!!! गोंदवलेकर महाराज !!!
कर्नाटकचे ब्रह्मानंद महाराजांचे पट्ट शिष्य होते. त्यांचा संस्कृतचा गाढा अभ्यास असून देखील महाराजांच्या सांगण्यानुसार ते फक्त नामच जपत असत. तसेच आनंद सागर हे जालन्याचे महाराजांचे शिष्य. त्यांनी तर नामालाच वाहून घेतले होते .
असे महाराजांचे कितीतरी भक्त होते. अनेकांच्या शंकाचे निरसन त्यांनी केले. वैदिक ब्राह्मणांना नामाचे महत्त्व पटवून दिले. मनुष्याने रोजच्या लौकिक जीवनात कसे वागावे हे ही सांगितले. म्हातारपणी थोडे पैसे ठेवावे. पण पैशाचा आधार न वाटू देता नामाचा वाटावा.
अन्नदान करताना मागे पुढे पाहू नये. अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. दत्त मंदिराचे पुजारी रामभट जोशी होते. त्यांचा बाळंभट नावाचा मुलगा, वेद पठण केलेला. पण त्याला गांजाचे व्यसन लागले. महाराज त्याला समजावत म्हणाले, बाळंभट, आपण वैदिक ब्राह्मण आहात. नामस्मरण करावे. कल्याण होईल. बाळंभट म्हणाले, मला गांजा पुरवला तर आपले म्हणणे ऐकेन. महाराजांनी त्यांना रोज एक आण्याचा गांजा पुरवण्याची सोय केली.
एक दिवस त्यांना गांजा मिळाला नाही म्हणून ते तरातरा महाराजांकडे आले. त्यावेळी महाराज मंदिरात काही लोकांचे समाधान करीत होते. काही वेळ बाळंभट ऐकत राहिले. व गांजा विसरले. तेवढ्यात महाराजांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. म्हणाले, अरे आज गडबडीत विसरलो. मी आता जाऊन घेऊन येतो. म्हणून ते बाजारात जायला निघाले. इतक्या रात्री महाराज स्वतः जात असलेले पाहून बाळंभटाला वाईट वाटले. त्यांनी महाराजांचे पाय घट्ट धरून म्हणाले, महाराज, मला या व्यसनातून मुक्त करा. खरंच व्यसन सोडायचे आहे का? होय महाराज! मग रामाच्या चरणावर हात ठेवून शपथ घ्या की, पुन्हा गांजाला शिवणार नाही. तुमच्या आजपर्यंतच्या पापाची जबाबदारी माझी. बाळंभटाने महाराजांचे ऐकले. त्यांचे व्यसन सुटले.
गोदूबाईंच्या मुलाची आज मुंज होती. महाराजांना आमंत्रण होते. पण त्यांना जाणे शक्य झाले नाही. मुंजीची पंगत बसली. पण अद्याप गावावरून तुप आले नव्हते.ती मोठ्या काळजीत पडली.महाराजांच्या तसबीरी समोर बसली. तिला त्यांचे शब्द आठवले, गोदुमाय, मी इथून जातो म्हणून दुःख करू नकोस. तू जेव्हाही आठवण काढशील, मी तुझ्यासमोर हजर असेन. मात्र सतत नामस्मरण कर. तिने कळवळून महाराजांना हाक मारली. महाराज तसबीरीतून बाहेर येऊन म्हणाले, गोदे, तुपाचे भांडे दे. ते भांडे त्यांनी तुपाने भरून दिले. जवळ जवळ ३०० लोकांना पुरूनही तूप शिल्लक उरले होते. महाराज म्हणाले, गोदे, राम नामात फार मोठी शक्ती आहे. " जो नामात स्वतःला विसरला त्याचे मागे मागे राम फिरला।" असे म्हणून ते अदृश्य झाले.
एकदा महाराजांकडे कुबेर नावाचे गृहस्थ आले व म्हणाले, महाराज, मला काहीतरी नियम सांगा. महाराज म्हणाले, रोज नाम घेणेच सर्वोत्तम नियम आहे. तो म्हणाला, तुम्ही सांगाल तो नियम मी काटेकोरपणे पाळीन. महाराज म्हणाले, रोज जेवण्या पूर्वी पानावर बसल्यावर तीन वेळा श्रीराम म्हणावे. नक्की राम दर्शन होईल. कुबेराला हा नियम फारच सोपा वाटला. ते निघून गेले.
काही दिवसांनी पुन्हा कुबेर गोंदवल्याला आले. म्हणाले, महाराज मला नियमाचा स्वप्नात देखील विसर पडणार नाही. दुसऱ्या दिवशी महाराजांनी रामाला लवकरच नैवेद्य दाखवला. सर्वजण पानावर बसले. कुबेरही बसले.महाराजांनी काही तरी बोलणे काढून सर्वांचे लक्ष विचलित केले. ऐकत असतानाच महाराजांनी एकदम जेवण्याची घाई केली. सगळ्यांनी जेवण्यास सुरुवात केली. महाराज कुबेरासमोर येऊन हळूच म्हणाले, आता श्रीराम नाव रात्री घेणार का?
शब्द ऐकले मात्र, नियमाच्या आठवणीने कुबेराच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाले, महाराज, माझा गर्व हरण झाला. आपले म्हणणे खरे आहे. नियम पूर्ण होण्यास, त्याचे नाव घेण्यास सुद्धा रामाची कृपा लागते.
एक दिवस एक मनुष्य ब्रह्मदर्शन व्हावे म्हणून पुष्कळ तीर्थयात्रा करून पंढरपूरच्या तपकिरी बुवांच्या सांगण्यावरून गोंदवल्याला आला. म्हणाला, महाराज, मला ब्रह्म दाखवा. म्हणाला, मला भोगवासना नाही. पैशाचा मोह नाही. स्त्री पुरुष भेदही राहिलेला नाही. महाराज म्हणाले, ठीक आहे. उद्या ब्रह्म दाखवतो. दुसऱ्या दिवशी तो मनुष्य ओढ्यावरून स्नान करून येत होता. महाराज पटाईत मावशीला म्हणाले, मावशी, त्याचे धोतर फेड. तिने पुढे जाऊन त्याचे अर्ध अधिक धोतर फेडले. एक विधवा बाई आपले धोतर फेडतसे पाहून त्यांना अतिशय राग आला. तसाच मंदिरात येऊन महाराजांना म्हणाला, ही बाई आहे की कोण? अहोऽ या सटवीने माझे धोतर फेडले की हो!
महाराज शांतपणे म्हणाले, म्हणजे ती बाई बाईच दिसली. तुम्हाला धोतर फेडण्याची लाज वाटली. म्हणजे तुम्ही काल जे बोललात ते सर्व खोटे होते. तुम्हाला देह, वस्त्र, मानापमानाची शुद्ध आहे तर! तुम्हाला ब्रह्म कसा दाखवू? महाराजांनी त्याला नामस्मरण करायला सांगितले.
एकदा एक हरदास बायकोसह वाईच्या शास्त्री मंडळीच्या सांगण्यावरून महाराजांकडे आला. म्हणाला, मी हरदास आहे. उद्या सकाळी कीर्तन करीन. महाराजांनी त्याचा खूप आदर सत्कार केला सगळ्यांना उद्या कीर्तनाला यायला स्वतः सांगितले.
क्रमशः
संकलन व लेखन,
मिनाक्षी देशमुख.
No comments:
Post a Comment