. खूप गर्दी होती. खूप म्हणजे खूपच. नेहेमीपेक्षा डबल. शिवाय गाडी रडत खडत चालली होती. बाकीच्या बायका जे बोलत होत्या त्यावरून कळलं. ८.१७ ला अपघात झाला होता. लेडीज डबा घसरला होता रुळावरून. ऐकल्यावर छातीत धस्स झालं. ८.१७ म्हणजे आपली नेहेमीची ट्रेन जी आज सरितामावशीमुळे चुकली होती. तिला आपण नावं ठेवली सकाळीच फोन केला म्हणून. पण तिच्यामुळेच वाचलो आपण. आज हे काय होत होतं? तीन वेळा वाचलोय आपण आज. मृत्युच्या अगदी जवळ जाऊन परत आलोय. काय वाढून ठेवलंय आज? हे म्हणत होते तसं परतायला हवं होतं का घरी? नकोच पण. आज २ तारीख. शेड्युल्स, बँक रिको येतील आमच्या सगळ्या ब्रांचेसची. आमचं शेड्युल टॅली आहे पण आमचं हेड ऑफिस असल्याने आमच्या खालच्या ब्रॅंचेसचंही टॅली आहे की नाही हे पहायला लागतं. त्यांना मदत करणं ही आमची जवाबदारी असते.
तेवढयात विचारे मॅडमचा फोन वाजला.
“कुठे आहेस? आज रजा आहे का तुझी?”
“नाही मॅडम. येतेय. निघायला उशीर झाला थोडा. पोहोचते अर्ध्या तासात.”
“बरं बरं. काहीच हरकत नाहीय. फक्त आज आपल्या ऑफिसमध्ये नको येऊस. सरळ फोर्ट ब्रांच मध्ये जा.”
“का हो ? काय झालं?”
“अगं, सर्व्हर डाऊन आहे त्यांचा. त्यामुळे रिकंसिलेशन बॅक एंडला करावं लागेल. त्यांना ते जमत नाहीय. बाकी सर्वांचं सकाळीच आलंय रिको. त्या एका ब्रान्चचंच राहिलंय. त्यांचं झालं तर आपल्या डिव्हिजनला फ्लॅश मिळेल रिको प्रथम पाठवल्याचं.”
चला. बरंच झालं. आपल्या ऑफिसमध्ये न जाता सरळ फोर्ट ब्रांचमध्ये जायचं म्हणजे मला ऑन ड्युटी मार्क होणार. लेट वाचणार. नोकरी करणाऱ्यांचं हे असंच. एक लेटमार्क वाचला तर कोण आनंद? त्या आनंदात सकाळच्या त्या अपघातांचं मी विसरून गेले.
ब्रान्चमध्ये माझी वाटच पाहात होते. मी रिकंसिलेशन करण्यात एक्स्पर्ट आहे. त्यात अगदी एका पैशाचा फरक जरी आला तरी तो शोधून ते टॅली करण्यात माझा हातखंडा आहे. त्यामुळे ब्रांचला अडचण आली की आमच्या विचारे मॅडम मलाच पाठवतात. एकंदरीतच विचारे मॅडम माझ्यावर खुश आहेत. मी यायच्या आधी आमचं डिपार्टमेंट खूप अस्ताव्यस्त होतं. पाच सहा महिन्यांची कामं शिल्लक होती. वरच्या ऑफिसमधून सारखे फोन यायचे. मी आल्यानंतर उशिरापर्यंत बसून सर्व शिल्लक कामं हातावेगळी केली. दोन तीन महिन्यातच सर्व सुधारलं. एवढंच नाही तर आम्हाला वेगवेगळ्या गोष्टींकरता बक्षीसही मिळाली. आणि आता रिको, शेड्युल वगैरे वरच्या ऑफिसला पाठवण्यात आमचा नेहेमीच पहिला नंबर असतो. म्हणूनच विचारे मॅडम माझ्यावर खुश आहेत. मी त्यांच्याकरता लकी आहे असं त्या म्हणतात. ह्या लकी बिकी असण्यावर माझा मुळीच विश्वास नाही. हे सर्व आपल्या मानण्यावर असतं आमचे हे सुद्धा नशीब, ज्योतिष वगैरेवर फार विश्वास ठेवतात. म्हणूनच सकाळी आलेल्या अनुभवांमुळे ते मला आज ऑफिसला पाठवायला तयार नव्हते. आज महत्वाचं काम आहे. जायलाच हवं असं सांगून मी आले. तरी बरं ह्यांना अजून ती गोष्ट माहीत नाहीय. मुद्दामच बोलले नाहीय मी. अशा गोष्टी मी लगेच सांगून नाही टाकत. उगीच त्यांच्या डोक्यात तो किडा वळवळत रहातो मग.
