TechRepublic Blogs

Monday, December 9, 2024

शिकवण

 *शिकवण.*


*मी लहान असल्यापासून लक्ष्मीबाई आमच्याकडे स्वयंपाकाला होत्या. त्यांचं वय किती होतं मला आठवत नाही, पण आम्ही त्यांना आजी म्हणायचो. आजींच्या हाताला चव होती. तलम रेशमासारख्या गरम पोळ्या आणि दाणे, लसूण घालून त्यांनी केलेली आंबाडीची भाजी अमृतासारखी लागायची. शिरा, खीर, लाडू, वड्या, चिवडा, मसालेभात, रस्सा वगैरे करण्यात त्यांचा कोणी हात धरत नसे.*


*छोटा आंबाडा आणि नऊवारी लुगडं नेसणाऱ्या आजीना कधी हसताना बघितल्याचे आठवत नाही.  हसणं तर जाऊदेच... पण त्या कायम चिडलेल्या असत.  काही बोलायला गेलं, की अंगावर खेकसल्यासारख्या बोलत. आईशी त्यातल्या त्यात बऱ्या बोलत.*


*आई त्यांना रोज सकाळी काय स्वयंपाक करायचा सांगत असे पण आजीनी कधी नीट हो म्हटल्याचे आठवत नाही.  न बोलता त्या कामाला लागत.  मला त्याच्याशी बोलायची भीतीच वाटत असे.*


*मी थोडी मोठी झाले तेव्हा आजींची एक गोष्ट मला खटकू लागली. आईने दहा पोळ्या करा म्हटलं की आजी १५ पोळ्या करायच्या. १५ लाडू करा म्डटलं की २०-२२ लाडू करायचे आणि जास्तीचे केलेले पदार्थ त्या गुपचुप घेऊन जायच्या. एकदा मी त्यांना पाच पोळ्या त्यांच्या नऊवारी लुगड्याच्या ओच्यात लपवताना बघितलं आणि आईला जाऊन सांगितलं.*


*मला वाटलं, की आईला धक्का बसेल पण आईला यात नवीन काहीच नव्हतं.  ती म्हणाली, “ हो त्या जे करतील त्यातलं थोडं घरी नेतात हे मला माहित आहे."*


*“अग ही चोरी नाही का? तू विचार ना त्यांना! त्यांनी मागितलं तर अन्न तू देशीलच ना? मग चोरी का करायची?” मी तडकून विचारलं.*


*आई म्हणाली,” नको विचारायला. त्यांना फार वाईट वाटेल. ६५ वर्ष वय आहे त्यांचे. आणि माणूस जेव्हा अन्नाची चोरी करतो ना तेव्हा ती त्याची गरज असते.”*


*एरवी राजा हरीश्चंद्र अंगात येणारी माझी आई अशी कशी बोलू शकते हे मला कळेना. मी लहानपणी माझ्या मैत्रीणीकडून दोन गोट्या तिला न सांगता घरी आणल्या होत्या. आईने रात्री दहा वाजता तिच्या लक्षात येताच गाढ झोपलेल्या मला उठवून त्या गोट्या परत देऊन ये म्हणून मैत्रीणीच्या घरी पाठवलं होतं. तिच आई आजींचं चोरी करणं काही न झाल्यासारखी बघत होती.  मला काही उलगडत नव्हतं.*


*मी दहावी पास झाल्यावर काही ठिकाणी पेढे द्यायला गेले होते.  मनात आलं आजींकडे डोकवावं. म्हणून मी त्यांचे घर शोधत तिथे गेले. आजी मला बघून चमकल्या. “ये की ग आत!” म्हणाल्या.  मी पेढे दिले. आमच्या घरातील न सापडणारा गड्डू तिथे टेबलावर ठेवलेला दिसला.*


*आजींच्या चेहऱ्यावरचा राग त्या दिवशी शरमेत बदलला होता.*


*आजीनी लहानसं घर छान ठेवलं होतं.  मला रव्याचा लाडू दिला व माझं कौतुक केलं. नंतर माझ्या नजरेला नजर न देता आजी म्हणाल्या, “तुझ्या आईचे अनंत उपकार आहेत माझ्यावर. माझे लहानपणी खाण्याचे फार हाल झाले. तेव्हापासून अन्न दिसलं की थोडं घरी घेऊन यायची सवय लागली. वाटायचं... घरात काहीच नसेल तर लेकरांना काय खाऊ घालायचं? म्हणून मी तुमच्याकडून काहीतरी जिन्नस घरी घेऊन येऊ लागले. आधीच्या नोकऱ्या केल्या तिथे हा माझा "गुण" त्यांच्या लक्षात येताच त्यांनी मला नोकरीवरून काढून टाकलं. तुझ्या आईने मात्र बघितलं पण मला कधीही एका शब्दानं विचारलं नाही. रात्र रात्र ज्यांनी अन्नाशिवाय तळमळत काढली ना... ते हाल परत नशिबी नकोत असं वाटायचं. पण हातून पाप घडलं हे कबूल करते.*


