*🌹🙏 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🍀कृष्णलीलांचे चिंतन व रामचरित्राचे अनुकरण!🍀*
*एकदा एका भक्ताने अशी गमतीची शंका विचारली की, नरकासुराचा वध केल्या नंतर त्याच्या बंदिवासातून सोडविलेल्या सोळा सहस्त्र स्त्रियांशी श्रीकृष्णांनी लग्न केले इतकी लग्ने करायला त्यांना किती वेळ लागला असेल ?*
*श्रीमहाराज म्हणाले, "राम नाम घ्यायला याच्या उत्तरावाचून काही अडचण आहे का ? पण असो किती दिवस लागले असतील असे तुम्हाला वाटते ?" त्यावर ते गृहस्थ म्हणाले " अगदी एक दिवसात एक म्हटले तरी जवळ जवळ पंचेचाळीस वर्षे लागतील !"
श्रीमहाराज म्हणाले "श्रीकृष्णपरमात्म्याने हे सर्व एका दिवसांत उरकले "ते गृहस्थ आश्चर्याने थक्क होऊन म्हणाले, "ते कसे काय ?" तेव्हा महाराज म्हणाले, "अहो तुम्ही रोज विष्णुसहस्त्रनाम म्हणता ना ? त्यात त्याचे उत्तर आहे शेवटच्या नमनात काय शब्द आहेत ?
"नमोsस्तनंताय सहस्त्रमुर्तये". हजारो रुपांनी वावरणारा असेच वर्णन आहे ना ? तर प्रभूंनी सोळा हजार रुपे धारण करुन सोळा हजार स्त्रीयांशी लग्न करण्याचे काम एकाच दिवसांत उरकले. मात्र अशा अनंत रुपानी व्यक्त होण्याचे सामर्थ्य ज्याचे असेल त्यानेच अशी लग्ने केली तर शोभतात.
एका लग्नाने रडकुंडीस येणारा या फंदात पडेल तर घसरेलच त्या गृहस्थांनी पुढे आणखी प्रश्न केला की, "महाराज कृष्णप्रभूंनी त्या स्त्रीयांना आपल्या पतीकडेच का पाठवून दिले नाही? त्यावर श्रीमहाराज म्हणाले, "त्या असुरांच्या बंदिखान्यात ज्यांना दीर्घकाळ कंठावा, लागला
त्या स्त्रियांना पुन्हा पूर्वी इतक्याच प्रतिष्ठेने त्यांच्या पतींनी स्विकार केला असता असे तुम्हाला वाटते ? आणि मग त्या बिचाऱ्यांची समाजात काय अवस्था झाली असती ? अगदी साधे जगणेही त्यांना अशक्य झाले असते आणि सर्व समाज अनीतीने किडून सडून गेला असता म्हणून केवळ समाजधारणेसाठी प्रभूंनी त्यांचा स्वीकार केला त्यांना प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली.
त्यांचा उध्दार केला आपण हे लक्षांत ठेवावे की श्रीकृष्ण हे लीलापुरुषोत्तम होते त्याच्या लीलांचे चिंतन करावे. आश्चर्य करावे. अनुकरण योग्य नाही*
*अनुकरणासाठी मर्यादा पुरुषोत्तम रामरायाचेच चरित्र डोळ्यापुढे ठेवावे."*
*!! श्रीराम जयराम जय जय राम !!*
*प.पू.सदगुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज*
No comments:
Post a Comment