TechRepublic Blogs

Tuesday, September 3, 2024

अवंती

 ❣️ *शिकवण* ❣️


 *अवंतीने गाडी रस्त्याच्या कडेला लावली अन खाली उतरत राघवचा म्हणजे तिच्या नवऱ्याचा कॉल रिसिव्ह केला, तिला क्षणभरही हॅलो वगैरे म्हणण्याचा अवसर न देता प्रचंड उत्साहाने अन आनंदाने म्हणाला तो,* 


 *" कॉंग्रॅच्युलेशन्स मॅडम, यु रॉक द वर्ड टुडे, आय ऍम व्हेरी हॅपी फॉर यु, बघ तुझ्या डेडिकेशनचं चीज झालं, मी म्हणालो होतो ना तुला. शीट यार, आय मिस्ड द मोमेंट...वाटतंय आत्ता यावं अन तुला कडकडून मिठी मारावी.."* 


" हो हो हो, किती बोलतोएस अरे, मला काही बोलू देशील? अन कोणी सांगितलं तुला, त्या प्रणवने ना, बघतेच त्याला उद्या थांब..मी सांगणार होते ना तुला.." काहीश्या लटक्या स्वरात अवंती म्हणाली.


" ए बाई, नको हं, घाबरतो बिचारा तुला, पण मस्त तयार झालाय हं तुझ्या तालमीत..म्हणत होता मॅम डिझर्व इट, हे त्यांना फार आधीच मिळायला हवं होतं...ए सांग ना, कसं वाटलं अवॉर्ड घेताना? अन काय बोललीस तू मनोगत व्यक्त करताना?"


" तुझा प्रश्नांचा भडीमार संपला तर सांगेन ना मी मला कसं वाटलं ते..बाकी सगळं जाऊ दे, ते सांगते शांततेत फोन केल्यावर. पण तू हवा होतास मला...मला खूप एकटं एकटं वाटलं, माझ्या एवढ्या मोठ्या अचिव्हमेंटला साक्षीदार असं माझ्या जवळचं कोणीच नव्हतं, म्हणजे स्पेशली तू. खूप व्हॅकन्ट वाटत होतं मला. आय रियली मिस्ड यु अ लॉट.."


 *" अगं मग आपल्या ठकूबाईला का नाही नेलंस? तेवढंच बरं वाटलं असतं ना तुला, ओह येस तिच्या युनिट टेस्ट चालू आहेत ना? बरं फार नाही ना त्रास देत ती, मला फोन केला की सारखी कुरकुरत असते, कधी येतोस कधी येतोस विचारून हैराण करत असते..."* 


त्याचं बोलणं मध्येच तोडत अवंती म्हणाली,


 *" बरं चल संध्याकाळी बोलते, एक महत्त्वाचा कॉल यायचाय मला.."* 


 *तिने फोन ठेवला व बाजूच्या बाकड्यावर जाऊन बसली ती, क्षणभर स्तब्ध...सकाळचा प्रसंग आठवला तिला..* 


अवंती राघव कश्यप एक प्रथितयश कॉर्पोरेट ट्रेनर होती, राघव एका एम.एन.सी. मध्ये सिनियर आर्किटेक्ट.. आणि त्यांची अकरा वर्षांची मुलगी स्वरा, असं सुखी त्रिकोणी कुटुंब. राघवचे आई बाबा गावाकडे आपली शेती सांभाळत असत. वर्षातून दोन तीन चकरा होत त्यांच्या शहरात अन राघव अवंती देखील मोठ्या सणांना, कार्यांना किंवा गरज पडेल तेंव्हा तेंव्हा गावात चक्कर मारत. स्वरालाही खूप आवडत असे तिथे राहायला.


स्वरा तिच्या बाबाच्या म्हणजे राघवच्या अतिशय जवळ, अगदी लहान असताना पासूनच. तिला आईपेक्षा जास्ती बाबा लागायचा. त्यात अवंतीचे कॉर्पोरेट ट्रेनिंग्स, बाहेर व्हिझिटला जावं लागायचं, दिवस दिवस बाहेर राहावं लागायचं, त्यामुळे राघव स्वराचं सगळं काही बघायचा.    त्याचं रुटीनही तिच्या रुटीनला मॅच होईल असं बसवलं होतं त्याने. 

स्वराही अतिशय समंजस होती. अवंती तर नेहमीच म्हणायची की नावाला मी आई आहे तिची, पण आईच्या सगळ्या भूमिका तर तू वठवतोस. राघवचे ऑन साईट जायचे ठरले तशी आधीपासूनच एक ओळखीतली, विश्वासू मुलगी मदतनीस म्हणून ठेवली..फक्त स्वरासाठी. राघव तिकडे गेल्यानंतर जरा तारांबळच उडाली अवंतीची पण तिनेही तिच्या वेळा ऍडजस्ट केल्या स्वराच्या दृष्टीने..


