TechRepublic Blogs

Saturday, September 7, 2024

राम

 *|| स्त्रीच्या मनातला राम ||* 


*©️ कांचन दीक्षित* 


*प्रत्येक भारतीय स्त्री आयुष्यात कधी न कधी, मनातल्या मनात, रामाचा अर्थ शोधत असते ..!! मग ती शिकलेली असो वा अशिक्षित ..!! प्रत्येक स्त्रीला एकदा तरी रामाला भेटायचं असतं, आणि प्रश्न विचारायचे असतात ..!!* 


*लहानपणापासून आपण रामायण शिकत असतो .. समजून घेत असतो ..!! मी सुद्धा अनेक प्रश्न विचारत, रामाशी भांडलेले आहे ..!!तुझं सगळं मान्य आहे पण,   सीतेचा वनवास ..?? कां बरं ..?? हा प्रश्न कायम बोचत राहिलेला आहे ..!!* 


*एम.ए ला असताना, 'स्त्री-वादी साहित्य' हा एक विषय होता अभ्यासाचा. सीतेला पुन्हा एकदा, दुसरा वनवास भोगायला पाठवणं, हे आयुष्यभर बोचत राहीलं ..!!* 


*पण अगदी अलिकडे काही वर्षांपूर्वी, अचानक काहीतरी समजलं, आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली ..!! ती माझ्या पुरती आहेत असं वाचणाऱ्यांना वाटलं तरी चालेल ..!! माझं मत सगळ्यांना पटलंच पाहिजे असा माझा आग्रह नाही ..!! मी फक्त माझे विचार शेअर करतेय .. अगदी सहज ..!!* 


*राम मला प्रिय आहे .. एक स्त्री म्हणून ..!! अगदी कृष्णापेक्षाही जास्त ..!! कारण, कृष्ण अनेकींचा आहे ..!! कधी कृष्णानं सांगितलं नाही की तो कोणाचा आहे ते ..!! कदाचित प्रत्येकीनं असं समजून घेतलेलं आहे की, कृष्ण माझा आहे ..!! अगदी राधेपासून ते कुब्जेपर्यंत प्रत्येकीला वाटतं की, कृष्ण माझा आहे ..!! पण सीतेला मात्र शंभर टक्के माहीत आहे की, 'राम माझा आहे' आणि रामासोबत नांव फक्त सीतेचं आहे ..!!* 


*दशरथाला तीन राण्या होत्या आणि त्यामुळे, रामासाठी दुसरा विवाह आणि तो देखील 'त्या काळात' ही अशक्य गोष्ट नव्हती ..!! पण रामानं दुसरं लग्न केलं नाही ..!! अगदी 'परिस्थितीची गरज' म्हणून देखील नाही ..!!* 


*ज्या क्षणी पूजा-विधीसाठी पत्नीची जागा रिकामी होती, तेव्हा सीतेची सोन्याची मूर्ती रामानं ठेवली आणि त्या मूर्ती शेजारी बसून, त्यानं पूजा केली, त्या क्षणी सीता जिंकली ..!! वैभवशाली राणी झाली ..!!* 


*रामाच्या मनात सीता कोण आहे .. काय आहे .. हे त्यानं या कृतीतून ज्या ग्रेसफुली, त्याच्या स्टाईलनं सांगितलंय, ते एका फिल्मी हिरोच्या छाती ठोकून सांगण्यातही नाहीये ..!! मला वाटतं, 'मर्यादा पुरुषोत्तम' रामानं जगाला ओरडून सांगितलेलं ते पहिलं 'I Love You' आहे ..!!*  

 

*राजाची भूमिका निभावताना, त्याग आणि कर्तव्याच्या अनेक परीक्षांना राम सामोरं गेलेला आहे ..!! पडलेली कोडी त्यानं 'मर्यादा पुरुषोत्तम' होऊन दरवेळी सोडवली आहेत ..!! पण हा एक निर्णय, ही एक गोष्ट, त्याच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकलं नाही .‌. ते म्हणजे सीतेवरचं प्रेम आणि नातं ..!!* 


*आजपर्यंत जगात पतिव्रता असणं, एकनिष्ठ असणं, यावर स्त्रियांची अनेक उदाहरणं आहेत, पण 'एकनिष्ठ पुरुष' म्हटलं की फक्त राम आठवतो ..!! 'एक-पत्नी' व्रताचं पालन करणारा तो खरा पती होता. चारित्र्याविषयी एका पुरुषासाठी असा आकाशाएवढा मोठा आदर्श जगात कुठलाही नाही ..!!* 


*जग Men Are Dogs म्हणत, पुरुषांना अतिशय हलक्या पातळीवर नेऊन ठेवत असताना,  आपल्याकडे मात्र राम आहे ..!! भविष्यात माणसाला कधीतरी 'राम-कथा' आकर्षित करेल आणि राम समजून घ्यावासा वाटेल, असा आशावाद बाळगायला हरकत नाही ..!!* 


*या मातीत एक असा पुरुष होऊन गेला, जो संपूर्णपणे फक्त एका स्त्रीचा होता ..!! सीतेचा होता ..!! 'अशी सीता' होऊन वनवासात जाण्यात देखील प्रतिष्ठा आहे, कारण वनवासात सुद्धा, सीतेला 'राम माझा असल्याची' खात्री आहे .. विश्वास आहे .. जे कमाल आहे ..!!* 


*'बाजीराव-मस्तानी' मध्ये काशीबाई तिची सर्वांत मोठी वेदना (दर्द) सांगते ..!! ती म्हणते, की,"तुमने तो मुझसे मेरा गुरुरही छिन लिया" ..!!* 


*एका स्त्रीचा हा जो 'गुरुर' असतो ना की, 'माझा' नवरा 'माझा' आहे ..!! ते स्त्रीचं बळ असतं, शक्ती असतं ..!!* 


*पत्नीचं तेज, तिचा अहंकार हा तिचा नवरा असतो ..!! तो नसेल तर जगणं, हा एक वनवासच असतो ..!! 'एकनिष्ठ पती' या एका बक्षिसाला मिरवत, ती गौरवानं सगळ्या जगाशी लढू शकते ..!! अनेक वनवास हसत-हसत सहन करू शकते पण ज्या क्षणी तिचा हा गुरुर तुटतो, त्या क्षणी ती संपते ..!! सगळं असूनही हारते ..!! तळाशी बुडते ..!! म्हणूनच, मला सीता भाग्यवान वाटते .. अगदी खूप खूप भाग्यवान वाटते ..!! तिच्या सुखाची कल्पनाही कुणाला करता येणार नाही ..!!* 


*ती राणी आहे आणि रामाच्या हृदयात तिचं सिंहासन आहे ..!! मानव-जन्मात भोगावे लागतात ते भोग तिनं भोगले पण, तिच्या वाट्याला जो राम आलेला आहे, तो हेवा वाटावा असाच आहे ..!!* 


*माणूसपणाच्या पलीकडे पोहोचलेला हा देव, आपला आदर्श आहे आणि पुढच्या अनेक पिढ्यांना त्याचे संस्कार मिळणार आहेत, असा मला विश्वास वाटतो ..!!* 


*ज्या संस्कृतीत 'राम-कथा' आहे आणि पुरुषांसाठी रामाचा आदर्श आहे त्या भारत भूमीत, स्त्री म्हणून जन्म घेण्याचा मला अभिमान आहे आणि या जगात पुन्हा स्त्री म्हणून जन्माला यायचं असेल तर, मला भारतातच जन्म मिळावा असं मी मागेन ..!!*

No comments:

Post a Comment