***
मी धापा टाकत ब्रँचमध्ये पोहोचले. मला पाहून तिथल्या ऑफिसरचा जीवही भांड्यात पडला. मी रिकंसिलेशन टॅली करूनच निघणार याची खात्री होती त्यांना. चहा वगैरे झाल्यावर त्या मला आयटी (कॉम्प्युटर) रूममध्ये घेऊन गेल्या. बॅक एन्ड काम करायचं होतं त्यामुळे त्या छोट्या आय टी रूम मध्ये बसूनच काम करावं लागणार होतं. खरं तर आयटी रूममध्ये सर्व्हर, राऊटर्स, स्विचेस वगैरे कॉम्पुटर संबंधित उपकरणं असतात. त्यामुळे तिथलं तापमान कमी असायला लागतं. त्याच्या मोठ्या मोठ्या बॅटरीज असतात त्या वेगळ्या खोलीत असायला हव्या असा नियम आहे. फायर फायटिंग (अग्निशामक) मशीनही तिथे असायलाच हवं आणि तेही चालू अवस्थेत. पण ही ब्रँच अगदी गचाळ होती. एक तर जागा फार कमी होती. शिवाय व्हेंटिलेशन अजिबात नव्हतं. उजेड वारा अतिशय कमी. कधी पाण्याचे प्रॉब्लेम्स तर कधी विजेचा. त्यामुळे एकंदरीतच कर्मचाऱ्यांमध्ये खूपच असंतोष होता. आम्ही हेडऑफिसवाले गेलो की आम्हाला त्यांची सर्व गाऱ्हाणी ऐकून घ्यावी लागत असत.
आजही तसंच झालं. अर्थात ह्या त्यांच्या अडचणींशी माझं काहीच देणंघेणं नव्हतं. ते सांगत होते त्या गोष्टी माझ्या किंवा माझ्या डिपार्टमेंटच्या अखत्यारीतील नव्हत्या. मला माझ्या कामाशी मतलब होतं. त्यामुळे ते ज्या इतर समस्या सांगत होते त्या मी एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून दिल्या आणि मी ज्या कामाकरता आले होते ते काम सुरु केलं. लंच नंतरही आमचं काम सुरुच होतं. घामाने आम्ही बेजार झालो होतो. त्यामुळे कामाला म्हणावा तसा वेग येत नव्हता. ह्या अशा वातावरणात रोज काम करणं खरंच अवघड होतं. मला तिथल्या कर्मचाऱ्यांची दया आली. प्रोग्रॅमरची तर खूपच. बिचारा अख्खा दिवस या छोट्याश्या आयटी रूम मध्ये काम करत असतो.
केवढी अडगळ होती तिथे. वायर्सचं जाळं पसरलेलं होतं. बॅटरीज नियमाप्रमाणे वेगळ्या रूममध्ये न ठेवता तिथेच ठेवल्या होत्या. नियमाप्रमाणे इथलं तापमान २४ डिग्रीपेक्षा कमी हवं. पण एसी काम करत नव्हता त्यामुळे ते तापमान ३२ डिग्री होतं. हाशहुश करत आम्ही कॉम्पुटर वर आमचं काम करत होतो.
तेवढयात ‘फाट’ असा स्विच उडाल्यासारखा आवाज झाला. आणि क्षणात तिथे आगीचा मोठा लोळ उठला. आम्ही घाबरून दरवाजाच्या दिशेने गेलो. दरवाजा उघडायला गेलो तर तो दरवाजा एवढा घट्ट बसला की आम्हाला तो उघडताच येईना. किती प्रयत्न केला तरी दरवाजा उघडेना. इथे आग वाढत चालली होती. प्रोग्रॅमरने हुशारी करून तिथलं फायर फायटिंग मशीन वापरून आग कमी करायचा प्रयत्न केला. बाहेरचं कोणीतरी खालून वॉचमनला घेऊन आलं. त्याच्या जवळच्या आयुधांनी त्यांनी त्या रूमचा काचेचा दरवाजा चक्क फोडला आणि आम्हाला बाहेर काढलं.
बाहेर पडल्या पडल्या माझ्याबरोबर कामाला बसलेल्या ऑफिसरला चक्कर आली आणि मलाही श्वासोश्वासाचा त्रास होऊ लागला. इथे आग आटोक्यात आली होती. त्यामुळे सर्वाचं लक्ष आमच्याकडे वळलं. डॉक्टरना बोलावलं. आम्हा दोघांचंही बीपी शूट झालं होतं. आम्हाला डॉक्टरानी इंजेक्शन देऊन विश्रांती घ्यायला सांगितली. मला तिथल्या कोणीतरी टॅक्सीत घालून घरी सुखरूप पोहोचवलं. ह्यांना फोन करून आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ते घरी आले होते. मला डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शनमुळे शांत झोप लागली. उठले तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. नुसती खिचडी कढी केली आणि भराभर आवरून बेडरूममध्ये आले. झोप झाली असली तरी डोकं दुखत होतं. दिवसभराच्या ताणामुळे असणार.