अवंतीला बेस्ट ट्रेनर अवॉर्ड मिळणार असल्याचं आयोजकांनी पूर्वसूचित केलं होतं, खूप मोठी अचिव्हमेंट होती ही तिच्यासाठी. तसंही राघव नेहमीच म्हणायचा तिला की तू तुझ्या फिल्ड मध्ये एवढी परफेक्ट आहेस, कितीतरी लोक शिकतात तुझ्याकडून, तुला नक्कीच मोठं अवॉर्ड मिळेल या सगळ्यासाठी. तिने मुद्दामच हे राघवला सांगितलं नव्हतं, त्याला सरप्राइज द्यायचं होतं तिला.

 हा आठवडा अतिशय बिझी होता तिचा, एकावर एक ट्रेनिंग सेशन्सही लाईन्ड अप होते. अवॉर्ड फंक्शनसाठी म्हणून जरा तयारीही करायची होती.त्यात राघव नव्हता म्हणून अगदीच एकटीवर पडलं होतं तिच्या सगळं..


 *स्वराला नीट मॅनेज केलं होतं खरंतर तिने राघवच्या अनुपस्थितीत, अर्थात त्या मदतनीस मुलीशिवाय हे सारं काही शक्य झालं नसतंच म्हणा, पण या आठवड्यात काहीतरी वेगळंच चाललेलं स्वराचं. सारखं आई आई..तरी अवंती सगळं तिच्या मनासारखं करत होती, तिला जास्तीतजास्त वेळ देण्याचा प्रयत्नही करत होती.*

 *फंक्शनच्या आदल्या दिवशी स्वराला आईशी खूप काही बोलायचं होतं, तिला काय काय दाखवायचं होतं, स्कूल मधलं, ड्रॉइंग क्लास मधलं. अन नेमके अवंतीचे फोन वर फोन सुरू होते.*    *झालं...* 

 *त्यामूळे त्या ठकूबाई रुसल्या, आईशी काहीही न बोलता जाऊन झोपी गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी अवंतीने पटापट सगळे आटोपले, स्वराच्या आवडीचा ब्रेकफास्ट करून तिला आवज दिला,* 


" मन्या, बघ तुझ्या आवडीचे सँडविचेस केले आहेत, चला पटापट आवरा, मला जायचंय हं आज लवकर, बरं मी काय म्हणतेय स्वरा, तू पण चल ना माझ्या सोबत, मम्मा साठी आज स्पेशल डे आहे..आपण पटकन आवरू अन निघू.."


स्वरा एक नाही अन दोन नाही..


" काय झालं पिलू, अशी बसू नकोस बरं एका ठिकाणी, मला उशीर होतोय..मी निघू का? निशाताई थांबेल आज दिवसभर, मला उशीर करून चालणार नाही. स्वरा ऐकतेस ना मी काय म्हणतेय ते.." असं म्हणून अवंती स्वराच्या अगदी समोर जाऊन उभी राहिली..


" मी नाही बोलणार तुझ्याशी, मला बाबा हवाय आत्ताच्या आत्ता, तुला तर अजिबात वेळ नसतो माझ्यासाठी..जा.." गाल फुगवून स्वरा म्हणाली..


" हो बाळा, कळतंय मला, आय एम सॉरी, आणि बाबा येतोच आहे ना महिन्याभरात.."


अवंतीचं बोलणं पूर्णही न होऊ देता स्वरा म्हणाली,


" ते काही नाही, मला आत्ता हवाय बाबा, तुझं नेहमीचं आहे,  फक्त सॉरी म्हणतेस, मला नाही बोलायचं तुझ्याशी.."


" स्वरा..." जरा दटावणीच्या सुरात अवंती म्हणाली तशी पुन्हा मोठ्या आवाजात बोलत स्वरा आपल्या खोलीत निघून गेली..


 *" आय हेट यू मम्मा.. आय हेट यू.."* 


 *खरंतर खूप राग आला होता अवंतीला, पण त्या विषयावर फारसा विचार करायला वेळच नव्हता तिच्याकडे..ती आपलं सगळं आवरून कार्यक्रमासाठी निघून गेली.* 


 *त्या बाकड्यावर बसून हा सकाळचा प्रसंग पुन्हा आठवला अवंतीला, अन स्वराचे " आय हेट यू मम्मा " हे शब्द कानात घुमले तिच्या, गाडीच्या फ्रंट सिटवर ठेवलेली ती ट्रॉफी अन मोठ्या बुकेकडे बघत विचार करू लागली ती,* 


 *" काय चुकतंय आपलं..का करतोय आपण हे सगळं?"* 


तोच तिला कोणाच्यातरी खळखळून हसण्याचा आवाज आला, जरा बाजूलाच एक साधारण तिच्याच वयाची बाई अन स्वराच्या वयाची मुलगी एकमेकींकडे तोंड करून बसल्या होत्या, टाळ्या देत हसत होत्या..अवंती मुद्दामच उठून जरा त्यांच्या जवळ जाऊन उभी राहिली, फार प्रसन्न वाटलं तिला त्यांचं ते हसणं.. 

