TechRepublic Blogs

Thursday, December 26, 2024

ठिकाण

 गोंदवल्याहून फलटणकडे येणाऱ्या मार्गावर झीरपवाडी नावाचे छोटे गाव लागते. तिथून एक फाटा आत वळतो. तो थेट नेतो आपल्याला गिरवी नावाच्या छोट्याशा गावाकडे.

दाट झाडीच्या कमानीतून जाणारी ती वाटच इतकी लुभावनी आहे, की ती पोहोचते ती जागा किती सुंदर असेल याची झलक जणू दाखवते.

१७-१८ कि.मी. अंतर आत गेलं की गिरवी गाव लागते. या गावातलं देशपांडेपण असलेल्या बाबुराव देशपांडे यांनी ५०० वर्षांपूर्वी बांधलेलं गोपाळकृष्णाचं मंदिर बघण्यासाठी खास वाट वाकडी करून या गावी आम्ही गेलो होतो. आहेच तसं हे मंदिर. गाव संपल्यावर शांत निवांत हिरव्यागार वातावरणात विसावलेलं एका जुन्या वाड्यातलं हे मंदिर आहे.

आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होतं. आताचे देशपांडे वंशज पुण्यात आणि फलटणला असतात. मंदिर असलेला जुना वाडा आणि त्या परिसराची देखभाल एका कुटुंबाकडे दिलेली आहे. पुजारी सकाळी गावातून येऊन पूजा करून गेले होते. त्यांच्याकडे कुलुपाची किल्ली असल्याचे कळले. 

आमची मंदिर आणि गोपालकृष्णाच्या दर्शनाची तीव्र इच्छा बघून एक मुलगा सायकलवरून गावात गेला. बऱ्याच वेळाने तरुण पुजारी बाबा आले. साधा सरळ भला मानुष होता. सगळे मंदिर आतून बाहेरून दाखवले. मूर्तीची कथा ऐकवली. गाभाऱ्यात जाऊन जवळून मूर्तीचे निरीक्षण करू दिले. फोटो काढू दिले.

मूर्तीची कथा मूर्तीसारखीच आगळीवेगळी आहे.

५०० वर्षांपूर्वी बाबुराव देशपांडे या सात्विक गृहस्थांना दृष्टांत झाला कि त्यांच्या शेतात शाळीग्राम आहे. त्यांनी ठराविक जागेवर शोध घेतल्यावर मोठी काळी शिळा मिळाली. या शिळेची, त्यांच्या आराध्याची, गोपाळकृष्णाची मूर्ती घडवावी असे त्यांच्या मनाने घेतले. अनेक कारागिरांना त्यांनी बोलावले. पण त्यांच्या मनात असलेली मूर्ती बनवण्यास कारागिरांनी असमर्थता व्यक्त केली.

निराश बाबूरावांनी भगवंतावर हवाला सोडला. आणि एके दिवशी सकाळी त्यांच्याकडे दोन कलाकार आले. बाबुरावांना हवी तशी अखंड एका शिळेतली मूर्ती घडवून देण्याचे त्यांनी कबुल केले.

पण बाबुराव त्यांच्याकडे हताश होऊनच बघत होते. कशी घडवणार हे दोघे मूर्ती? एक आंधळा तर दुसरा थोटा.

पण दोघांनी त्यांना मूर्ती घडवण्याचे आश्वासन दिले. एका बंद खोलीत त्यांचे काम चालू झाले. जेवणखाण त्यांना पुरवले जात होते. पण मूर्ती मात्र कशी घडतेय ते बघता आलं नाही कोणाला.

काही काळानंतर त्यांनी खोलीचे दार उघडून बाबुरावांना आत बोलावून मूर्ती दाखवली. अप्रतिम.. अप्रतिम बनली होती मुर्ती. बाबुरावांच्या कल्पनेतल्यापेक्षाही खूपच सुंदर. हातात बासरी घेऊन वाजवत असलेला गोपाळकृष्ण, त्याच्या पायाशी बसून मान उंचावून ती बासरी ऐकण्यात तल्लीन झालेल्या दोन गायी, त्यांच्या चेहऱ्यावरची आर्तता, गोपाळकृष्णाच्या अंगाखांद्यावरचे दागिने.. या दागिन्यांचे डिझाईन थेट वृन्दावनातल्या दागिन्यांसारखेच होते. घाट तिकडचा होता. 

वर कडी म्हणजे या मूर्तीत हरि आणि हराचे ऐक्य दाखवले होते. गोपाळकृष्ण उभा आहे त्याखाली शिवाची मोठी पिंडी आहे. 

मूर्तीखाली सही केल्यासारखे त्या कारागिरांनी आपले चित्र कोरले आहे. एक आंधळा आणि एक थोटा.. आणि त्यांच्या बरोबर आहेत श्रीविष्णूचे भालदार चोपदार...जय,विजय. 

इतकी सुरेख मूर्त बघून बाबुराव भारावले. कारागिरांचा उचित सत्कार करण्यासाठी त्यांनी मेजवानी आयोजित केली. जेवणापूर्वी स्नान करून येतो म्हणत दोघे वाड्या मागच्या शेतातल्या विहिरीवर गेले... गेले ते गेलेच. परत काही आले नाहीत. आज त्या वावीवर त्या दोघांची समाधी त्यांची आठवण म्हणून बांधली आहे.

काही काळाने बाबुरावांनीही देह ठेवला. त्यांची समाधी मंदिराखालच्या भुयारात आहे. पुजारी बाबांनी आम्हाला त्या ठिकाणीही नेले. पलीकडेच देशपांडे कुलाच्या मूळपुरुषाची समाधी आहे. समाधी समोर गणपतीचे छोटे मंदिर आहे.

जुना वाडा, त्या वरच्या महिरपी, कुठे कुठे उगवलेली झुडुपे, गणपतीची त्या समाधी समोरची प्राचीन मूर्ती, सुं सुं आवाज करत घोंघावणारा माळरानावरचा वारा.. असं वाटत होतं वाड्याच्या त्या कोपऱ्यात काळ गोठून गेलाय.

पुण्याच्या श्री. देशपांडे यांना पुजारीबाबांनी फोन लावून दिला. अतिशय अगत्याने ते बोलले. एक दिवस आधी कळवलं असतं तर मी स्वत: आलो असतो आणि माहिती दिली असती असे आवर्जून बोलले. खरी मोठी माणसं. मोठ्या मनाची.

परत येतांना लक्षात आले की फलटण गिरवी असा आतून एक मार्ग आहे आणि ते अंतर खूप कमी आहे.

आवर्जून भेट द्यावी असे ठिकाण नक्की आहे हे.

-मेघा कुलकर्णी संकलन -प्रशांत शिंदे

No comments:

Post a Comment