TechRepublic Blogs

Wednesday, September 11, 2024

चैत्र

 *लंगडी एकादशी आणि चंदन उटी*



चैत्र हा हिंदू नववर्षाचा पहिला महिना. या वेळी अनेक गावांमध्ये त्या त्या दैवतांची यात्रा भरते. कोल्हापूरला ज्योतिबाची, जेजुरीला खंडोबाची, शिंगणापूरला शंभू महादेवाची. अशा अनेक तीर्थक्षेत्री चैत्र महिन्यात यात्रा असतात. पंढरपूरलाही चार मुख्य वाऱ्यांपैकी एक असणारी चैत्री वारी चैत्र शुद्ध एकादशीला भरते. ही वारी म्हणजे हरिहर ऐक्याची खूण आहे. बहुतांश भाविक प्रथम शिखर शिंगणापूरला जाऊन नंतर पंढरपूरला येतात. या चैत्री वारीची कथा मोठी रंजक आहे. आणि पंढरपूरच्या विठ्ठलाचे मानवीकरण दर्शवणारी आहे. 

       या एकादशीला विठ्ठल लंगडी एकादशी करतो. त्याचे काय झाले की विठ्ठल रूक्मिणी मातेसह शिंगणापूरला शंभू महादेव आणि पार्वतीमातेच्या विवाहाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येतो. एकादशी म्हणून सकाळपासून उपवास केलेला असतो. पण विवाह सोहळ्याच्या धामधुमीत, विवाहास आलेल्या देव, ऋषीगण, इतर पै पाहुण्यांशी बोलताना, गप्पा मारताना आपला उपवास आहे हेच विसरून जातो. आणि दुपारच्या पंगतीत सगळ्यांच्या बरोबर जेवायला बसतो. रूक्मिणी माता त्याला सांगायचा प्रयत्न करते. पण देवाचे लक्षच नसतं.. मग त्याची लंगडी एकादशी होते. आम्ही पण लहानपणी लंगडी एकादशी करत असू.

आजही या प्रसंगाची आठवण म्हणून यादिवशी सकाळी देवाला उपवासाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. आणि दुपारी पुरणपोळीचा नैवेद्य असतो..

देवही माणसासारखा विसरभोळा आहे. माणूस जशी एखादी गोष्ट विसरतो तसा देवही विसरतो. आपल्याप्रमाणे वागतो. विठ्ठल असा मानवी मनोव्यापारानुसार वागतो म्हणून तो अगदी आपला वाटतो. देव आणि मी हे द्वैतच संपते. विठ्ठल भक्तांची 'मी तू पणाची झाली बोळवण' अशी अवस्था असते. त्यामुळे तो आपल्या खूप जवळचा वाटतो. त्याचा देव म्हणून धाक वाटत नाही.

  या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जसं उकडतं तसं देवाला पण उन्हाचा त्रास होतो. म्हणून या दिवसात, मृग नक्षत्र निघेपर्यंत विठ्ठलाला आणि आईसाहेब रूक्मिणी मातेला गारव्या साठी अंगभर चंदनाची उटी लावतात. केशर पन्ह, वाळ्याचे सरबत, कलिंगड, खरबूज अशा थंड पदार्थांचा नैवेद्य दाखवतात.

 मोगऱ्याचे हार घालतात. पूर्वी देवळात बाजीराव पडसाळीत उटी साठी चार पाच माणसं चंदन उगाळत बसलेले असत. तिथून जाताना इतका सुंदर वास येत असे. या दिवसांतले उटी लावलेले विठ्ठल रूक्मिणीचे रूप नयनमनोहर दिसते आणि गाभारा अलौकिक सुगंधाने दरवळत असतो. ज्याचे भाग्य आहे त्याला हा सोहळा अनुभवता येतो. माझं पूर्वसुकृत म्हणून मी हा अलौकिक सुगंध श्वासात भरून घेतला आणि कायमचा मनात साठवला..



मीरा उत्पात-ताशी,



No comments:

Post a Comment