*आजी - आजोबा* 🟩
*आज्जी*
*"मी या म्हाताऱ्या बाईबरोबर शाळेत जाणार नाही."
आपल्या दहा वर्षांच्या मुलाचे, सार्थकचे शब्द ऐकून संध्या स्तब्ध झाली. तो काय म्हणतोय? तो आपल्या आजीला म्हातारी का म्हणतोय? असा उद्धटपणा तो कुठून शिकला असेल?
संध्या विचारात पडली…तेवढ्यात सार्थकचे काका बाजूच्या खोलीतून बाहेर आले आणि विचारले, "काय झालं बेटा?"
तेव्हा सार्थक म्हणाला, "काहीही झाले तरी मी या म्हातारीसोबत शाळेत जाणार नाही. ती मला नेहमी शिव्या घालते, माझे मित्र माझी चेष्टा करतात."
घरातल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं…संध्याचा नवरा, दोन भाऊ आणि वहिनी, नणंद, सासरे आणि नोकर देखील!
सार्थकला शाळेत सोडण्याची जबाबदारी आजीची होती. तिचा पाय दुखत असे, पण तिने कधीही तक्रार केली नाही कारण तिच्या नातवावर तिचे खूप प्रेम होते. तो कुटुंबातील पहिला नातु होता.
पण अचानक सार्थकच्या तोंडून त्यांच्यासाठी असे शब्द ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्याला खूप समजावले होते पण तो आपल्या म्हणण्यावर ठाम राहिला. सार्थकच्या वडिलांनी त्याला थप्पडही मारली. अखेर सगळ्यांनी ठरवलं की उद्यापासून आजी त्याला शाळेत सोडायला जाणार नाही. दुसऱ्या दिवसापासून दुसरं कोणीतरी त्याला शाळेत घेऊन जाऊ लागलं. पण संध्याला प्रश्न पडला की त्याने हे का केले?
संध्यालाही सार्थकचा खूप राग आला होता.
संध्याकाळ झाली होती. संध्याने दूध गरम केले आणि मुलाला देण्यासाठी त्याला शोधू लागली. टेरेसवर पोहोचल्यावर तिने मुलाला आजीशी बोलताना ऐकले तशी ती गुपचूप त्यांचे बोलणे ऐकू लागली.
आजीच्या मांडीवर डोकं ठेवून सार्थक सांगत होता…
"मला माहित आहे आजी, तू माझ्यावर रागावली आहेस, पण मी तरी काय करू? एवढ्या कडक उन्हातही ते तुला मला न्यायला आणायला पाठवतात. तुझा पायही दुखत आहे. मी आईला सांगितल्यावर ती म्हणाली की आजी स्वतःहून जाते येते. आजीला जे पाहिजे ते ती करते. मी खोटं बोललो... मी खूप चूक केली, पण तुला या त्रासातून वाचवण्यासाठी मला दुसरं काहीच सुचलं नाही गं!
तू आईला मला माफ करायला सांग."
सार्थक बोलत राहिला आणि संध्याचे पाय आणि मन सुन्न झाले. आपल्या मुलाच्या बोलण्याचा अर्थ तिला उमगला होता, घरातील कोणालाच न समजलेली गोष्ट त्या दहा वर्षांच्या मुलाने करून दाखवली होती.
संध्याने धावत जाऊन सार्थकला मिठी मारली आणि म्हणाली... "नाही बेटा. तू काही चुकीचे केले नाहीस. घरातल्या सर्व सुशिक्षित मूर्खांना समजावण्याचा हा योग्य मार्ग होता.
शाब्बास बेटा. शाब्बास."
सारांश :
घरातील वडीलधारी मंडळी म्हातारपणी झाडासारखी असतात, ज्याला फळ येत नाही पण सावली मिळते. आपली नवीन पिढी आपल्याला पाहून शिकते, म्हणून आपण त्यांचा आदर केला पाहिजे.
_संकलन_
*_प्रा. माधव सावळे_*
No comments:
Post a Comment