श्रीराम,
भाव उदकाने करू प्रक्षालन, पतित पावन चरण तुझे||४
भाव या शब्दाचे दोन अर्थ होतात. एक भाव म्हणजे भक्तिभावाने तर दुसरा अर्थ म्हणजे ज्याचा अभाव नाही असा! भाव म्हणजे अस्तित्व, स्थिर झालेली भावना. भाव म्हणजे प्रेम, आसक्ती. तसेच भाव म्हणजे ईश्वर व ब्रह्मरुप श्रीहरीच्या अस्तित्वाविषयी अटळ श्रद्धा. जे असत् असते त्याला कधीही भाव नसतो. आणि जे सत् असते त्याचा भाव कधीही जात नाही किंवा त्याचे अस्तित्व कधीही पुसले जात नाही. शरीरामध्ये आत्मा सत् आहे आणि शरीर असत् अनात्म आहे. सत् व असत् ह्यांचे बेमालूम मिश्रण झालेले हे शरीर आहे. थोडक्यात अचेतन जड शरीर आत्म्याने सक्रीय केले की मग ते काम करते आणि चेतन असल्यासारखा भास होतो.
दिसणारे नामरुपात्मक शरीर सगुण आहे, तर जीव चैतन्य आत्मा निर्गुण निराकार आहे. भक्तिभावाने मानसपूजा करत असताना विवेकाची दृष्टी जागृत ठेवून पूजा करणे अपेक्षित आहे. या नरदेहातून सगुण मूर्तीची पूजा करणे,. म्हणजे कोण कोणाची पूजा करत आहे? हा विचार जागरूक ठेवणे म्हणजे विवेक.म्हणजे जड अचेतन शरीराच्या आत व्यापून असलेल्या जीवात्म्याने चौरंगावर विराजमान असलेल्या सगुण मूर्तीची पूजा करत मूर्तीचे अधिष्ठान असलेल्या निर्गुण निराकार ब्रह्मतत्वाची उपासना करायची आहे. ते करून त्या शुद्ध तत्त्वात आपले अस्तित्व विसर्जित करण्यासाठी ही पूजा आहे, असा भाव ठेवून, आत्मसमर्पण करण्यासाठीची ही पूर्वतयारी आहे, असे समजून, उमजून श्रद्धेने भक्तिभावाने मानसपूजा करायची असते..
||श्रीराम ||
No comments:
Post a Comment