🕉️ *अष्टावक्र गीता/ प्रथम अध्याय-१*🕉️
*सत्य काय ?*
अष्टावक्र गीता हा जनकमहाराज व अष्टावक्र मुनी यांच्यातील संवाद आहे. तसं बघितलं तर जनक महाराज स्वतः विद्वान होते. त्यांच्या पदरी अनेक पंडित होते. पंडितांना आत्मज्ञान म्हणजे काय ते माहीत होते पण त्यांना त्याची अनुभूती नव्हती. म्हणजे आत्मज्ञान झालेल्या माणसाच्या मनःस्थितीची त्यांना कल्पना नव्हती. त्यामुळे जागृतअवस्था व स्वप्नावस्था यातील खरी कोणती ? असा प्रश्न जनकमहाराजांनी दरबारात विचारला असता पंडितांपैकी कुणालाच समाधानकारक उत्तर सांगता येईना. तेव्हा सभेतील पंडित एकमुखाने म्हणाले , " याचं उत्तर अष्टावक्र मुनीच देऊ शकतील , कारण ते आत्मज्ञानी आहेत."
दरबारातल्या पंडितांचं म्हणणं ऐकून जनक महाराजांनी अष्टावक्र मुनींना विचारलं , " मुनिवर , माणसाला वाघ मागं लागल्याचे स्वप्न पडले असेल तर स्वप्नात तो घाबरून पळत सुटतो. कारण त्यावेळेस तो मागं लागलेला वाघ स्वप्नात अनुभवत असतो. पण जेव्हा तो जागा होतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे वाघ वगैरे काही नाही मी तर माझ्या घरी गादीवर आरामात झोपलेलो आहे.
आता माझा प्रश्न असा आहे की , वाघ मागं लागलाय म्हणून पळत सुटलाय ही स्वप्नावस्था व घरी गादीवर आरामात झोपलाय ही जागृत अवस्था या दोन्ही अवस्थांपैकी सत्य कोणती ?"
वरील प्रश्नाचं सामान्य उत्तर जागृत अवस्था हीच खरी असं वाटणं सहाजिक आहे परंतु जनक महाराजांच्या प्रश्नाचे उत्तर देताना आत्मज्ञानी अष्टावक्र मुनि म्हणतात , " राजा , या दोन्हीही अवस्था खोट्या आहेत. जोपर्यंत तू दोरीला साप समजतोस तोपर्यंत तू घाबरलेला असतोस आणि ती दोरी आहे हे कळल्यावर तू निर्धास्त असतोस. या घाबरणे आणि निर्धास्त असणे या दोन्हीही अवस्था तात्पुरत्या असतात. तसं स्वप्न व जागृती या दोन्हीही अवस्था तात्पुरत्या आहेत आणि म्हणूनच असत्य आहेत.
*तू मूळचा परमेश्वरी अंश आहेस तेवढंच फक्त सत्य आहे.*
कारण ,
मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याला नाव नसतं. कालांतराने त्याचं बारसं करून नाव ठेवलं जातं. आईबापांच्यावरून आडनाव मिळतं. जात ठरते. त्यानुसार संस्कार होतात. कुळाचा अभिमान बाळगला जातो. असा काहीसा प्रत्येकाचा आयुष्यक्रम चालू राहतो.
पण तू बेसावध राहू नकोस. एक लक्षात घे , आपण सर्व मूळचे ब्रह्माचे अंश आहोत. म्हणून आपलं कुळ ब्रह्माचं आहे. त्याला शोभेल असं वर्तन ठेव. *आपण सर्व या सर्व दृश्य जगापेक्षा वेगळे आहोत हे लक्षात घेऊन यापासून अलिप्त होऊन रहायला हवं.*
मुनींच्या उत्तराने जनकमहाराजानी अतिशय प्रभावित झाले. त्यांनी अष्टावक्र मुनींना गुरु केले. त्यांची आत्मज्ञान विषयक जिज्ञासा जागृत झाली आणि त्यांना पडलेल्या तीन प्रश्नापैकी एक प्रश्न मुनींना विचारला की , *महाराज वैराग्य कसं येतं ?*
*क्रमशः*✍️
No comments:
Post a Comment