TechRepublic Blogs

Monday, November 3, 2025

कांदेभजी

 *आज कांदेनवमी ! एक विलक्षण खाद्ययोग !!*


पूर्वी आषाढी एकादशीच्या आधीच्या दिवसात, घरात कांही तेल-तुपाचे पण पचायला हलके पदार्थ मुद्दाम तयार केले जात  असत. त्याला आषाढ तळणे असे म्हणत असत. पावसाळ्यात अनेक रोगांच्या साथी उद्भवतात. हा मरीआई देवीचा कोप मानला  जात असे आणि असा कोप होऊ नये म्हणून या देवीची पूजाअर्चा करून तिला नैवेद्य अर्पण केला जात असे. 


पण आषाढ शुद्ध नवमी ही कांदेनवमी म्हणून मोठ्या प्रमाणावर साजरी केली जात असे. या नंतर दोनच दिवसांनी आषाढी एकादशी आणि तेव्हाच सुरु होणारा चातुर्मास हा एक मोठा धार्मिक-सामाजिक कालखंड असे. चार महिने कांदा, लसूण, वांगे असे वातूळ आणि पचायला जड असलेले पदार्थ खाणे वर्ज्य केले जात  असे. म्हणून या नवमीच्या दिवशी घरात असलेले सर्व कांदे हे संपविले जात असत, अर्थातच कांदाभजी ( आणि कांद्याचे अनेक पदार्थ ) करून ! 

यासोबतच बटाटा, वांगी, मिर्ची, ओव्याची पाने, मायाळूची पाने यांचीही भजी केली जात असत. घरातील सर्व मंडळी यात सामील होत असत. गावाकडे तुफान पडणारा पाऊस आणि गरमगरम भजी, हा एक विलक्षण खाद्ययोगच म्हणायचा  !      


कांदाभजी आणि पाऊस यांचे काय नाते आहे काही माहिती नाही. पण आता पावसाचा राग " मेघ " रंगत चालला आहे. भज्यांच्या आठवणींनी आणि काल्पनिक वासाने जीभ चाळविली गेली आहे. मसाल्याच्या वाफाळत्या चहाचा गंध पसरल्याचा  भास होतो आहे. अनेक मैफिलीत ऐकलेल्या पावसाच्या अनवट कविता आणि गीते मनात रुंजी घालतायत !  मन तरलतेने एका खाद्यात्मिक अनुभूतीचा शोध घेत आहे. 


कांदा हा तसा या भूतलावरचा  एक अजब पदार्थ आहे. अध्यात्मापासून आयुर्वेदापर्यंत आणि राजकारणापासून बुद्धिमत्तेपर्यंत याचा मोठाच दबदबा ! अध्यात्म हे कांद्यापासून सोवळे पाळून लांब राहते खरे पण खुद्द कांदा हा भलताच अध्यात्मिक आहे. आडवा कापला तर सुदर्शन चक्रासारखा दिसतो. उभा कापला तर शंखासारखा दिसतो. पातीसह हाती धरला तर गदेसारखा दिसतो. टोक तसेच ठेऊन उभ्या पाकळ्या चिरल्या तर कमळासारखा दिसतो. म्हणजे एकाच कांद्यामध्ये  शंख, चक्र, गदा आणि पद्म दिसणारा कांदा हा केवढा पवित्र ! आयुर्वेदामध्ये त्याला खूप मान आहे.  एखाद्याला तो शुद्धीवर आणण्याचे काम तो करतो. निवडणुका नसल्या तर तो शेतकऱ्यांना रडवतो आणि निवडणूका असल्या तर राजकारण्यांना घाबरवतो. एखाद्याच्या अकलेचा उणे निर्देशांक कांद्यामध्ये मोजला जातो. 


ते काहीही असले तरी या कांद्याची भजी आणि धुंद पाऊस यांचे मात्र एक नाशिले नाते आहे हे नक्की ! याची लज्जत आणि रंगत वाढविण्यासाठी काही शिष्टाचार आणि नियम पाळणे फार महत्वाचे आहेत. बाहेर तुडुंब पाऊस हवाच. तुम्ही त्यात थोडेतरी भिजलेले असायला हवे. निदान  पावसाच्या सान्निध्यात तरी हवे. तळणीच्या धगधगत्या होमकुंडावरील कढईत नाचणाऱ्या भज्यांच्या गंधाने  आसमंत व्यापलेला असावा. मित्रमैत्रिणी, आप्त, सहकारी अशा मंडळींसोबत गप्पा सुरु असतांना पुढ्यात गरमागरम भज्यांची प्लेट यायला हवी. सोबत हिरवी मिरची किंवा लसूण चटणी हवी. पाण्याच्या ग्लासाऐवजी मसाल्याच्या चहाचा ग्लास हवा. बाहेर पावसाचा, टेबलवर गप्पांचा आणि समोर भज्यांचा पुरवठा वाढत जायला हवा. हळूहळू आपण खाद्यात्मिक अनुभूतीची वरची वरची पायरी चढू लागतो. 


कधीकधी अशा भजी-मेहेफीलीचा बेरंग करणाऱ्या गोष्टी घडतात. भज्यांसोबत गोड चटणी देणे हा चव हक्कभंग आहे. कांही वेळा, कांही ठिकाणी सोबत येणारी गोड पातळ चटणी किंवा पातळ हिरवी चटणी या भज्यांचा, एखादा मांचुरियन अवतार करून टाकतात. एखाद्या ठिकाणी कांदाभजी खातांना त्यात धना घातलेला खावा लागतो. तो तर फार खटकतो. एखादा मस्त रंगलेला मल्हार राग ऐकतांना मध्येच चुकून कोमल रिषभ ऐकू आला तर जसे खटकते तसेच हे खटकते. ती भजी तुम्हाला नीट पचावीत म्हणून त्यात धणे  घालतात

आज कांदेनवमी आहे. हे आख्यान वाचून तरी हा कांदेभजी योग चुकवू नका .😃👌👍

No comments:

Post a Comment