TechRepublic Blogs

Thursday, December 19, 2024

ॲाक्सिजन

 *ॲाक्सिजन* 🌸 🌞


मृण्मयी ॲाफिस मधून खूप दमून घरी आली होती. चार वर्षाच्या तन्वीला व पाच वर्षाच्या सोहमला डे केअर मधून आणल्यापासून तन्वीचं रडणं थांबत नव्हतं. तेवढ्यात बाबा घरी आला. कार्तिक, बघ रे हिचं काय बिनसलय! मृण्मयी म्हणाली. कार्तिक म्हणाला,”वेळ नाही ग मला आत्ता. पटकन जेवायला वाढ. मला एक कामाचा रिपोर्ट पाठवायचा आहे.”


मृण्मयी म्हणाली, “कार्तिक, मी आत्ताच घरी आलेय. मुलांचं बघू का तुझं बघू? स्वयंपाक झालेला नाही. बाईंनी आजारी आहे असं तासापूर्वी कळवलं. बाहेरून काहीतरी घेऊन ये.” कार्तिक भडकला. ताडताड खोलीत निघून गेला. तेवढ्यात तिच्या बॅासने तिला “अर्जंट” म्हणून पाठवलेली ईमेल तिच्या फोनवर झळकली. आईचा पण मेसेज आला होता, “बोलायचंय तुझ्याशी”


ही रोजचीच कथा होती. कामाच्या डेडलाईन्स, घरकामाच्या बायकांच्या सुट्ट्या, मुलांची आजारपणं, कमी झोप यात ती पिचून गेली होती. भरपूर पैसा घरी येत होता पण घराला घरपण नव्हतं. तन्वी अनेकदा विचारायची, “आई आपण आज घरी राहूया? आपण चित्र काढूया?” ती म्हणायची, “राणी, आज तू शाळेत जा. आपण रविवारी नक्की चित्र काढू. सोहमला लेगोचं ॲनिमल फार्म बनवायचं होतं. रविवारी करू म्हणत तो रविवार संपून सोमवार उजाडत असे आणि परत पुढच्या रविवारची आश्वासनं दिली जात.


काम सोडून द्यावेसे वाटायचे पण हे मोठ्ठालं घर दोन नोकऱ्यांशिवाय कसं उभं राहिल? खर्च कसे भागतील? तिची एकही मैत्रीण आता हाऊस वाईफ नव्हती. चालतच नाही नोकरी शिवाय हल्ली! मुली शिकायला लागल्या व भरपूर पैसा मिळवू लागल्या पण घर ही संस्था पार बदलून गेली.


मृण्मयीने रविवारी ॲाफिसला दोन दिवसाची सुट्टी टाकली. सोमवारी सकाळी तिनं कांदेपोहे केले. दही, लिंबाचं लोणचं घेऊन शांतपणे पोहे खाल्ले. ती फिरायला बाहेर पडली. आज काही न ठरवता जे मनात येईल ते करायचं होतं. मिनिट आणि सेकंदाचा हिशोब ठेवायचा नव्हता. टेक्स्ट, ई-मेल कडे बघायचे नव्हते. कॅाल्स घ्यायचे नव्हते. 


कमी गर्दीच्या आतल्या रस्त्यावर ती चालायला गेली. वसंत ऋतुमुळे झाडांना पालवी फुटत होती. कोवळ्या पानाचा मोहक पोपटी रंग बघत ती शांत उभी होती. आकाशात निळे, सोनेरी, केशरी रंग चमकत होते. पक्षी उडत होते. काळ काहीवेळ थांबला आहे असं तिला वाटलं.


ती चालत पुढच्या गल्लीत गेली. अगबाई! डोंबाऱ्याचा खेळ का? खेळ सुरू झाला होता. जमिनीपासून सात आठ फुटांवर बांधलेली जाड दोरी, हातात बांबूची जाड काठी, डोक्यावर पितळी कलश घेतलेली ती आठ वर्षाची मुलगी जपून पाऊल टाकत होती. या जीवाला इतक्या लहान वयात तारेवरची कसरत करावी लागते?