आजचा दिवस फारच विचित्रपणे गेला होता. एकाच दिवसात मी वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवातून गेले होते. त्याही साध्या सुध्या नव्हे तर मृत्यूच्या. मृत्युचं दर्शन मी आज अगदी जवळून घेतलं होतं. त्याला मी सकाळपासून हुलकावणी दिली होती. एकदा दोनदा नव्हे तर अनेकदा. यामागे काय असेल? भूत प्रेत, कर्ण पिशाच्च, नशीब, पत्रिका, ज्योतिष कशाकशावर विश्वास न ठेवणारी मी आज पुरती गोंधळून गेले होते.
दोन महिन्यापूर्वी आईकडे आलेला तो माणूस मला आठवला. बहिणीचा अशा सर्व गोष्टींवर भलताच विश्वास. तिची तब्येत सारखी बिघडायची म्हणून तिने त्याला बोलावलं होतं. त्याला म्हणे कर्णपिशाच्च येऊन समोरच्याचं भविष्य त्याच्या कानात सांगतं आणि तो ते आपल्याला सांगतो. त्या दिवशी तो माझ्याकडे बघून म्हणाला होता, “खूप जपावं लागेल. २ जानेवारीला अपघातामुळे जबरदस्त मृत्युयोग आहे. आडमृत्यू म्हणा ना.”
त्यावर मी त्याला गप्प केलं होतं. बहीण म्हणत होती, “अगं, उपाय विचार ना.” पण मी तिच्यावरही रागावले होते. तो गेल्यावर आईला, बहिणीला मोठठं लेक्चरही दिलं होतं. आणि ह्यांना यातलं काही कळता कामा नये अशी सक्त ताकीदही दिली होती.
त्याने सांगितलेलं मी काही मनावर घेतलं नव्हतं. एवढंच काय तर सर्व विसरूनही गेले होते. पण आज २ जानेवारीला हे सर्व घडल्यावर मात्र मला त्याची आठवण आली होती. ८.१७ च्या ट्रेनचा अॅक्सिडन्ट, मोबाईल बघत जाताना गाडीने लावलेला ब्रेक, स्कुटर उलटून पडले तेव्हाच अपघात आणि आता ब्रान्चमध्ये आगीतून सहीसलामत बाहेर पडले तो प्रसंग. लागोपाठ चार वेळा मी मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन परत आले होते. त्याला हुलकावणी दिली होती. केवळ माझं नशीब जोरदार होतं म्हणूनच मी वाचले होते.
आजचा दिवस सरला होता. आता मी काही बाहेर नव्हते. माझ्या घरात मी सुखरूप होते. माझा अपघाती मृत्यु टळला होता. बिछान्यावर पडल्या पडल्या मला सर्व आठवत होतं. कर्णपिशाच्च खरंच येऊन कानात सांगत असेल त्याच्या? तारखेसकट सगळं? इतकं तंतोतंत? माझा थोडा का होईना त्या माणसावर विश्वास बसला होता. आज होताच माझ्या नशिबात आडमृत्यू. नक्कीच. आईला सांगावं का उद्या त्याला बोलाव म्हणून. अजून काही असेल आणि शांत वगैरे करायची असेल तर करून घेऊ. खूप रात्र झाली होती म्हणून. नाहीतर आताच फोन केला असता. तसंही त्या माणसाबद्दल मला ह्यांच्याशी बोलायचं होतं. ह्यांना सर्व सांगायचं होतं. पण हे अजून झोपायला आले नव्हते. ते अजून का येत नाहीत हे पाहण्याकरता म्हणून मी उठायला गेले तोच.....
तोच वरचं छत वेगाने पंख्यासकट माझ्या दिशेने मला येताना दिसलं. मी बावरले. घाबरले. बाजूला होण्याइतकाही वेळ नव्हता. अंधारी येणाऱ्या डोळ्यासमोर फक्त समोरचं घड्याळ आलं. त्यात बारा वाजायला एक मिनिट होतं. फक्त एकच मिनिट होतं…
***समाप्त***
नवल
डेड एन्ड ई-बुकमधून
कथेचा ऑडिओ
कथाविश्व - आपले कथांचे अनोखे विश्व🎉
No comments:
Post a Comment