*भेट* (बक्षीस)
एका उद्योगपतीचा मुलगा कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करत होता. जेंव्हा त्याचे वडील त्याला परीक्षेविषयी विचारत असत,तेंव्हा तो उत्तर देताना वडिलांना म्हणत असे की, "पिताजी असं होऊ शकतं, की मी कॉलेजमध्ये प्रथम येईन, जर मी प्रथम आलो तर तुम्ही मला माझ्या आवडीची, ती महाग कार भेट म्हणून द्याल का?"
वडील आनंदाने म्हणाले, "का नाही, अवश्य आणून देईन बेटा." हे त्यांच्यासाठी सहज शक्य होतं. कारण त्यांना पैशाची काहीच कमतरता नव्हती.
हे ऐकल्यानंतर मुलगा दुप्पट उत्साहाने अभ्यासाला लागला. रोज कॉलेजमध्ये येता- जाता, तो शोरूम मध्ये ठेवलेल्या कारकडे निरखून बघत असे आणि मनातल्या मनात कल्पना करत असे की तो आपली आवडती कार चालवत आहे.
दिवस सरले आणि परीक्षा संपली. रिझल्ट आला, तो कॉलेजमध्ये प्रथम आला होता. त्याने कॉलेजमधूनच वडिलांना फोन करून सांगितलं की, " पिताश्री, माझं बक्षीस तयार ठेवा. मी घरी येत आहे."
घरी येता येता, तो मनातल्या मनात घराच्या अंगणात गाडी उभी असल्याचं स्वप्न रंगवत होता. ज्यावेळी तो घरी पोहोचला, त्याला तिथे कोणतीही कार दिसली नाही. तो नाराज मनानेच वडिलांच्या खोलीमध्ये गेला.
त्याला बघताच वडिलांनी त्याला मिठी मारून त्याच अभिनंदन केलं आणि त्याच्या हातात कागदामध्ये गुंडाळलेली एक वस्तू दिली आणि म्हणाले, "हे घे, तुझं बक्षीस."
मुलाने नाराजीनेच,ती भेटवस्तू आपल्या हातामध्ये घेतली आणि आपल्या खोलीमध्ये गेला. मनातल्या मनात कार न मिळाल्यामुळे,तो क्रोधाच्या अग्नीमध्ये जळू लागला. नाराज मनाने त्याने वडिलांनी दिलेल्या भेटवस्तूचा कागद उघडून बघितला,तर त्यामध्ये सोनेरी कव्हर मध्ये त्याला ' रामायण' दिसलं. ते पाहून त्याला आपल्या वडिलांचा खूप राग आला.
रागाने त्याच्या बुद्धीला भ्रमित केलं. त्याने एक चिठ्ठी आपल्या वडिलांच्या नावे लिहिली की, "पिताजी, तुम्हीं मला कार भेट न देता, हे रामायण दिलत. तुम्हीं वचन देऊनही माझ्याबरोबर असं का केलंत, मला माहित नाही... म्हणून मी हे घर सोडून जात आहे आणि तोपर्यंत परत येणार नाही जोपर्यंत मी खूप पैसा कमावणार नाही." आणि ती चिट्ठी, रामायण बरोबर तिथेच टेबलावर ठेवून,तो घर सोडून निघून गेला.
काळ सरत होता...
मुलगा हुशार होता, सद्गुणी होता. लवकरच तो श्रीमंत बनला. कधी- कधी त्याला आपल्या वडिलांची आठवण येत असे, परंतु त्याच्या वडिलांकडून त्याला भेट न मिळाल्यामुळे असलेला राग, डोकं वर काढत असे.तो विचार करत असे,की आई गेल्यानंतर माझ्याशिवाय त्यांना कोण होतं. इतका पैसा असूनही माझी छोटीशी इच्छा देखील माझ्या वडिलांनी पूर्ण केली नाही. हा विचार करून तो वडिलांना भेटण्यासाठी कचरत असे.
एक दिवस त्याला आपल्या वडिलांची खूप आठवण येऊ लागली. त्याने मनातल्या मनात विचार केला 'इतक्या छोटया गोष्टीसाठी मी आपल्या वडिलांवर नाराज झालो. हे चांगलं झालं नाही.' हा विचार करून त्याने आपल्या वडिलांना फोन लावला. खूप दिवसानंतर,तो आपल्या वडिलांशी बोलणार असल्या कारणाने, धडधडत्या अंतकरणाने रिसीवर हातात घेऊन उभा राहिला.
घरातील नोकराने फोन उचलला आणि सांगितले की," मालकांचा दहा दिवसां पूर्वीच स्वर्गवास झाला आहे.ते शेवटपर्यंत तुमची आठवण काढत होते आणि रडत- रडत निधन पावले. जाता जाता म्हणाले, की माझ्या मुलाचा फोन आला तर त्याला सांगा, की येऊन आपला व्यवसाय सांभाळ. तुमचा काहीही पत्ता नसल्यामुळे, आम्ही तुम्हांला कळवू शकलो नाही."
हे ऐकल्यानंतर मुलाला खूप मोठा धक्का बसला आणि जड अंतःकरणाने तो वडिलांच्या घरी जायला निघाला.
घरी पोचल्यावर वडिलांच्या खोलीमध्ये जाऊन त्यांच्या फोटो समोर, रडत- रडत दुःखी मनाने त्याने वडिलांनी दिलेली भेटवस्तू, 'रामायण' उचलून आपल्या कपाळाला लावली आणि ते उघडून पाहिले.
पहिल्या पानावर वडिलांनी लिहिलेलं वाक्य वाचलं ज्यामध्ये लिहिलं होतं, "माझ्या लाडक्या मुला, तुझी काळानुसार खूप भरभराट होऊ दे...आणि त्याचबरोबर मी तुला चांगले संस्कार ही देऊ इच्छितो.... हा विचार करून हे ' रामायण ' देत आहे. “
हे वाचत असतानाच, त्या रामायणा मधून एक लिफाफा घसरून खाली पडला, ज्यामध्ये त्याच्या आवडत्या गाडीची किल्ली आणि रोख रकमेचे बिल ठेवलेले होते.
हे बघून त्याला इतकं दुःख आणि आत्मग्लानी झाली, की तो स्वतःला सांभाळू शकला नाही, आणि जमिनीवर पडून धायमोकलून रडू लागला.
आपण ही आपले आवडते बक्षीस,आपल्याला आवडत्या पॅकिंग मध्ये न मिळाल्यामुळे, अनवधानाने त्याला हरवून बसतो.आपण आपल्या आई-वडिलांनी, आपल्याला प्रेमाने दिलेल्या अशा अगणित भेट वस्तूंचे मोजमापच करू शकत नाही किंवा त्याला समजूच शकत नाही.
*ईश्वर देखील आपल्याला प्रत्येक क्षणी कितीतरी भेटवस्तू देत असतो.परंतु आपण आपल्या नादानपणामुळे,त्या आवडत्या पॅकिंग मध्ये न मिळाल्याने, त्यांना हरवून बसतो.*
*आपलं आयुष्य देखील एक भेटच आहे, सर्वात मोठी भेट!*
*एक असंतुलित मन,हे आपली अंतर्दृष्टी आणि आपली दिशा हरवून बसते.”*.
No comments:
Post a Comment