*श्रीराम समर्थ*
*नाम हे कर्म नव्हे.*
[पू बाबा बेलसरे यांनी सांगितलेली एक जूनी हकिगत.]
एकदा मी श्रीमहाराजांबरोबर जालन्याला गेलो होतो. तेथे प्रल्हादमहाराज होते. त्यांनी शास्त्रपठण केलेले होते. भागवत छान सांगत. त्यांच्याकडे त्यावेळी वऱ्हाडातले एक शास्त्री आले होते. त्यांनी श्रीमहाराजांना विचारले की आपण नाम घेतो तेही कर्मच नाही का?
परमात्मा तर सर्व कार्यकारणभावाच्या पलीकडे आहे. तो कर्माने कसा प्राप्त होणार? श्रीमहाराजांनी माझ्याकडे बोट करून ते यांना विचारा म्हणून सांगितले. तथापि मी गप्प बसलो. नाम हे कर्म नव्हे हे समजावून सांगण्यासाठी श्रीमहाराजांनी दिलेले उदाहरण अप्रतिम होते. श्रीमहाराज म्हणाले, परमात्मा हा नित्यप्राप्तच आहे तेव्हां त्याची प्राप्ती करून घ्यायला आणखी काही कर्म नकोच.
पण आज आपण त्याला विसरलो आहोत म्हणून त्याचे स्मरण केले की पुरे. तुम्हांला भुक लागते किंवा झोप येते यात कर्म कोणते घडते? ही भूक किंवा झोप जशी तुमच्यातून आपोआप येते तसे नामही आतूनच येते. आज तुम्ही बाहेरून नाम घेता म्हणून ते कर्म आहे. ते आतून येऊ लागले की कर्म रहात नाही. आज आपण बाहेरचे जग आत घेतो आहोत;
त्याऐवजी आत जाता आले पाहिजे. प्रल्हाद महाराज म्हणाले की झऱ्यातून पाणी येते तसे नाम आतून आले पाहिजे. झऱ्यात पाणी असतेच पण त्यावरचे दडपण - प्रतिबंध दूर झाल्याखेरीज पाणी येत नाही. तसेच नित्यप्राप्त आहे ते प्राप्त व्हावे लागते.
*********
संदर्भः अध्यात्म संवाद [भाग-३] पान २३४
*संकलनः श्रीप्रसाद वामन महाजन*
No comments:
Post a Comment