TechRepublic Blogs

Saturday, September 14, 2024

हास्य

 🪴🏵️🦚🌻💠🌹☘️🍁♻️🌺🪴


             *😀 आपण का हसतो ? 😀*


*🖊️संकलन : प्रविण सरवदे, कराड,*


हास्य ही एक निर्मळ आणि सार्वत्रिक भावना आहे. माणसामाणसांमधील संवादाचं ते एक महत्त्वाचं साधन आहे. अशा प्रकारच्या संवादासाठी लागणारी भाषा आपल्याला शिकावी लागते. मग ती मराठीसारखी मातृभाषा असो की इंग्रजीसारखी परकी भाषा असो. हास्य मात्र शिकावं लागत नाही. ते उपजतच प्रत्येकाच्या ठायी असतं. मूल साधारण साडेतीन-चार महिन्यांचं झालं की ते हसू लागतं. आपल्या आईबरोबर आणि इतर आप्तांबरोबर नातं प्रस्थापित करण्याचं शिशूचं ते एक साधन असतं. त्यामुळेच हास्य हे नेहमी उत्स्फूर्त असतं. म्हणजे तसं आपण ठरवून हसू शकतो पण ते हास्य निर्मळ नसतं किंवा इतरांशी नातं जोडणारं नसतं. अशा कृत्रिम हास्यापोटी नकारात्मक प्रतिसादच उत्पन्न होतो. उत्स्फूर्त हास्यापोटी सकारात्मक प्रतिसादच मिळतो.


व्यक्ती-व्यक्तीतील सामाजिक दृढ व्हायला त्यामुळे मदत मिळते. हास्यातून आपण इतरांना एक सकारात्मक संदेश पाठवत असतो. त्यामुळेच माणूस एकटाच असताना सहसा हसताना आढळत नाही. एखादं विनोदी पुस्तक वाचत असताना किंवा एखाद्या विनोदी प्रसंगाची आठवण होऊन माणूस एकांतात हसेल. एरवी एकांतात तो जसा आपल्याशीच बोलत नाही तसाच तो आपल्याशी हसतही नाही.


हसताना आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंची बरीच हालचाल होते. ते नवा आकृतिबंध धारण करतात. त्याला आवाजाचीही साथ मिळते पण हास्याच्या प्रकारानुसार शरीराच्या इतर अवयवांच्या स्नायूंचाही त्यात सहभाग असतो आणि या साऱ्याचं नियंत्रण मेंदूमधील निरनिराळ्या भागांकडून केलं जातं. सहसा आनंदाच्या भावनेला जागृत करणाऱ्या मेंदूमधील सगळ्या प्रक्रिया हास्याच्या वेळीही होत असतात. थोडक्यात, हास्यापोटी आनंदाच्या भावनेनं मन आणि शरीर उचंबळून येतं.


विनोदापोटी आपण हसतो, असा एक समज आहे. चांगल्या विनोदापोटी हास्य उमलत असलं तरी हास्य उमलण्यासाठी विनोदाची गरज असतेच असं नाही. अमेरिकेतील मेरीलँड विद्यापीठातील मज्जाशास्त्रज्ञ रॉबर्ट प्रोव्हाईन यांनी यासाठी एक सर्वेक्षणच केलं. तेव्हा अरे जॉन, होतास कुठं तू, ही पहा मेरी आली किंवा तुमच्याकडे एखादा रबरबँड मिळेल काय यांसारख्या साध्यासुध्या वाक्यांपोटीही हास्य उत्पन्न झाल्याचं त्यांना दिसून आलं. म्हणजेच त्या हास्याचा उगम विनोदात नसून ती एक उत्स्फूर्तपणे उमटलेली अभिव्यक्ती होती.


त्यामुळेच आपलं हास्य हा उत्क्रांतीचा वारसा आहे की काय, अशी शंका काही मानववंशशास्त्रज्ञांना आली होती. तो आपला सांस्कृतिक उत्क्रांतीचा ठेवा आहे, असं महादेव आपटे यांचं मत आहे. पण मनुष्यप्राण्याशिवाय इतर प्राण्यांना हसता येत नाही. म्हणजे त्यांना गुदगुल्या केल्या तर त्याची प्रतिक्रिया उमटते; पण ती वेगळी असते. चिम्पांझीसारख्या मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीच्या प्रवाहातल्या सर्वात जवळच्या नातेवाईक प्राण्याला गुदगुल्या केल्यास तो धाप लागल्यासारखा प्रतिसाद देतो. इतर काही प्राण्यांच्या तोंडून अशा वेळी काही चीत्कारही उमटतात. त्याचंच रूपांतर हास्यात झालं असावं, असा एक अंदाज व्यक्त केला गेला आहे.


हास्यापोटी शरीरक्रियांमध्ये काही चांगले प्रतिसाद उमटतात आणि त्यांची आरोग्य राखण्यासाठी मदत होते. त्यामुळंच लाफ्टर क्लबसारखे काही उपक्रम चालू आहेत. लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन' म्हणतात ते यापोटीच. तरीही आपण का हसतो, हे एक गूढच राहिलं आहे. त्या प्रश्नाचं नेमकं उत्तर अजूनही मिळालेलं नाही.

*📌डाॅ.बाळ फोंडके यांच्या 'का?' या पुस्तकातुन,*


No comments:

Post a Comment