एका कागदाच्या तुकड्यावर छोट्या छोट्या पाचसात जिलब्या होत्या, त्या मुलीने त्यातली एक जिलबी त्या बाईला भरवायला हातात घेतली होती, आपल्या दुसऱ्या हाताने ती तिचे डोळे पुसत होती. अवंतीला पाहताच ती बाई जागेवरुन उठली, एक जिलबी तिच्या पुढ्यात धरत म्हणाली,


" घ्या ना ताई.."


" नको गं, थॅंक्यु, तुमचा दोघींचा हसण्याचा आवाज आला म्हणून सहज बघायला आले..चालू देत तुमचं.. " 


असं म्हणून अवंती निघणारच होती तोच ती बाई बोलायला लागली.


" लेक हाय ताई माझी, बारा वर्षाची हुईल आता..तशी लय गुनी हाय, परिषदेच्या शाळेत पन जाती...कधीकधी तरास पन देती..आमचं तुमच्यासारखं नाई ताई, आमच्या लेकरांना पायजे ते पायजे तेवा नाई मिळत..मग देतात कधीकधी तरास, विचित्रच वागत होती या हाफत्यात, काल तर कहरच केला, नवं दप्तर पायजे म्हनून अडून बसली, माझ्याशी भांडू लागली, खूप खूप समजावली पन ऐकेच ना, संताप संताप झाला माझा अन हात उगारला मी....मग मनात आलं पोर मोठी व्हतीय, आतून बाहेरुन बदल होतात...शरीर बदलतं..मन बदलतं.. त्यानं वागत असल अशी..

     खस्सक्कन हात मागे घेतला अन छातीशी कवटाळली, मायेनं गोंजारली, टपटप दोन आसू पडले तिच्या अंगावर अन कशी कोन जाने ती क्षनात शाहनी झाली, हट्ट बिट्ट पार विसरली. ही लेकरं आपल्या परता शहानी असतात ताई, मायेनं समजावलं की मोठ्या मानसाहून मोठी असल्यासारखी वागतात, आपलेच पालक असल्यासारखे आपल्याला समजून घेतात..म्हनून जिलबी आनली आज तिच्यासाठी, आवडते तिला, नवं दप्तर पन आनिल पैसा जमला की.."


बोलतानाही त्या बाईच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं, अन आपसूकच अवंतीचंही मन भरून आलं होतं..


 *" चला ताई, पाहते मी पोरगी कुठं गेली हुंदडत ते, तुमचा वेळ घेतला मी.."* 


 *असं म्हणून ती बाई निघून गेली. अन तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कौतुकाने बघत नंतर अवंतीही निघाली घरी जायला..* 

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

 *स्वरा शाळेतून आली तेच मुळी नाचत अन उड्या मारत,* 


 *" वॉव मम्मा, कसला मस्त वास येतोय...पास्ता अन शिरा, तोही मम्मामेड..खालपर्यंत वास येत होता. दे ना मला लगेच खायला. "* 


" ए थांब थांब, नीट हातपाय धुवून ये..तुझं आवडतं कॉम्बिनेशन आहे ना हे, पास्ता विथ शिरा..लवकर घरी आले मग करून ठेवलं तू येण्याआधी.. कसं होतं सरप्राईज?"

एक भुवई उंचावत विचारलं अवंतीने स्वराला..स्वराने फ्रेश होऊन ताव मारला दोन्हींवर, तिचा सकाळचा रुसवा कुठच्या कुठे गायब झाला होता, चेहरा आनंदानं फुलला होता. अवंती म्हणाली,


" बरं मी काय म्हणते, मस्त तिकिटं काढू का इव्हनिंगच्या मुव्हीची, तुला बघायचा होता ना तो टर्निंग रेड की कुठला, हवं तर तन्वीला घे तुला सोबत म्हणून.."


" खरंच मम्मा, तू येणारेस?"


" हो मग.."


" मग कोणी नको, फक्त तू अन मी.. यु आर द बेस्ट मदर इन द वर्ड..."


 *असं म्हणत स्वरा जाऊन बिलगली अवंतीला अन उड्या मारत निघूनही गेली, तिचा आनंद पाहून अवंतीचे डोळे भरून आले, " यु आर द बेस्ट मदर इन द वर्ड " हे तिचे शब्द खूप मोलाचे वाटले अवंतीला, अगदी आज सकाळच्या अवॉर्डपेक्षाही जास्ती मोलाचे..* 


 *मोठमोठ्या ऑडीटोरियम मध्ये, मोठाल्या कंपन्यांना, वयाने आपल्यापेक्षा लहान मोठ्या असलेल्या अनेकांना ट्रेन करणाऱ्या अवंतीला आज रस्त्यावरच्या एका साध्या स्त्रीने जगण्यातले खरे तत्वज्ञान शिकवले होते..* 


 *प्राजक्ता राजदेरकर* ✍️

No comments:

Post a Comment