ती मुलगी तोल सांभाळत फक्त पुढचं पाऊल कसं टाकायचं एवढाच विचार करत होती. दोराच्या दुसऱ्या टोकाला जाणं एवढच ध्येय होतं. बाकी काही नाही. मल्टीटास्किंग नाही. एक काम एका वेळी. दोर हलत होता पण पाय स्थिर होते कारण मन स्थिर होतं. श्वासाची गती लयबध्द होती कारण मन स्थिर होतं. ती मुलगी दोरीच्या दुसऱ्या टोकाशी पोचून आता खाली उतरली होती. मृण्मयीने तिच्या आईच्या पदरात पाचशे रुपयाची नोट टाकली.


समोर खानावळ होती. डोंबाऱ्याच्या कुटुंबाला तिथे जेवण करण्यासाठी तिने पैसे दिले. "आज पुढचे खेळ करू नका. व्यवस्थित जेवा आणि या मुलीला आज जे करायचं ते करू द्या" असं सांगून तिनं त्यांची नावं, माहिती विचारली. जेऊन तृप्त झालेले त्यांचे चेहरे बघून तिचं पोट भरलं होतं.


आता तिला काहीतरी उमगलं होतं. छप्पन गोष्टी बॅलन्स करताना आपला तोल ढळला आहे म्हणून आपण चिडचिड करतो. जीवनातील तारेवरची कसरत करताना ना पाऊल धड पडतंय ना श्वास सुखाने घेतला जातोय हे समजत होतं. ती घरी आली. तिनं कंपनीला ईमेल पाठवली. “मला आठवड्यात तीन दिवस काम करायचे आहे. उरलेले चार दिवस मला माझ्यासाठी हवे आहेत. मी एकाच वेळी कामावर मॅनेजर, घरी आई, पत्नी, सासरी सून, माहेरी मुलगी या सर्व भूमिका करू शकत नाही. या मल्टिटास्किंग मधे मी होरपळून गेले आहे. हे तुम्हाला मान्य नसेल तर मी नोकरी करू शकणार नाही. कृपा करून समजून घ्यावे.”परत विचार करून सेंड वर क्लिक केलं.


तिने मुलांच्या आवडीचा आंब्याचा शिरा बनवला. तन्वी बरोबर चित्र काढायची तयारी केली. सोहमचा ॲनिमल फार्म लेगो सेट बाहेर काढला. कार्तिकच्या आवडीची एग करी व पुलाव बनवला. आईला फोन केला. आणि मुलांना वेळेच्या आधी दोन तास आणायला पोचली. आई लवकर आलेली बघून मुलांचे चेहरे उजळले होते. ते बघून ती भरून पावली.


डोंबाऱ्याच्या मुलीला शाळेत घालण्यासाठी तिने तिच्या प्रिन्सिपॅाल मैत्रीणीला फोन केला. निदान आज पासून ती डोंबाऱ्याच्या मुलीची व स्व:तची तारेवरची कसरत थांबवणार होती. काम, घर, गाडी, फोन, फर्निचर या  मृगजळाच्या मागे धावताना आपल्या जवळ काय आहे याचा विसर पडला होता.


तन्वी मजेत चित्र काढत होती. सोहम लेगो घेऊन ॲनिमल फार्म बनवण्यात गुंग झाला होता. कार्तिक हाताची बोटं चाटून एग करी आणि पुलाव खात होता. मुलांशी गप्पा मारत होता.

विमानातलं केबिन प्रेशर बदललं तर प्रथम मोठ्यांनी स्वत:ला ॲाक्सिजन मास्क लावायचा असतो अन् नंतर आपल्या मुलांना लावायचा असतो. आई बाबाच श्वास घेऊ शकत नसतील तर ते मुलांना काय मदत करणार?


आज तिनं स्वत:ला ॲाक्सिजन मास्क लावला होता. आज तिला सुखाने श्वास घेता येत होता. शांत, लयबध्द, दीर्घ! त्यामुळे पुढचं पाऊल स्थिर राहणार होतं. मन शांत होऊ लागलं होतं. आता बाकीचांची काळजी घेणं तसं सोपं होतं.


आज ती जगायला शिकली होती.


©®ज्योती रानडे


No comments:

Post a Comment