TechRepublic Blogs

Monday, November 10, 2025

त्रिकालज्ञ

 !!!  गोंदवलेकर महाराज  !!!

                  भाग - ११.

                जिजीबाईंच्या घरी महाराजांचा मुक्काम होता. तिथे दर्शणार्थींची खूपच गर्दी होऊ लागली. त्यांच्यापासून सुटका होण्यासाठी महाराज मग रस्त्यावरून पळत सुटायचे. त्यांच्या मागे  मुलं लागायची. अहोऽ! " गुंडोजी बुवा "  म्हणून ओरडत मुले त्यांच्या मागे जात. महाराज पळत पळत दूरवर जाऊन थांबायचे. मुले पोहोचले की, मग महाराज त्या मुलांबरोबर खेळायचे. आणि त्यांना राम नाम घ्यायला लावायचे. सर्व मुले नाम घेत घेत नाचत असत. मुले फारच त्रास द्यायला लागली की, महाराज एखाद्या झुडपाआड लपायचे. शोधूनही सापडायचे नाही. मग मुलं काकुळतीने म्हणायचे, बुवा बाहेर या. आता आम्ही त्रास देणार नाही.

              एकदा इंदूरचे राजे होळकर महाराजांच्या दर्शनाला येत असल्याचे महाराजांना कळविण्यात आले. पण महाराजांना त्यांची भेट घ्यायची नव्हती. त्यांनी काय करावे तर, एका मोलकरणीचे लुगडं नेसले. डोक्यावर पदर घेतला. व जात्यावर दळायला बसले. ओव्याही म्हणू लागले. तेवढ्यात राजे येऊन पोहोचले. त्यांनी इनामदारांजवळ महाराजांची चौकशी केल्यावर आधीच पढवून ठेवल्यानुसार इनामदार म्हणाले, ते बाहेर गेले. कधी येतील सांगता येत नाही.

              निराश होऊन राजे महाराजांच्या समोरून निघून गेले. पण त्यांना महाराजांना ओळखता आले नाही. जिजीबाईची मात्र हसून हसून मुरकुंडी वळली. संत ज्यांची आस्था,श्रद्धा असते त्यांनाच भेटतात.

        एकदा जीजीबाईच्या पाच-सहा वर्षाच्या ताई नावाच्या मुलीशी महाराज खेळत होते. ती महाराजांच्या शिवाय बिलकुल राहत नसे. असेच तिच्याशी सागर गोट्या खेळत असताना एक बैरागी महाराजांकडे आला. त्याला महाराज एका मुलीशी खेळताना पाहून तो परत जाऊ लागला. तोच महाराजांनी त्याला मोठ्या प्रेमाने बोलावले. विचारले, आपले काय काम होते?

      तो म्हणाला, मला लहानपणापासून योगाभ्यासाची आवड आहे. बायको वारल्यानंतर संसार मुलावर सोपवून हिमालयात गेलो. तिथे एका सत्पुरुषा जवळ पाच सहा वर्षे योगाभ्यास शिकलो. मी काही अडचणी त्यांना विचारल्यावर, त्यांनी इथला पत्ता देऊन आपल्याकडे पाठवले. पण येथे येऊन माझी निराशाच झाली. आपल्याला काही ज्ञान असेल असे वाटत नाही. म्हणून मी परत जात आहे. 

      महाराज म्हणाले, आपण थोडं थांबा. बघा काही फायदा होतो का? असे म्हणून त्यांनी त्या लहान मुलीला म्हणाले, ताई पद्मासन घाल व समाधी लाव. ताईने पद्मासून घातले व समाधी लावली. पंधरा मिनिटांनी महाराजांनी तिला उठायला सांगितले. ती भानावर आल्यावर, वैराग्याला महाराज म्हणाले, तुमचे प्रश्न हिला विचारा. आणि त्यांच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे ताईने दिली. बैरागी महाराजांना शरण गेला. म्हणाला, महाराज, क्षमा करावी. आपली योग्यता आज्ञानवश मी ओळखू शकलो नाही. क्षमा करा... क्षमा करा... मग महाराजांनी त्यांच्या सर्व समस्या, अडचणी सोडवल्या. वैरागी आनंदाने, समाधानाने परत गेला.

        महाराज इंदूरमध्ये येऊन सहा महिने झाले होते. त्यांना जायचे होते. पण इनामदार, जीजी, ताईचा प्रेमळ आग्रह त्यांच्या पायात बेड्या टाकत होते. जायचे तर होतेच. ते संधीच्या शोधात होते. आणि संधी मिळाली.

           एकदा रात्री एक गवळी महाराजांना भेटायला आला. महाराज नुकतेच पहुडले होते. जीजी म्हणाल्या, गवळीबुवा उद्या यावे. तो निघून गेला. दुसऱ्या दिवशी गवळी सकाळी आल्यावर महाराजांनी विचारले, काल का नाही आलास? किती वाट पाहिली? गवळीने सहज रात्रीची हाकिकत सांगितली. बस महाराजांना निमित्त मिळाले. लागले अकांड तांडाव करायला. मी आता इथे क्षणभरी थांबणार नाही. मला कोणाला भेटायला देत नाही. माझा अगदी कोंडमारा होत आहे. घरी कोणालाच कळेना, महाराजांना एकाएकी काय झाले? इनामदार, जीजी, ताई सगळे त्यांना न जाण्याबद्दल विनवणी करू लागले. 

         इनामदार म्हणाले, आमचे काही चुकले असेल तर, क्षमा करा. पण जाऊ नका. महाराज शांत झाले. म्हणाले, आता मला जायला हवे. लवकरच परत येईल. असे म्हणून सर्वांचा निरोप घेतला. व इंदूर सोडले.

           इंदुर सोडल्यावर महाराज तीर्थाटण करत करत गोंदवल्याला आलेत. आई-वडिलांचे दर्शन झाले. पण ओळख दिली नाही. मोठ्या पहाटेचे सासरवाडी खातवळला गेले.

            तिथलाही मुक्काम गावा बाहेरच होता. लोक दर्शनाला येत होते. त्यांचे तेजस्वी रूप पाहून लोक त्यांना त्रिकालज्ञ म्हणू लागले. कोणाला औषधी दे, कोणाच्या समस्याचे समाधान कर. अशा प्रकारे सर्वांच्या अडचणी सोडवून समाधान करत होते.

            महाराजांच्या पत्नीचे नाव  " सरस्वती " होते. सरस्वतीच्या आईला कोणीतरी सांगितले की, गावाबाहेर आलेल्या सत्पुरुषाची भेट घे. म्हणजे तुम्हाला योग्य फळ व मार्गदर्शन मिळेल.

         क्रमशः 

संकलन व लेखन,

 मिनाक्षी देशमुख.

No comments:

Post a Comment