*🌹 श्रीराम समर्थ 🙏🌹*
*🌷कलकत्त्याचा हरिहाट 🌷*
* *श्रीमहाराज काशीहून अशा रीतीनें निघाले ते कुठेही न थांबता प्रयागला आले. तेथे कांहीं बैरागी लोक महंताच्या शोधांत फिरत होते. वय वीसच्या आसपास, दाढी व जटा वाढलेल्या, अंगावर ब्रह्मचर्याचें आणि अध्यात्माचें तेज फांकलेले, अशी महाराजांची मूर्ति पाहिल्यावर त्यांना त्या बैरागी लोकांनी आपला महंत करून टाकलें, प्रयागहून ही सर्व मंडळी मथुरा-वृंदावनाकडे गेली. काशी सोडून एक वर्ष होऊन गेलें होतें. तेथे असतांना ज्या बंगाली जमीनदाराला आशीर्वाद दिला होता त्याला मुलगा झाला असल्यानें तो सारखी श्रीमहाराजांची चौकशी करीत होता. त्याची माणसें त्यांच्या शोधार्थ क्षेत्रांमध्ये फिरत होतीं. त्यापैकी एक मनुष्य श्रीमहाराजांना मथुरेमध्ये भेटला आणि त्यानें आपल्या मालकाचें आमंत्रण त्यांच्या कानांवर घातलें. त्या आमंत्रणाला अनुरसरून आपल्या सर्व परिवारासह श्रीमहाराज कलकत्त्याला येऊन दाखल झाले. ते महंत म्हणून वावरत असल्यानें त्यांचा थाट आधींच एखाद्या राजासारखा होता, आणि त्यामध्ये त्या जमीनदाराच्या उपचारांची भर पडल्यावर तर श्रीमहाराज एखाद्या राजेंद्रासारखे शोभून दिसत. जमीनदारानें आपला छोटा मुलगा त्यांच्या पायावर घालून त्यांचा आशीर्वाद घेतला. तो श्रीमहाराजांना म्हणाला, "आपली कांहींतरी सेवा करावी अशी माझी फार इच्छा आहे. मी काय करूं तें मला सांगा." यावर श्रीमहाराज बोलले, "अरे, आम्ही बैरागी लोक ! आम्हांला खरोखर कशाचीहि जरुरी नाहीं. तूं आणि तुझी मंडळी आनंदांत राहा पण भगवंताला विसरू नका म्हणजे मला सर्व पोंचलें." हें सांगून जेव्हां तो आणि त्याची आई ऐकेनात, तेव्हां श्रीमहाराजांनी त्यांना हरिहाट करण्याची आज्ञा केली. हरिहाट म्हणजे भगवंताचा बाजार हा एक आठवडाभर चालतो. भगवंताच्या प्राप्तीचीं जीं जीं साधनें आहेत तीं तीं सर्व एकदम सुरू करून सात दिवस अखंड चालवायची. तसेंच एक अनछन्न सुरू करून सात दिवस तेथे मुक्तद्वार ठेवायचें असतें. विद्वान् व कलावंत मंडळींचा योग्य परामर्श घेतला जातो. हरिहाट करणें हे फार खर्चाचें, कष्टाचें आणि जबाबदारीचें काम असतें. परंतु श्रीमहाराजांनीं शब्द टाकल्याबरोबर त्या मायलेकांनीं एकदम होकार दिला. कलकत्त्यापासून दोन मैलांवर एक मोठा मांडव उभारला. देशांतल्या, विद्वानांना, शास्त्रीपंडितांना, आणि कलावंतांना आमंत्रणे गेली. पुष्कळ धान्य, कपडा आणि चांदीची भांडीं खरेदी केली. तयारीला पंधरा दिवस लागले. ज्या दिवशीं हरिहाट सुरू झाला त्या दिवशीं यजमानानें श्रीमहाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढली. मंडपामध्यें सुशोभित असें एक उच्च सिंहासन ठेवलें होतें, त्यावर श्रीमहाराज जाऊन बसल्यावर वेदमंत्रांनीं त्या अपूर्व समारंभाला सुरुवात झाली. मांडवाच्या निरनिराळ्या भागांमध्यें वेदपारायण, यज्ञ, जप, भजन, कीर्तन, नामस्मरण, पुराणवाचन, प्रवचन, योगासनें, पंचाग्निसाधन, शास्त्राध्ययन, ब्रह्मकर्म, अनुष्ठान, देवतार्चन, सत्संग, गुरुसेवा, मौनसेवन, वाममार्ग, तंत्रक्रिया, इत्यादि साधनें सुरू झाली. बाहेर अन्नछत्र होतें, त्यामध्यें चोवीस तास जेवण तयार ठेवून जो येईल त्याला मुक्तहस्तानें वाढणें चालू झालें. रोज नवीन पकान्न होई, आणि तें सर्वांना पोटभर मिळे. सात दिवसांमध्यें अक्षरशः हजारों बैरागी, प्रवासी, अतिथि, आंधळे, पांगळे, भिकारी, श्रीमंत, गरीब, पुरुष, स्त्रिया, आणि मुलें तेथून जेवून गेले. कलकत्त्यामधले बहुतेक सर्व लोक हा समारंभ पाहून गेले. श्रीमहाराज रोज सकाळ-संध्याकाळ मांडवामध्यें येऊन सर्व मंडळींची सोय झाली किंवा नाहीं याची स्वतः चौकशी करीत. विशेषतः अन्नछत्र आणि नामस्मरण बरोबर चाललें आहे कीं नाहीं हें मुद्दाम पहात असत. आठव्या दिवशीं यजमानानें श्रीमहाराजांची महापूजा केली. त्यांना महावस्त्र अर्पण करून एक हजार रुपयांनीं भरलेलें चांदीचें ताट दक्षिणा म्हणून त्यानें पुढें ठेवलें. तें वत्र श्रीमहाराजांनीं त्याच्या आईला प्रसाद म्हणून दिलें, आणि ते रुपये काशीच्या विद्वान् पंडितांना वांटून दिले. एकंदर समारंभाला पंचवीस हजार रुपये (त्या काळीं) खर्च लागला. "असा हरिहाट गेल्या पन्नास वर्षांत बंगालमध्यें आम्ही पाहिला नाहीं," असे तेथील वृद्ध लोक म्हणत असत.*
*चरित्र आणि वाड्मय*
No comments:
Post a Comment