*त्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी काढून माझ्या गळ्यात घातली. ही माझी भेट तुझ्या दहावीच्या निकालाची. नाही म्हणू नको." "आई तुझी भारी हूशार बघ....  मला त्या मानसोपचार करणाऱ्या तुझ्या बाबांच्या डॅाक्टर मित्राकडे, डॅा. रॅाय कडे तिनं नोकरी लावून दिली. ते डाक्टर आता माझ्यावर उपचार करतात. मला उपचाराची जरूर आहे. ” आजीने डोळे पुसले.*


*मला सोन्याची साखळी घ्यायची नव्हती... पण आजी ऐकेनात. त्या म्हणाल्या,”क्लेप्टोमॅनिया का त्याच्यासारखे कायतरी आहे हे असं म्हणतात. ते डाक्टर पण पैसे घेत नाहीत. कसे फेडू मी तुझ्या आईचे उपकार? कधी एका शब्दाने वहिनी बोलल्या नाहीत मला.”*


*मी घरी आले व आईला साखळी दाखवली. आई म्हणाली, “आण ती इकडे. मी जपून ठेवते. आजींना कशी परत करायची बघेन मी.”*


*मी कौतुकाने आईकडे बघितलं. चोरी करणाऱ्या नोकरमाणसाला काढून टाकणारे बरेच असतात. पण आईने आजींचा संसार उध्वस्त होऊ नये म्हणून त्यांना डॅा. रॅाय कडे त्यांना नोकरी लावून दिली व डॅाक्टरना आजीबद्दल काय करता येईल ते विचारलं. कुठेही वाच्यता न करता! आजी आमच्या घरचं काम झालं की डॉ. रॉय कडे जात असत.*


*आई, तू किती चांगली आहेस ग!  म्हणत मी आईला मिठी मारली. आई माझ्या केसातून हात फिरवत म्हणाली,” तुला त्या दिवशी वाटलं ना की आई कडे डबल स्टँडर्ड कसं… कुणाला आवडतं का चोरी करायला? ती सुध्दा अन्नाची! मी त्यांना सरळ विचारू शकले असते पण मला वाटून गेलं की आधी एकदा डॅा. रॅाय ना विचारावं. बाबांचंही हेच मत होतं.*


*"अपराध्याला काही न बोलता माफी करणं ही पण एका प्रकारची शिक्षा च आहे बघ." मी चमकून आईकडे बघितले.*


*"आजी सतत चिडचिड का करायच्या?  कदाचित आपण जे करतो त्याचा त्यांना राग येत असेल असं मला वाटतय. एखादी सवय अशी असते की आपले चुकतंय माहित असूनही ते बदलता येत नाही.. अगदी दारू पिणाऱ्या माणसासारखे! म्हणून तर त्याला व्यसन म्हणायचं. " आई म्हणाली.*


*“मग आई या चेनचं काय करणार आहेस?” मी कुतूहलाने विचारलं.*


*आईने क्षणभर विचार केला व ती म्हणाली, “ त्यांना त्यांच्या चुकीची भरपाई करण्याची एक संधी तुला चेन देऊन मिळाली. त्याचा त्यांना आनंद  मिळू दे.  डॅाक्टर म्हणाले आहेत की, behavior therapy चा आजींना खूप उपयोग होत आहे.  एकदा त्याची ट्रीटमेंट संपली व ही सवय मोडली की त्याचे कौतुक म्हणून आपण हीच चेन त्यांच्या गळ्यात घालू.”*


*मी आईकडे अभिमानाने बघितलं.  १० वर्षाच्या मला गोट्या परत करण्यासाठी झोपलेली उठवणं जेवढे महत्वाचं होतं, तेवढंच आजींना माफ करणं महत्वाचं होतं.  त्यामुळे चोर हा शिक्का बसून एक व्यक्ती आयुष्यातून उठली नाही.  माफी मध्ये पण शिक्षा असते कारण त्या व्यक्तीला आपल्या चुकीसाठी माणसे ओरडणार ही अपेक्षा असते. ते घडले नाही तर अजूनच अपराधी वाटत असावे हे मला हळूहळू कळू लागलं.*


*मी आईला घट्ट मिठी मारली! “आई ग तू डॅाक्टरांएवढीच उत्तम मानसोपचार तज्ञ आहेस ग!”*


*आईने दिलेले ही शिकवण मला आयुष्यभर उपयोगी पडत आहे. एखाद्या व्यक्तीला नावं ठेवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा आजवरचा प्रवास कसा आहे हे बघायला मी शिकले आहे.  बाहेरून दिसणारे एखादे आयुष्य हिमनगाच्या टोकासारखं असते. आत लपलेले बरच काही आपल्याला सहजी दिसत नाही..*


*Before you judge someone, at least walk a mile in his shoes म्हणतात ते उगीच नाही!*


*©️®️ ज्योती रानडे...*

🌸🌸🌸

No comments:

Post a Comment