TechRepublic Blogs

Friday, December 27, 2024

लाचारी

 पु.श्री.परमाचार्य नावाचे मोठे सत्पुरुष होऊन गेले. त्यांचे एक शिष्य म्हैसूरच्या न्यायालयात न्यायाधीश होते. हे सद्गृहस्थ श्री.शंकराचे भक्त होते. "ओम नम: शिवाय " या मंत्राचा पाच हजार जप केल्याशिवाय ते जेवत नसत. त्यांना ईश्वरदर्शनाची ओढ होती.

 निवृत्त झाल्यावर ते सद्गुरूंकडे आले आणि म्हणाले " मला ईश्वरदर्शनाचा मार्ग सांगा " सद्गुरू त्याला म्हणाले " मी मोठा न्यायाधीश होतो हे आधी विसरा" 

( अमानित्व) ते  विसरण्यास काय करायचे ते सांगा असे म्हटल्यावर सद्गुरू म्हणाले " जेथे आपणांस कोणी ओळखणार नाही अशा ठिकाणी जाऊन भीक माग." मग ते न्यायाधीश सद्गुरुंच्या आज्ञेनुसार घर सोडून द्वारकेला गेले. 

तेथे श्रीकृष्णाच्या मंदिरासमोर ते भिकाऱ्यांच्या रांगेमध्ये बसून भीक मागू लागले. कमरेला एक पंचा, खांद्यावर एक टॉवेल व हातामध्ये एक पत्र्याचा डबा असा त्यांचा अवतार होता. एकदा तेथे म्हैसूर सरकारचे एक शिक्षण अधिकारी मे महिन्याच्या रजेत द्वारकेला गेले. 

श्रीकृष्णाच्या दर्शनाला जाताना त्यांनी या भिकाऱ्याला पाहिले. या माणसाला कुठेतरी पाहिले आहे असे त्यांच्या मनात आले.पण बरोबर आठवेना. बारा वाजता मंदिर बंद झाले तसे भिकारी उठून जाऊ लागले.

 हे आधिकारी त्या न्यायाधीशाच्या मागे जाऊ लागले.  न्यायाधीश आपल्या खोलीवर गेले . कुलूप काढताच या अधिकाऱ्याने त्यांना ओळखले . नमस्कार करून विचारले " हे असे का ?"

 न्यायाधीश म्हणाले " माझ्या मनातील मोठेपणाची भावना नाहीशी करण्यासाठी सद्गुरूंनी हे करायला सांगितले." मग ते साधले का ? असे विचारल्यावर न्यायाधीश म्हणाले "

 मी मोठा न्यायाधीश होतो हे मी खरच विसरलो. पण लोकांजवळ भीक मांगताना अजून खऱ्या भिकाऱ्याची लाचारी येत नाही. मला पेन्शन आहे हे विसरणे कठीण जाते ."

No comments:

Post a Comment